श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ बिब्बा/बिबवा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

पूर्वीच्या गावगाड्यातील प्रत्येक घरा-घरात आढळणारा हा औषधी गुणधर्म असलेला बिब्बा घरातील गाडग्या-मडक्यात हमखास पहायला मिळत असे. आज्जीबाईच्या बटव्यात तर याला मानाचे स्थान होते. असा हा बिब्बा अलीकडच्या काळात बऱ्याच जणांच्या खिजगणतीतही नसावा. याचे आश्चर्य वाटते. 

कोकण पट्ट्यातील डोंगररांगा आणि मला माहित असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगर तसेच कराड तालुक्यातील दक्षिण भागातील डोंगररांगा आणि इतर पडीक मोकळ्या रानात या बिब्ब्याची झाडे पहावयास मिळतात.

जंगल संपत्ती असल्याने आदिवासी किंवा स्थानिक लोकांना बिबव्याची फळे चार पैश्याचा आधार देऊन जातात. साधारण बिबव्याच्या झाडाची फळे ही दिवाळीच्या वेळेला पिकायला सुरुवात होते. काजूसारखी येणारी पिवळसर केशरी बोंडे असलेल्या फळाचे काळसर बिब्बे काढून त्या फळाच्या माळा तयार करून ते खुंटीला वाळवण्यासाठी अडकवून ठेवतात. मग अश्या वाळलेल्या फळांच्या माळा जवळपासच्या आठवडी बाजारात किंवा शहरात विकावयास येतात. चवीला तुरट आणि रुचकर असणारे हे फळ पिष्ठमय असते. कच्चे पिवळसर फळ खाल्ले तर घश्यात खवखव सुरू होते. त्यामुळे  पिकल्यानंतरच खाणे योग्य होते. 

माझा आणि या बिब्ब्याचा खूप जवळचा संबंध आहे. पूर्वी दिवस उगवायला डोक्यावर पाट्या घेऊन गळयात धोतर किंवा लुगड्याचा धडपा   बांधून त्यात झोपलेल्या तान्हया बाळाला पाठीवर टाकून सुया-पोती विकणाऱ्या नऊवारी लुगड्याला ‘दंड’ घालून कासुटा घातलेल्या कोकणी बायका, ” ये काकू ? ये मावश्ये ? ” अश्या मोठमोठ्याने हळ्या मारत वेशीतून वाड्या-वस्त्यांवर प्रवेश करायच्या, तेव्हा प्रथम त्यांचे स्वागत हे पाळीव कुत्री करायची. मग त्या बायकांच्या हळ्या आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा कालवा ऐकून सगळ्या आळीची पोरं-पोरी जागी व्हायची, आणि डोळे चोळतच कालव्याच्या दिशेने पळत सुटायची. ” ओ, आमच्या आयनं बोलावलंय? ओ आमच्या आळीला चला? ओ आमच्या अंगणात बसा? ओ आमच्या सोप्यात बसा? ” म्हणून त्या बायकांच्या विनवण्या करत असायची. त्या बायकांच्या टोपलीत सुई, दाबन, तोडे, वाळे, मनगट्या, लबरी कडे, वगैरे वगैरे साहित्याबरोबरच या बिब्याचा ही मुख्यता समावेश असायचा.

तर अश्या या कोकणी बायकाकडून आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेतल्याकी त्यात चार-पाच बिब्यांचा ही समावेश असायचा. मग त्या बायकांना कालवण असेल तर कालवण नसेल तर चटणी भाकरी देऊन पाठवले जाई. असे ही बिब्बे शेतकऱ्यांना कधी आणि केव्हा लागतील याचा नेम नसायचा. म्हणून ते बिब्बे करंड्यात, बारक्या गाडग्यात किंवा घराबाहेर असणारया भिंतीच्या देवळीत सुरक्षित ठेवले जात. याचे ही कारण असे की लहान मुलांच्या हाती हा बिब्बा चुकून लागू नये. कारण चुकून बिब्बा लहान मुलाने तोंडात घातला तर बिब्ब्याच्या तेलाने त्या मुलाचे तोंड उतू जाते. त्यालाच ‘बिब्बा उतला’ असे म्हटले जायचे.

असा हा बिब्बा पूर्वी खूप उपयोगी होता. जनावरांना एखाद्याची नजर लागू नये . तसेच जनावराला ‘बाहेरवाश्याचे’ होऊ नये म्हणून, बैलांच्या गळ्यातील कंडयात तसेच गाई, म्हैस, शेळी व्यायला झाली म्हणजे तिच्या गळ्यातील कंडयात हा बिब्बा मानाने विराजमान व्हायचा. 

पूर्वी आजच्या सारख्या प्रत्येकाच्या पायात चपला नसायच्या. घरातील कर्ती माणसं सोडली तर बाकीच्या सदस्यांना चपला ह्या दुर्मिळच असायच्या. एकतर लोकांना रानामाळात, काट्याकुटयात अनवाणी पायाने भटकावे लागत. अशावेळी नजर चुकीने एखाद्याचा बाभळीच्या फांदीवर पाय पडून पायात काटा मोडला तर ती व्यक्ती दिडपायावर चालायची. जवळ कोणी बाई माणूस असेल तर तिच्या हातातील बांगड्यामध्ये असणारी पिन घेऊन किंवा बाभळी, बोरीच्या काट्यानेच काटा टोकरुन काढला जायचा. परंतु एखादा काटा खोलवर घुसून मोडला असेल तर तो या वरील उपचारांना दाद  द्यायचा नाही. मग टोकरलेल्या जागेवर रुईचा चीक लावून संध्याकाळ व्हायची  वाट पहावी लागे.

दिवस मावळताना घरी जाऊन हातातले काम बाजूला टाकून तो काटा सुईच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला जाई. किंवा एखाद्या जाणकार वयक्तीकडून तो काटा काढला जाई. मग काटा काढलेल्या जागी बिब्बा घेऊन त्याला वाकळेच्या सुईने किंवा दाबनाने टोकरून त्यात दाबन खुपसून ते पेटत्या दिव्यावर धरले जाई. जोपर्यंत बिब्ब्यातून चरचर असा आवाज घरत तेल गळत नाही, तोवर बिब्बा त्या दिव्याच्या ज्योतीवर धरला जाई. एकदा का बिब्ब्यातून गरम गरम तेल गळायला लागले की लगेच तो बिब्बा काटा काढलेल्या जागी पटकन दाबून धरला जाई. यालाच चरका किंवा चटका देने म्हणतात. चरका दिल्याबरोबर पायात काटा मोडलेली वयक्ती “आयो” म्हणून जी बॉंब ठोकायची, ती सगळ्या आळीला त्याचा पत्ता लागायचा. एवढी कळ बिब्ब्याचा चटका दिल्यावर त्या वयक्तीला सोसावी लागायची…! चटका दिल्यावर त्या ठिकाणी पाणी किंवा ‘पु’ होत नसे. पण एक व्हायचे एकदा का असा चरका दिला की दिड पायावर चालणारी वयक्ती सकाळी उठून दोन पायावर चालू लागे…! आणि आपले रोजचे काम त्याच जोमाने करे…!

पावसाळ्यात पायाला चिखल्या पडल्या, भेगा पडल्या, सांधे दुखणे, अर्ध शिशी यावर बिब्बा घालणे हा जालीम उपाय होता. 

ते सुगीचे दिवस होते. खळ्यात मळणीचे काम चालू होते. कडक उन्हामुळे का आणखी काही कारणाने माझ्या आज्जीचे डोके खूप दुखत होते. ते काही केल्या राहत नवहते. आम्ही त्यावेळी खळ्यावर काम करत होतो, तश्या ही परिस्थितीमध्ये आज्जी डोक्याला धडपा बांधून काम करत होती. एकदाचा सूर्य मावळला.धारा-पाणी करून आम्ही घरी आलो. घरी आल्या-आल्या मी आज्जीची चुलत जाऊ जिजीला बोलवून आणले. जिजी ‘बिब्बा घालण्यात पटाईत’ होती. आज्जीचे तिला सविस्तर सांगितले. मग मी डब्यातला बिब्बा अन दाबन काढून जिजीला दिले. आज्जी दुखण्याने कण्हत होती. मग चुलीत दाबनाचे टोक गरम करून जिजीने आज्जीच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि भुवयांच्या कडेला डोळ्याच्यावर तीन- तीन कडक चटके दिले. आज्जींने ती कळ कशी सोसली हे तिलाच माहीत.पण त्या चटक्याची कळ आज्जीपेक्षा मलाच जास्त बसली. मला घामच फुटला होता. मग त्यावर जिजीने चुलीतली राख घेतली आणि डोळ्यात जाणार नाही अश्या रीतीने जळलेल्या भागावर ती पसरली. आणि वरून फुंकर मारली….! काही दिवसातच आज्जी डोकेदुखीतुन बरी झाली.

असंच एकदा आमच्या पिराच्या पट्टीच्या बंधावरची बाभळ धनगरांनी ‘सवाळली’ होती. मी शहाणपणा करून त्या काट्याच्या फेसात विटी-दांडू काढायला गेलो. सोबत माझा मित्र संभा नलवडे ही होता. एक लाकूड हेरुन आम्ही लाकडाला हात घातला. आणि बाहेर ओढताना माझा हात निसटून मी मागे चार पावले फेकलो जाऊन काट्याच्या फांजरीत पडलो. माझ्या टाचेत कचकन काटा मोडला. “आज्जे” म्हणून मी मोठयाने किंचाळलो. संभाला काहीच कळेना. मी त्याला पायात मोडलेला काटा दाखवला. मग लगेच संभाने माझा पाय त्याच्या गुडघ्यावर धरून काटा मोडलेल्या ठिकाणी थुंकी लावून टाच स्वच्छ केली. आणि मला कानात बोटे घालायला लावून तो काट्याने काटा काढू लागला. बऱ्याच वेळाने त्याने काटा काढण्यात यश आले. मग आम्ही विठी-दांडू घेऊन घरी आलो. आज्जी-बाबांना न सांगताच आम्ही काटा लागलेल्या जागी चरका दिला. पण आमच्याकडून एक चूक झाली. चरका दिल्या जागी आम्ही चुलीतल्या राखे ऐवजी मातीचा फुफाटा लावला. आणि देवळाकडे खेळायला पळालो…!

मी सकाळी दात घासत नसे. अंघोळ ही करत नसे. मग नेहमीप्रमाणे उठलो. सकाळची सर्व कामे आटोपली, आणि चहा प्यायला घरी आलो. कसेतरी तोंड धुतले, आणि पायावर पाणी घेऊन पाय धुऊ लागलो. तर माझ्या पायाच्या डाव्या गोळ्याला अंड्याच्या आकाराचा फोड आलेला होता, त्यात माझे बोट घुसले. मी जोरात बॉंबलो. त्याबरोबर आज्जी बाहेर अंगणात आली अन, “काय झालं ? “म्हणून मला ओरडायला लागली. मग घडलेली सारी कहाणी तिला सांगितली. मग तर तिने मला, “किरड्या, मुडद्या…!”, म्हणून शिव्याचा भडिमारच केला…! त्याचे झाले होते असे.  आज्जी मारील म्हणून आम्ही घराऐवजी गुरांच्या गोठ्यातच चरका देण्याचे काम केले होते. त्यावर मातीच्या फुफाट्याऐवजी राख टाकायला हवी होती. कारण राख मऊ असलयाने ती ओलसरपणा लगेच खेचून घेते. आणि नेमकी तीच चूक आमच्या हातून झाली होती. रात्री जेवायला बसल्यावर माझ्या टाचेवर  डाव्या पायाच्या गोळ्याचा भार पडल्यामुळे बिब्ब्याचे तेल गोळयाला लागल्यामुळे तेथे बिब्बा उतला होता. त्याचा डाग आज हि माझ्या डाव्या पायाच्या गोळ्याला आहे.

बिब्ब्याचा आणखी एक काम मला माहित आहे, ते म्हणजे मी लहान असताना आज्जीने औंधच्या बाजारातुन कोंबड्याची अंडी ठेवण्यासाठी एक कळकाची करंडी विकत आणली होती. मग तिने एका जर्मनच्या तोंडफाटक्या गडूमध्ये दहा-,बारा  बिब्बे दाबनाने दुःखवून टाकले. तो गडू  जाळावर धरून ते चांगले रटारटा शिजविले. त्यातील बिब्ब्याचे सर्व तेल काढले आणि ते त्या नव्या कळकाच्या सर्व कांब्यांना आतून बाहेरून लावले. काय विशेष असेल ते असेल आज्जीलाच माहीत. पण ती करंडी आज ही  आमच्या गणेशवाडीच्या घरी सुस्थितीत आहे.

लेखक : आनंदराव रामचंद्र पवार(औंध)

जैतापूर – सातारा – मो.नं.9881791877

संग्राहक : श्री आशिष  बिवलकर

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments