सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ आक्रित ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आज सकाळी मंजिरी बँकेत, ऑफिसला पोहचली, तर ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय होता. धनश्री परांजपेंनी, म्हणजे असिस्टंट मॅनेजरने स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिलाय, तोही आगाऊ नोटीस न देता, लगेच स्वेच्छानिवृत्ती हवीय. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. काय कारण असेल यावर तर्क – वितर्क आणि चर्चा सुरू झाली होती. शेवटी चीफ मॅनेजरने केबिनमधून बाहेर येऊन, ‘आता कामाला लागा’, अशी आज्ञावजा सूचना केली, तशी प्रत्येकजण आपापल्या जागेवर गेला. काम करता-करताही एकीकडे कुजबुज चालू होतीच या विषयावर ! 

धनश्री मॅडम म्हणजे मूर्तिमंत उत्साह ! परांजपे आडनावाला शोभणारा केतकी वर्ण, किंचित तपकिरी झाक असलेले घारे पण चमकदार डोळे, अगदी चाफेकळी नाही, पण चेहऱ्याला शोभणारं सरळ नाक, एकूण चेहऱ्यातच गोडवा होता त्यांच्या. कमरेपर्यंत लांब केस, बऱ्याचदा फक्त छोट्या पिनेत अडकवलेले असायचे. वय पंचावन्नच्या आसपास, उंची साडेपाच फूट आणि सुखवस्तूपणा दर्शवणारा पण आटोपशीर बांधा. साडी/ड्रेस साधाच पण नीटनेटका आणि फेसपावडर व्यतिरिक्त कोणतंही प्रसाधन त्या वापरत नसत. 

नेहमी हसतमुख आणि सगळ्यांशी मिळून-मिसळून राहण्याचा स्वभाव. हं पण कामात हयगय केलेली नाही चालायची अजिबात ! मग एकदम दुर्गावतार धारण करायच्या त्या ! पण हे फारच क्वचित घडायचं. शक्यतो गोड बोलून, समजावून काम करण्याची त्यांची पद्धत होती आणि स्वतः कोणतंही काम करायची तयारी असायची. एकदम झोकून देऊन काम करणार ! यामुळे सगळा स्टाफ त्यांच्या प्रेमात असला तरी आदरयुक्त धाकही होता त्यांचा ! त्यांचे यजमान एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी होते. सासू – सासरे कधी पुण्यात मोठ्या दिरांकडे तर कधी अमरावतीला या मुलाकडे असायचे. 

त्यांची दोन्ही मुलंसुद्धा एकदम हुशार ! मुलगी तनया एम. बी. बी. एस. च्या शेवटच्या वर्षाला, मुंबईत हाॅस्टेलला होती. मुलगा सोहम इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर… नुकतंच इन्फोसिसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि तो मैसूरला नोकरीवर रुजू होणार होता. धनश्री मॅडम रोज ऑफिसला कारनेच यायच्या. म्हणतात ना एखाद्याला देव छप्पर फाड के देतो, अगदी तस्सच धनश्री मॅडमच्या बाबतीत होतं. 

घरात स्वैपाकाला बाई होती. पण यांना स्वतःला पण काही ना काही पदार्थ बनवायची भारी हौस होती. आणि मग ऑफिसला येताना तो पदार्थ मोठ्या डब्यात भरून आणायचा आणि सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालायच्या. करणंही एकदम टकाटक असायचं, एकदा खाल्लेल्या पदार्थाची चव कित्येक दिवस रेंगाळत राहायची सगळ्यांच्या मुखी. 

ऑफिसच्या कामात तर अव्वल होत्याच त्या. पण पिकनिक असो, हळदीकुंकू असो, कुठलाही विशेष दिवस साजरा करणं असो, सगळ्या उपक्रमातही तेवढ्याच उत्साहाने त्या सहभागी व्हायच्या. त्यांच्या हाताखाली जवळजवळ तीसेक कर्मचारी होते. पण कोणाला काय चांगलं जमतं, कोण काय काम करू शकतं याबाबत त्यांचं निरीक्षण आणि अंदाज अगदी अचूक असायचा. त्यामुळे या ब्रँचचा आणि मॅडमच्या नावाचा हेड ऑफिसमध्येही दबदबा होता. चीफ मॅनेजरना कधी प्रशासनिक कामांमध्ये दखल द्यायची वेळच यायची नाही धनश्री मॅडमच्या कर्तबगारीमुळे ! त्यामुळेच कोणाला काही न सांगता – सवरता त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज का केला हे सगळ्यांना कोडंच पडलं होतं.

मंजिरी धनश्री मॅडमच्या हाताखालची क्लासवन ऑफिसर. आता मॅडम नसल्याने सगळी जबाबदारी आत्तातरी तिलाच सांभाळावी लागणार होती. ती फ्रेश होऊन जागेवर आली आणि चीफ मॅनेजरनी इंटरकॉम करून तिला केबिनमध्ये बोलावलंच. त्यांनी जे सांगितलं त्यावर तिचा विश्वासच बसेना. पण चीफना ही माहिती हेड ऑफिसमधून स्वतः पर्सनल मॅनेजरनी फोन करून सांगितली होती आणि पर्सनल मॅनेजरना धनश्री मॅडमचे पती आणि मुलगी यांनी, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं भागच होतं. पण या प्रकाराची वाच्यता ती कोणाकडेच करणार नव्हती. मॅडमच्या आजवरच्या प्रतिमेला धक्का लागू नये याची काळजी ती नक्कीच घेणार होती. कोणावर कधी कशी वेळ येईल काय सांगावं? 

धनश्री मॅडमचा मुलगा पुढच्या आठवड्यात मैसूरला नोकरीवर रूजू होणार होता. त्यासाठीच मॅडमनी पंधरा दिवस रजा घेतली होती. त्याला भेटण्यासाठी त्यांची मुलगीदेखील मुंबईहून आली होती. आठ दिवसांपूर्वी संध्याकाळी आई आणि दोन्ही मुलं काही खरेदी करण्यासाठी माॅलमध्ये गेले होते. खरेदी करून पेमेंट करून बाहेर पडताना सिक्युरिटीने नेहमीप्रमाणे त्यांच्या बॅग, पर्स तपासल्या आणि.. आणि… त्यांना बाहेर पडायला मनाई केली… ..  

… धनश्री मॅडमच्या हातातल्या छोट्या पर्समध्ये चार-पाच वस्तू अशा सापडल्या होत्या, की ज्या त्यांनी बिलिंग काउंटरवर दाखवल्या नव्हत्या आणि त्याचे पैसे दिले नव्हते. बरं वस्तू तरी काय? तर नेलपेंट, कंगवा, कॅडबरीसारखं एक चाॅकलेट, की-चेन, रंगीत खोडरबर अशा, की ज्याची किंमत जेमतेम शंभर-दीडशे रुपये झाली असती. पण त्या सर्व वस्तूंवर माॅलचा टॅग तर होताच. मॅडमच्या त्या पर्समध्ये सात हजार कॅश, दोन ए. टी. एम. कार्ड सुद्धा होती. ती बघून तो सिक्युरिटीसुद्धा गोंधळात पडला, की ही बाई अशा फालतू वस्तू का चोरेल? 

धनश्री मॅडमनी पण आश्चर्य व्यक्त केलं की या वस्तू माझ्या पर्समध्ये कशा आल्या? तनया आणि सोहम एकदम चकितच झाले. पण त्यांनी आईचा काहीतरी गोंधळ झाला असावा असं म्हणून बाजू सावरून घेतली. काउंटरवर जाऊन साॅरी म्हणून त्या वस्तू परत केल्या. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आईच्या कपाटात इस्त्रीचे कपडे ठेवताना, तनयाला एक प्लॅस्टिकची हँडबॅग दिसली. उत्सुकता म्हणून सहज तिनं बघितलं तर लहान – मोठ्या अनेक वस्तूंचा खजिनाच तिच्या हाती लागला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यात चष्मा, लिपस्टिक, फेसवाॅश, छोटी कार, मनीपर्स अशा ज्या वस्तू सापडल्या त्या तिची आई वापरणं शक्यच नव्हतं.

ती आईला बोलावून विचारणारच होती, हे कोणाचं सामान आहे म्हणून. पण तेवढ्यात तिला त्या बॅगेत तिच्याच मैत्रिणीनं वाढदिवसाला दिलेला एक शो पीस सुद्धा दिसला. जो दुसर्‍याच दिवशी तिच्या खोलीतून गायब झाला होता आणि सगळीकडे शोधून सापडला नाही म्हणून तिनं घर डोक्यावर घेतलं होतं. 

तनया वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. हे काही तरी वेगळं आहे. कालचा माॅलमधला प्रसंग तर ताजाच होता. तिनं ती बॅग गुपचूप तशीच जागेवर ठेवून दिली. मग तिनं सोहमला आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. ती दोघं मग कालच्या माॅलमध्ये गेली. तिथल्या मुख्य व्यवस्थापकाशी बोलून त्यांनी काल संध्याकाळचं सी. सी. टि. व्ही. फूटेज दाखवण्यासाठी त्यांना विनंती केली. आणि ते खरेदी करत असतानाचं चित्रीकरण बघताना, आपल्याला आलेली शंका रास्त आहे, याबद्दल तनयाची खात्रीच पटली. कॅमेऱ्यात धनश्रीनेच त्या वस्तू आपल्या पर्समध्ये टाकल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिनं समजावून सांगितल्यावर सोहमही तिच्याशी सहमत झाला. 

तनयानं तिच्या मैत्रिणीच्या आईशी संपर्क साधला, जी मानसोपचार तज्ज्ञ होती. तिनं हा क्लॅप्टोमेनिया नावाचा आजार असू शकतो असं सांगितलं. हा एक आवेग नियंत्रण विकार आहे. या आजारात व्यक्तीमध्ये कोणतीही वस्तू चोरण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मग ती वस्तू तिच्या उपयोगाची असो किंवा तिला त्या वस्तूचे काही महत्त्व असो नसो. ही व्यक्ती चोरी करण्यापूर्वी तणावात असते आणि चोरीनंतर तिला आनंद, समाधान मिळते. अशा व्यक्तींना चोरी करण्याची इच्छा किंवा आवेग इतका तीव्र असतो, की त्या स्वतःला थांबवूच शकत नाही. या व्यक्ती सहसा सार्वजनिक जागा म्हणजे दुकानं, सुपरमार्केट, ऑफिस अशा ठिकाणी चोरी करतात. काही वेळा ओळखीच्या किंवा मित्रांकडील समारंभातही चोरी करतात. या चोरीतून त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नसतो. या व्यक्तींना आपण पकडले जाऊ, आपल्यावर चोर असा शिक्का लागेल  अशी जाणीवही अनेकदा असते, पण त्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. 

क्लॅप्टोमेनिया होण्याचं निश्चित कारण अजून ज्ञात नाही. त्यावर संशोधन चालू आहे. हा आजार कोणत्याही वयात आणि कोणालाही होऊ शकतो. मेंदूतील सेरोटोनिन या संप्रेरकाची खालावलेली पातळी हे त्याचं एक कारण असू शकतं. कारण हे सेरोटोनिन आपल्या भावना आणि कृतीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं. आतापर्यंत या रोगावर ठोस, सुयोग्य उपचार नाहीत. पण मानसिक आरोग्याशी निगडित उपचार घेणे आवश्यक आहे. आणि या उपचारांचा कालावधी निश्चित सांगता येत नाही. म्हणूनच धनश्री मॅडमच्या घरच्या मंडळींनी विचार – विमर्श करून आणि त्यांचं समुपदेशन करून, स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायला त्यांना तयार केलं होतं. त्यामुळे योग्य उपचारासाठी त्यांना वेळ मिळणार होता. ऑफिससारख्या ठिकाणी अनुचित प्रकार होऊन त्यांची मानहानी होऊ नये हाही उद्देश होताच. 

दोन-तीन दिवसात मॅडमच्या जागी कोणाचीतरी नियुक्ती करण्यात येणारच होती. कारण ऑफिसच्या कामाच्या दृष्टीने हे जबाबदारीचं पद रिकामं ठेवता येणार नव्हतं. मॅडमचं टेबल नवीन येणाऱ्या मॅनेजरसाठी व्यवस्थित आवरून ठेवण्याची जबाबदारी चीफनी मंजिरीवर टाकली होती. संध्याकाळी काम आवरून आणि बहुतेक सगळे जण गेल्यावरच तिनं ते करायला घेतलं. त्या टेबलच्या उजव्या बाजूच्या खालच्या ड्राॅवरमध्ये मंजिरीला कर्मचाऱ्यांच्या अनेक वस्तू आढळल्या, ज्या नजीकच्या काळात हरवल्या होत्या. छत्री, लंचबाॅक्स, पंचिग मशीन, स्टॅपलर, पेपरवेट ज्यावर वस्तू कोणाची हे ओळखू येण्यासाठी कर्मचारी आपलं नाव कोरून अथवा काही तरी खूण करून ठेवत. पण त्याचं मूल्य किरकोळ असल्याने त्याचा फारसा गाजावाजा कोणी केला नव्हता. मॅडम रजेवर गेल्या काय आणि आता अशा प्रकारे स्वेच्छा निवृत्ती घेतात काय, मंजिरीला सारंच अतर्क्य वाटत होतं. —- 

 — आता धनश्री मॅडमवर मानसोपचार सुरू आहेत व त्यातून त्या बऱ्या होतील याकडे कुटुंबातील सर्वांचंच लक्ष आहे. 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments