सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.  शिक्षक हे समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हातूनच समाजाचा पाया रचला जातो. शिक्षकांची गुणवत्ता जितकी दर्जेदार तितकेच चांगले विद्यार्थी घडले जातात. समाजाचा मुलभूत घटक खरेतर शिक्षकच आहे. पुर्वी समाजात कोणतेही शुभकार्य असो , शिक्षकांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. इतकेच नाही तर गुरूजी, सर समोरून येताना दिसले की, आपोआप नजर खाली जाऊन शिक्षकांबद्दल विलक्षण आदर, त्यांचा दरारा मनात येत असे. पण आज कुठेतरी हे चित्र बदलताना दिसत आहे.

पुर्वी ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन शाळा आणि गुरूजी अथवा सर हेच होते. पण आज संगणक युग आले, लहान मुलांपासून ते काॅलेजात जाणाऱ्या युवकांपर्यंत हातात मोबाईल आले आहेत. जरूरी असणारी सर्व माहीती गुगलवर मिळू लागली आहे.  त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व कमी होत चालले आहे. दुसरे म्हणजे आज गल्ली गल्लीतून शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. यामुळे ज्ञानाचे मुख्य केंद्र असणारे, शाळा आणि शिक्षक यांचे समाजातील स्थान ढासळत चालले आहे. शिक्षकांबद्दल असणारा आदर, त्यांचा दरारा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये फारसा दिसून येत नाही.  काही ठिकाणी तर शिक्षकांना अपमानित करणे, उध्दटपणे बोलणे  असे घृणास्पद प्रकार घडताना दिसतात.  एकेकाळी शिक्षक हे समाजातले आदरस्थान होते. पण आज शिक्षकांचे समाजातील महत्त्व कमी होत चालले आहे.  ही स्थिती समाजासाठी घातकच ठरेल.  कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे, भावी नागरिक असतात.  शिक्षकांच्या हाताखालीच हे समाजाचे खांब मजबूत, गुणवंत, आदर्शवादी होत असतात. त्यामुळे शिक्षक हेच भावी समाजाचे ‘आधारवड ‘ आहेत. समाजाने सुध्दा शिक्षकांचे आजचे ढासळणारे स्थान,  महत्त्व इ. बाबींना सावरले पाहिजे.  ‘ शिक्षक हेच गावातील बहुमूल्य व्यक्तिमत्त्व आहे  ‘ हा विचार समाजमनावर कोरला जावा.

दुसरे म्हणजे स्वतः शिक्षकांनी सुध्दा आपले शाळेतील  ,समाजातील स्थान अबाधित राहील याकडे लक्ष देऊन उत्तम ज्ञानदान करावे. वर्गात शिकविताना ज्या विषयाचे संपूर्ण ज्ञान आहे असाच विषय अध्यापनास निवडावा. शिक्षकांनी आपल्यातील गुणवत्ता ही फक्त हुशार विद्यार्थी अधिक हुशार कसा होईल याकरताच न वापरता, वर्गातील सर्वसामान्य विद्यार्थीसुध्दा उत्तम व्हावा याकडे लक्ष केंद्रित करावे. आपले ज्ञान हे आभ्यासात मंद असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल ह्याकरिता प्रयत्न करावेत.  दर्जेदार शिक्षक , शाळा आणि विद्यार्थी या गोष्टीवर सुध्दा समाजाचे भवितव्य अवलंबून असते. वर्गात शेवटच्या बाकावरील विद्यार्थी आणि पहिल्या बाकावरील विद्यार्थी यात शिक्षकांची समदृष्टी असावी.  “आदर्श विद्यार्थी  ,आदर्श शाळा  ,आदर्श समाज  हे प्रत्येक शिक्षकाचे लक्ष्य असावे. शाळा हेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे त्यामुळे शाळेसारख्या पुण्यस्थानी शिक्षणाचा बाजार होवू नये याचे ध्यान आपण सर्व पालक ,विद्यार्थी  आणि सर्व शिक्षक मिळून ठेवले पाहिजेत.

सर्व शिक्षक बंधू -भगिनींना शिक्षकदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments