सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “प्रसाद” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल परवा दोन तीन ठिकाणी गोपाळकाला प्रसाद म्हणून मिळाला.तो अगदीं घास घास मिळालेला गोपाळकाला खाल्ला अन् काय स्वादिष्ट लागला म्हणून सांगू, आणि शिवाय पोट शांत, तृप्त झाल्याची अनुभुती. खरचं ही किमया पदार्थाची नसून त्या प्रसादाची असतें.

ह्या प्रसादा वरील दोन तीन खुप छान पोस्ट वाचनात आल्या.सोशल मिडीया मुळे खूप सा-या पोस्ट वाचायला मिळतात. त्यापैकी काही पोस्ट ह्या खूप आवडतात,पटतात आणि नकळतच आपल्या मेंदूमधील एका कप्प्यात हलकेच विराजमान होतात. कधी त्या आवडलेल्या पोस्टच्या लेखकाचं नावं त्यावर असल्यास कळतं तर कधी त्यावर नाव नसल्याने ही आवडलेली पोस्ट कुणी बरं लिहीली असेल हा प्रश्न कायम मनात रेंगाळत राहातो.

सध्या सणवार,उत्सव,सोहळे ह्यांचे दिवस. त्यामुळे सर्वत्र मंगलमय ,धार्मिक वातावरण. ह्या सोहोळ्याची सांगता कशाने होत असेल तर ती होते प्रसादाने.

प्रसाद हा शब्द उच्चारल्याबरोबर तो एक पदार्थ, एक जिन्नस न राहता त्यांच रुपांतर एका अतूट विश्वास, भक्कम आधार, शांती,तृप्ती, समाधान देणा-या एका जादूमय शक्तीत होतं. एकवेळ आपल्या मनात पदार्थांविषयी मनात संदेह निर्माण होईल पण त्याचं प्रसादात रुपांतर झालं की मनात ना कुठली शंका येतं ना कुठला विकल्प येतं.

एखाद्या पदार्थाचं प्रसादात रुपांतर झालं की त्या पदार्थांचं एका चविष्ट, जिभेवर रेंगाळणा-या,मनाला शांती,समाधान आणि पोटाला तृप्ती पुरविणा-या पदार्थांत होतं.  

प्रसादाची खासियत म्हणजे तो जिन्नस प्रसादामध्ये जितका चविष्ट बनतो तितका तो एरवी कधी होतं नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर कुठल्याही पुजेनंतर वा भजनानंतर केलेल्या गोपालकाला ह्या प्रसादाची चव एरवी खायला मुद्दाम केलेल्या काल्याला कधीच येत नाही. प्रसादाची अजून एक खासियत म्हणजे कितीही मोठा व्यक्ती असला तरी हात समोर करून प्रसाद मागण्यात कधीच कमीपणा मानत नाही, जी व्यक्ती प्रसाद मागायला काचकुच करते तेव्हा एकतर श्रद्धेचा अभाव तरी असतो वा त्या व्यक्तीची प्रसाद आणि अन्य पदार्थ ह्यांच्यातील फरक ओळखण्याची ताकदच नसते.  गणपती, महालक्ष्मी वा अन्य कुठलाही महाप्रसाद ह्यांच्या प्रसादाच्या जेवणातील तृप्ती, समाधान हे फार आगळवेगळं असतं.

अशीच काल “प्रसाद”हा विषय घेऊन एक अनामिक पण अतिशय विलक्षण पोस्ट वाचनात आली. त्यातीलच काही आवडलेल्या मुद्द्यांची  आजच्या माझ्या पोस्ट मध्ये मदत घेते आहे.

 एकदा खूप अग्निदिव्य,संकट ह्यातून भरडल्या गेलेल्या एका अत्यंत धार्मिक,आस्तिक अशा गुरुजींना “हे सगळं कसं सहनं केलंत हा प्रश्न विचारल्या गेल्यावर  गुरुजी उत्तरले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही त्यामुळे सगळं सहज,सोप्पं आणि अनिवार्य, आवश्यक भाग म्हणून आपोआप स्विकारल्या गेलं” अजून पुढे मास्तर म्हणतात,”प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही”. प्रसाद हा माझ्या देवाचा प्रतिसादच मानला !’खरोखरच खूप काही शिकवून जाते ही मास्तरांची शिकवण.

खरोखरच मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा तर दूरच पण साधी चर्चाही करत नाही. आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. खरंच देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यात आलेले सगळे आंबट,गोड,कडू चवींचे प्रसंग. जणू ह्या शिकवणीने मनातील घालमेल, तळमळ सगळं जणू निमायला होतं.

प्रसादावरुनच अजून एक प्रसंग त्या पोस्ट मध्ये सांगितला. एका वृद्ध स्त्रीला प्रवचन झाल्यावर प्रसाद न मिळाल्याने ती प्रसाद मागायला येते. प्रसाद संपुष्टात आल्याने त्या वृद्धेला एक भक्त स्वतःजवळील लाडू देतो . तेव्हा ती आजीबाई त्यातील कणभर लाडू प्रसाद म्हणून घेते आणि उरलेला लाडू असचं कोणी बिनाप्रसादाचे जाईल त्यांच्यासाठी म्हणून वापस करते. ती आजीबाई खूप मौलिक गोष्ट सांगून जाते, ती म्हणते,”परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’ आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन,हाव वाढतच जाते,कुठे थांबायचं ते कळतचं नाही आणि  शेवटी ओंजळ रिती ती रितीच राहते. खरतरं आयुष्य हाच एक महाप्रसाद आहे. तो वाटता वाटता स्वतः घेतला तरच परमानंद मिळतो. त्या पोस्ट मधील एका आवडलेल्या वाक्याने आजच्या पोस्टची सांगता करते,”परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे…”

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments