सौ. सुचित्रा पवार

मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सहजच गप्पांचा, चर्चेचा फड रंगला की बायकांचे किंवा पुरुषांचे एक वाक्य ऐकायला येते, “एखादी मुलगी असावीच बघा. ” मलाही दोन मुलेच आहेत मग कुणीपण म्हणते, “मुलगी एक हवी होती बघा!”पण मी म्हणते का?मुलीला माया असते, अमुक तमुक… म्हातारपणी एखादे विसाव्याचे ठिकाण असावे.. वगैरे. पण खरेच असे असते का? मुली प्रेमळ असतात न मुले नसतात, हा शोध कुणी लावला?(माझी दोन्ही मुले प्रेमळ आहेत आणि आईच्या सेवेसाठी तत्पर असतात)असे कोणतेच विधान सरसकट करता येत नाही. मुली प्रेमळ, मुले कठोर, किंवा मुली सेवा करतात, मुले टाकून देतात.. खरे तर व्यक्ती परत्वे स्वभाव, संस्कार भिन्न असतात. अमुक एक जात, पंथ, धर्म चांगला/वाईट असे काहीच नसते, प्रत्येक जाती, धर्म पंथात वेगवेगळ्या आचार विचार आणि स्वभावाची माणसे असतातच.

तसेच आपल्या अपत्याबाबत देखील असते. मुळात आपल्या म्हातारपणी काठी व्हावीत, आपली सोय व्हावी म्हणून मुले जन्माला घालणे चूक आहे. मनुष्य हा प्राणी आहे आणि तो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्यासारखाच दुसरा प्राणी किंवा जीव निर्माण करतो. समाज टिकवण्यासाठी एका जिवातून दुसरा जीव तयार होतो. मुलांचे पालन पोषण नीट करून सुसंस्कृत बनवून त्यांना सशक्त सुदृढ बनवणे व एक बलशाली राष्ट्र बनवणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तसेच त्याला त्याच्या कलेने  योग्य ते शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवणे हेही कर्तव्य आहे. हे करत असताना स्वतःही स्वतःसाठी जगत, स्वत:बरोबर कुटुंबाला वेळ देणे, मुलांना वेळ देणे आणि मुलं सज्ञान झाली की आपण आपण वानप्रस्थाश्रम याचा अर्थ स्वतःचे उर्वरित पूर्ण  आयुष्य समाधानात, आनंदात घालवणे ही आजच्या काळातील अतिशय महत्वाचे आहे. पण हे घडताना दिसते अतिशय दुर्मिळ. उलट ‘आम्ही तुला लहानाचे मोठे केले, ‘यावं त्यांव करून पालक सतत पाल्याभोवती भुण भुण लावतात, जेष्ठ झाल्यावर तर अजूनच जास्त.

याच्या विरुद्ध पालक कितीही चांगले वागले तर मुले त्यांना समजून घेण्याच्या मानसिकतेत नसतात आणि अशा पालकांना पण उतारवयात दुःख होते. एकूण मुली आहेत म्हणून आनंदी आनंद आणि मुले म्हणजे दुःखच दुःख असे काहीच नाही. चांगले पालक मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट असते तशीच मुले चांगली, सद्गुणी निघणे हेही भाग्यावरच अवलंबून आहे असेच चित्र आता सगळीकडे दिसत आहे, कारण भारतीय समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या टप्प्यावर आला आहे, यात ग्रामीण, शहरी फरक  राहिला नाही.

परवाच ऐकलेली दोन उदाहरणे सांगते. मुलींनी वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळावा म्हणून आईवडीलांवर केस घातली. वडिलांना मानसिक धक्का बसून अर्धांग झाला. एकुलता एक भाऊ बिचारा खाजगी बसवर चालक म्हणून काम करून कुटुंब चालवत आहे.

दुसरे उदाहरण वडिलांचा वार्धक्याने मृत्यू झालाय. तिन्हीसांज झाली आहे. टिपटीप पाऊस आहे, अंत्ययात्रेला माणसे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे, इतक्यात मुलगा दिसत नाही म्हणून शोध घेतला जातो, तासभर शोधूनही तो मिळत नाही(दारू पिऊन कुठल्या कोपऱ्यात पडला होता कोण जाणे!)शेवटी वडिलांवर अंत्यसंस्कार झाले. काय करायची असली मुले-मुली असून?ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

आजकाल किती मुली मोठ्या झाल्या की घरची सर्व कामे करून आईला विश्रांती देतात?मी तर म्हणेन हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच, उलट शिक्षण चालू आहे तोवर आईच सगळं करते, पुढं नोकरी लागते, लग्न होते मग वर्षभराच्या सर्व बेगमी(चटण्या, उन्हाळी पदार्थ)मुली आईकडूनच करून घेतात. काही मुली राहिलेलं शिक्षण परत माहेरीच राहून पूर्ण करतात आणि आईच सर्व मुलीचे पाहते, घरकाम पाहते. आई आपल्या अपत्यावरील प्रेमाखातर सर्व आनंदाने करते पण मुलीला आपल्या आईबद्दल कणव कधी वाटणार?अशी बरीच उदाहरणे आसपास दिसतात.

सज्ञान झाल्यावर चांगले-वाईट, नैतिक अनैतिक यातला फरक कळण्याची व त्याप्रमाणे आचरण करण्याची व जबाबदारीने वागण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची असते. पालक ठराविक वयापर्यंतच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात तिथून पुढं आपण त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालणे अपेक्षित असते, पण असे होत नाही. आज ढवळलेले सामाजिक वातावरण, गढूळ झालेली माणुसकी, यातून निरक्षीर विवेक जागृत ठेवणे फारच जिकिरीचे झाले आहे. यातून जे तरतात, त्यांची कुटुंबे संतुलित आणि आनंदी राहतात बाकी प्रवाहात गटांगळ्या खातात.

असो, पालकांनीच आता मुलांकडून अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे मुलांवर प्रेम आणि पालन पोषण केलं तर भविष्यात मुलं आपल्यासोबत प्रतिकूल वागली तर दुःख व पश्चाताप होणार नाही. अन्यथा शेक्सपिअर म्हणतोच, ‘माणसाच्या दु:खास तो स्वतः कारणीभूत असतो.’

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments