श्री प्रमोद वामन वर्तक

🌸 विविधा 🌸 

😅 उसळ आणि उसळी ! 😅🤣😇 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

सेन्सेक्सने उसळी घेऊन पासष्ट हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !

ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा, हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !

फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात निशिद्ध मानलं जात होतं !

माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको !  ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !

मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही  उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !

सुज्ञास अधिक मी अज्ञानी काय सांगणार ?

आपापल्याला जिभेला पर्यायाने खिशाला जपा!

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments