डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥अरे माणसा माणसा॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“कांचनताई, आमचं तुमच्याकडे वेगळंच काम आहे. तुम्ही वकील आहात म्हणून मुद्दाम विचारायला आलोय.” नाडकर्णी काका म्हणाले.) – इथून पुढे — 

 “ मी माझी माहिती सांगतो. मी अनेक वर्षे मर्चंट नेव्हीत कॅप्टन होतो. भरपूर पगार, त्यामुळे मी खूप पैसे मिळवले आणि हा मोठा चार बेडरूमचा फ्लॅट घेऊ शकलो. मला दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी !  दोघंही आता अमेरिकेचे सिटीझन झाले आहेत. मुलगा डॉक्टर आहे तिकडे आणि त्याची बायकोही  डॉक्टरच आहे. माझ्या मुलीनं  इथून लॉ केलं आणि तिकडच्या  परीक्षा देऊन ती तिकडची एक उत्तम लॉयर झाली आहे. अतोनात पैसा मिळवतात हे लोक तिकडे. मुलाला एक मुलगा आहे आणि मुलीला दोन मुली आहेत. माझी बायको- मिसेस नाडकर्णी याही कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या. त्यांनाही पेन्शन आहे. इतकं सगळं छान असताना, तुम्हाला वाटेल की मग माझं तुमच्याकडे काय काम आहे? तर काम असं, की आम्हाला दोघांना जॉईंट मृत्युपत्र करायचं आहे. आमचा हा फ्लॅट, शिवाय बरेच फिक्स्ड  डिपॉझिट्स,  म्युच्युअल  फंडस् असे बरेच काही आहे आमचे. हे सगळं आम्ही आमच्या दोन मुलांना नाही तर कोणाला देणार हो? तर अडचण अशी निर्माण झालीय बघा की .. ..  “ काकानी श्वास घेतला. कांचनने दोघांसाठी कॉफी मागवली.

“ काका, रिलॅक्स व्हा ! तुम्हाला त्रास होत असला तर आपण उद्या बोलूया का?”  

“ नको नको ! मला आत्ताच बोलू दे आणि हे काम एकदाचं पूर्ण करून टाकूया. तर …. गोष्ट अशी झालीय की माझ्या मुलीने तिकडे अमेरिकेत तिच्याच लॉ फर्ममध्ये असलेल्या मॉर्गन नावाच्या अतिशय चांगल्या असणाऱ्या अफ्रो-अमेरिकन मुलाशी लग्न केलं आहे. म्हणजे तो कृष्णवर्णीय आहे. अत्यंत उत्तम बॅरिस्टर आहे आणि खोऱ्याने पैसे मिळतात दोघांना ! त्यांच्या लग्नाला जवळजवळ अठरा वर्ष झाली आता. दोन मुली आहेत. आणि अगदी उत्तम संसार करत आहेत ते दोघेही ! आम्ही त्यांच्या घरी अनेक वेळा जाऊनही आलोय. अतिशय गुणी, सज्जन आणि मृदुभाषी आहे हा मॉर्गन. एक काळा वर्ण सोडला तर नाव ठेवायला जागा नाही त्याच्यात. मुलीही निम्म्या भारतीय,आणि निम्म्या त्याच्यासारख्या झाल्या आहेत.” 

“ तर झालं काय की आम्ही मुलाजवळ सहज आमच्या मृत्युपत्राची गोष्ट काढली. त्याला म्हटलं आम्ही सगळं निम्मं निम्मं तुम्हा दोन्ही मुलांना देणार.  घर सुद्धा आमच्या नंतर तुम्ही विका आणि निम्मे निम्मे पैसे घ्या. तुम्ही कोणीही इथे कधीच येणार नाही. मग काय उपयोग ते ठेवून तरी?– हे सगळं आम्ही अगदी कॅज्युअली म्हणालो बघा ! पण मुलगा अतिशय चिडला, म्हणाला, ‘ मी एकटा वारस आहे तुमच्या सर्व इस्टेटीचा ! अश्विनीचा, माझ्या बहिणीचा संबंध येतोच कुठं? मला तिने ते लग्न केलेले मुळीच मान्य नाही आणि माझा तिच्याशी गेल्या अठरा वर्षात काहीही संबंध नाही. सगळं सोडून त्या काळ्याशी लग्न केलं तिनं ! तिला तुम्ही काहीही द्यायचं नाही. मला हवाय फ्लॅट पुण्यातला !’ .. हे ऐकून आम्ही दोघेही हादरून गेलो अश्विनी कधीही बोलली नाही आम्हाला की भावाशी तिचे काही बोलणे ,येणे जाणेही नाहीये. फार सज्जन आहे हो मुलगी माझी ! तर आमची मुलगीही आमची तितकीच लाडकी आहे आणि जावई सुद्धा आणि नाती पण… तर आता आम्हाला असं विल करता येईल का की ज्यामुळे तिलाही आमच्या सर्व  इस्टेटीत निम्मा हक्क मिळावा आणि नातीना प्रत्येकी दहा लाख रुपये आम्ही देऊ इच्छितो… आजी आजोबांची आठवण म्हणून ! आणि हे मुलाला आम्ही हयात असेपर्यंत समजले नाही पाहिजे. कांचन, असं इच्छापत्र आम्हाला करता येईल का ते सांगा. आता या उतारवयात आम्हाला दोन्ही मुलं हवीत आणि त्यांच्याशी संबंधही बिघडवायचे नाहीत आम्हाला !” 

नाडकर्णी काकू म्हणाल्या, “ अहो,आमच्या मुलाच्या मनात अश्विनीबद्दल इतका द्वेष असेल असं कधी मनातही वाटलं नव्हतं आम्हाला. आणि तिनेही कधीही हे आम्हाला सांगितलं नाही. किती गुणी मुलगी आहे आमची ! काहीही कमी नाहीये तिला तिकडे.आणि केलं त्याच्याशी लग्न हा गुन्हा झाला का? किती छान संसार करतात ते दोघे ! आणि आमचा मुलगा तर नामांकित डॉक्टर आहे तिथला. तरीही हे असले विचार? आम्हाला चैन पडेना म्हणून भेटायला आलोय आम्ही तुम्हाला ! दोन्ही मुलं सारखीच नसतात का सांगा आई वडिलांना? तिच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही.” नाडकर्णी काकूंना अतिशय वाईट वाटत होतं.  पाणी आलं त्यांच्या डोळ्यात.  

कांचन म्हणाली, “ काका काकू, मुळीच वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला तुमच्या मनासारखं इच्छापत्र येईलच येईल करता ! मी देते करून सगळा ड्राफ्ट ! तुम्ही फक्त सगळी डिटेल्स द्या मला . आणि मी करीन हे काम तुमचं ! काहीही अवघड नाहीये यात.  मुलगा असं म्हणूच शकत नाही की ‘ मी एकटा वारस आहे तुमचा !’  मुलीचाही   तितकाच हक्क आहे तुमच्या इस्टेटीवर ! तुमची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे, ती तुम्ही कोणालाही देऊ शकता, अगदी दान सुद्धा करू शकता काका ! आणि जेव्हा तुमचीच इच्छा आहे मुलीला तिचा निम्मा हक्क द्यायची, तर प्रश्नच येत नाही हो ! राहता राहिला मुलाला न दुखवता हे करण्याचा प्रश्न !  तेही आपण करूया. तुमचं विल तुम्ही फायनली अप्रुव्ह केलं की आपण  ते डॉक्युमेंट्स  रजिस्टर करूया. दोन  तुमचे साक्षीदारही सरकारी कचेरीत  येऊन सह्या करतील, आणि तुमचं विल रजिस्टर होईल. हे विल केलेले आपण तुमच्या मुलाला सांगायचेच नाही .त्याच्या मी दोन  कॉपीज तुम्हाला देईन. तुमचा अश्विनीवर पूर्ण विश्वास आहे ना? मग ती पुण्यात येणार आहे तेव्हा तिला ही कल्पना द्या आणि एक कॉपी तिला देऊन ठेवा. दुसरी तुमच्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. एक कॉपी माझ्याकडे राहील. सरकारी नोंद झाल्यावर हे दस्तऐवज कोणीही चॅलेंज करूच शकणार नाही ..बँक,  फंड्स, सगळीकडे हे ग्राह्य धरले जाईल. घर विकतानाही मुलीची सही असल्याशिवाय मुलगा एकटा तुमच्या पश्चात घर विकूच  शकणार नाही. काका काकू, आता काळजी नाही ना वाटत कसली ? मी सगळं नीट करून देते. अहो, मग वकील कशाला झालोय आम्ही? तुमच्या सारख्या ज्येष्ठ लोकांना मदत करायलाच ना? आता तुम्ही एकदम निर्धास्त रहा. आपण हे काम येत्या पंधरा दिवसात करूया पूर्ण ! “  

नाडकर्णी काकाकाकू  एकदम निर्धास्तझाले. त्यांना असा सल्ला देणारे कोणीतरी विश्वासू हवेच होते. त्यांनी कांचनचे आभार मानले. तिची काय फी आहे ते विचारून लगेच चेक दिला. पुढच्याच आठवड्यात  कांचनने फायनल ड्राफ्ट केला आणि मग  रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये काका काकूंचे विल रीतसर रजिस्टर झालं सुद्धा ! शंभर वेळा तिला धन्यवाद देत नाडकर्णी आनंदाने घरी परतले.

रात्री भाटेकाका, म्हणजे  तिचे सासरे म्हणाले, “ कांचन, किती मोठं काम केलंस तू !आता हीही कामं तुला यायला लागतील.आता मात्र हाताखाली कोणीतरी असिस्टंट घे बरं का ! खूप कौतुक करत होते नाडकर्णी तुझं ! मला याचं आश्चर्य वाटतंय की, स्वतः खोऱ्याने पैसा ओढत असूनही  इथल्या फ्लॅटची हाव असावी मुलाला .. आणि इतका द्वेष बहिणीबद्दल? कमाल वाटते खरंच ! ‘माणूस’ नावाच्या माणसाचं मन वाचता येत नाही हेच खरं.” भाटे काका उदास होऊन म्हणाले.  निनाद हे सगळं ऐकत होताच !  खेळकरपणे तो म्हणाला, “ डॅडी, म्हणून तर आपल्या बहिणाबाई म्हणून गेल्यात ना, ‘अरे मानसा मानसा कधी होशील माणूस?’..“  भाटेकाका म्हणाले, “अगदी खरं. कांचन, अशीच मोठी हो आणि लोकांना मदत करायला कधीही मागेपुढे बघू नकोस ! “ आपल्या या देवासारख्या सासऱ्याच्या पाया पडताना कांचनला गहिवरून आलं. “ हो डॅडी ! मी तुमचे शब्द कायम लक्षात ठेवीन “ असं म्हणत कांचन डोळे पुसून  आत गेली. सासूबाईंच्या  फोटोच्या आणि देवाच्या पाया पडायला…

– समाप्त –

 

लेखिका : डॉ ज्योती गोडबोले

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments