श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

हुश्श! कालचा अनंत चतुर्दशी चा दिवस आटोपला.. सगळया भाविकांचा निरोप देता घेता इतकी दमछाक झाली म्हणून काय सांगू… आणि तो गजर गुंजतोय अजूनही माझ्या कानात…

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… आजवर कित्येक वर्षे विसर्जनाच्या वेळी तुम्ही मला म्हणता आणि मीही तत्परतेने दरवर्षी न चुकता तुमच्याकडे येतोच येतो… यात तसूभरही बदल झाला नाही… कारण तो होणारच नसतो ना… सगळं कसं यांत्रिकपणे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ना ही… हां बदल फक्त सण साजरा करण्याच्या पद्धतीत झाला आहे… दर वर्षी मी नित्य चांगल्या गोष्टी देण्यासाठी हिथं मनात योजून येत असतो… पण इथं आल्यावर मला दिसतं कि आधीच सगळ्या  चांगल्या गोष्टींचा फज्जा उडालेला आहे… मग मी नविन काही न देताच निघतो  आणि तुम्ही तुमचं जुनं एकेक सोडून नव नवीन टुकार गोष्टी दाखवता.. तेव्हा माझ्या मनाला कितीतरी क्लेश होतात… अरे मी तो चौसष्ट कला नि चौदा विद्याचां अधिपती ही माझी ख्याती.. पण ऐकेक तुमच्या अंतरीच्या नाना कळा पाहून मलाच म्हणावेसे वाटते कि रे तेथे कर माझे जुळती… दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी सजावट, वाद्यांचा  गजर, लाऊडस्पीकरच्या किंकाळ्या, छमछमत्या छम्मकछल्लूचां   नाचाचा धांगडधिंगा… यालाच खरच  हल्ली गर्दी जमते फार.. हवसे गवसे नि नवसेच फार… भक्तांच्या  अभिरुचीला पैशाचा पाऊस पडे धुंवाधार… आणि माझ्या  पुजाआरती करायच्या वेळी चार टाळकी जमे पर्यंत होतसे  नित्याची मारामार… मी मात्र मखरात बसून अर्धडोळे उन्मलित अवस्थेत पाहत असतो. ओठावर मंदस्मित आणत असतो.. लबाडांची मागण्यांची बाडची बाड भिडभाड न ठेवता  वाढता वाढे होत जातात… बदल्यात मलाही काही  द्यायचं हेच हेतूपुरस्सर विसरून जातात… अशाने होतील  कश्या पूर्ण तुमच्या मनोकामना.. राजाची बिरुदावलीचं लेबल माझ्या माथी मारून तुमचं उखळ पांढरं करून घेतात… तुम्ही बदललात मग मीच मागे का राहू आजकालच्या जमान्यात… मी ही नुसता देखावा करतो तुमचं ऐकून घेतल्यासारखं करतो.. दहा दिवस माझी करमणूक छान होते.. अन जाताना मी आठवतो यावेळेला नवे काय बरं दिसतं होते… बाकी काही असो दहा दिवस तरी मनापासून नसले तरी माझ्या भक्तीचा गुलाल तो उधळता… आपल्या घरातल्या, गल्लीतल्या, गावातल्या माणसांशी हसून खेळून राहता… तेव्हढचं एक बघून माझा उर भरून येतो… आणि केवळ हेच बघण्यासाठी दरवर्षी इथं येण्याचं मनात ठरवून निरोप घेत असतो… बरे वाटतं  तुमचं आपापसातलं त्या दिवसातले प्रेमाचं भरतं पाहून… मला निरोप देताना जड जातयं तुम्हाला हे कळतंय मला… एक मागणं मी ही मागतो तुमच्या जवळ नाही म्हणू नका मला.. जे दहा दिवस प्रेमाने तुम्ही सगळे एकत्र येऊन घालवले माझ्या सहवासात.. ते पुढच्या वर्षीच्या चतुर्थी पर्यंत तसेच ठेवाल का… तर मग दुखाचा कापूर, नैराश्याच्या अगरबत्या पेटवण्याची गरजच तुम्हाला उरणार नाही.. आनंदाचे निरांजन, समाधानाची समई तेवत राहील  अखंडपणे तुमच्या जीवनात.. दोन हस्तक नि एक मस्तक श्रद्धेने मजजवळ  झुकलेले पुरेसे असते मला.. साधी राहणी नि उच्च विचारसरणी पण तुम्ही करतायं ते अगदी उलटं असते उच्च राहणी नि टुकार विचारसरणी… अरे कुठलाच फापट पसाऱ्याचा सोस नको असतो मजला… चिंता करू नका, तरीही मी हो हो नक्की येईन बरं लवकरच पुढच्या वर्षाच्या चतुर्थीला… तो पर्यंत गणपती बाप्पा मोरया…     

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments