सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – किती रे तुझे रंग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

एक उत्तम संगीतकार, कवी, गायक, विडंबनकार, लेखक, गुरू, इत्यादी विविध पैलू, विविध रंग, व्यक्तिमत्वात असलेल्या देवकाकांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त आणि पाठोपाठच असलेल्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शब्दांत मी आदरांजली वाहतेय –

“किती रे तुझे रंग किती रे तुझ्या छाया

दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया (उतू जाणे)”

१९९५ च्या दरम्यान नाशिकच्या दातार परिवाराने निर्मिलेल्या माझ्या पहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ या  cd साठी जेव्हा शशी – उषा मेहता (ज्येष्ठ कवयित्री) या दाम्पत्याने काव्यनिवडीसाठी मदत केली. उत्तम दर्जेदार काव्य नि दर्जेदार संगीत असलेल्या कविता माझ्या आवडीने निवडल्या गेल्या. त्यावेळी विंदांची ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘मागू नको सख्या’, ‘अर्धीच रात्र वेडी’, सुरेश भटांची ‘एवढे तरी करून जा’, ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो, ‘ शांताबाई शेळकेंची ‘प्रीती जडली तुझ्यावरी’…. अशा एक से एक सुंदर रचना निवडल्या गेल्या. गंमत म्हणजे सगळ्यांचे संगीतकार – यशवंत देवच होते. या अलिबाबाच्या गुहेतल्या, रत्नांचा हार परिधान करायचे भाग्य मला मिळाले. वेस्टर्न आऊटडोअर सारख्या अप्रतिम स्टुडिओत ही रेकॉर्डिंग्जस व्हायची. ‘सर्वस्व तुजला वाहूनी… गाताना  सॅक्सोफोन वादक मनोरीदा, सरोद वादक झरीनबाई दारुवाला अशा दिग्गजांचे प्रत्यक्ष भावपूर्ण सूर कानावर पडल्याने लाइव्ह गाणे गाताना गाणे ही तसेच प्रकट होत असे… प्रत्येक टेक फर्स्ट टेक असे. टेक झाल्यावर मी गाणे ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग रूम मध्ये गेले… देव साहेबांच्या अश्रुधारा वहात होत्या. त्यांनी मला पाठ थोपटून शाबासकी दिली आणि डोळे पुसत ते म्हणाले, “अत्यंत सुंदर आणि हृदयापासून गायलात पद्मजाबाई!” माझ्यासाठी हे मोठं बक्षीस होतं. शब्दप्रधान गायकीत कुठे काय कसे गावे याचे, त्यांनी पुस्तक लिहून अगदी नवोदितांसाठी सुद्धा वस्तुपाठ रचला. गाणे प्रथम मेंदूतून व नंतर गळ्यातून गायले जाते मगच ते सहज उमटते, ही गुरुकिल्ली त्यांनी मला दिली. त्यांची भाषणे ऐकायला आम्ही उत्सुक असू. त्यांची देववाणी प्रासादिक होती. विनोदबुद्धी शेवटपर्यंत तल्लख होती. कायम ते हशा आणि टाळ्या घेत. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. शेवटी मात्र आजारपणात त्यांनी परमेश्वराला त्यांच्याच शब्दांत अशीच हाक घातली असेल…

“तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट,

माझी अधीरता मोठी, तुझे मौनही अफाट…”

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments