श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मन शुद्ध तुझं ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(मेजर शशीधरन नायर !… सर्वांच्या पुढे चालत होते. कामगिरीवर निघण्याआधी थोड्याच वेळापूर्वी फोनवरून आईशी बोलणं झालं होतं…!) इथून पुढे —

सैन्यतुकडी पुढे निघालेली असताना वाटेवर बेमालूमपणे लपवून, जमिनीत पेरून ठेवलेल्या एका सुरूंगाने घात केला आणि साहेबांना आणि जीवन गुरंग नावाच्या एका रायफलमन सैनिकाला पुरतं घायाळ केलं…. शर्थीचे वैद्यकीय उपचार व्यर्थ ठरले! 

तिरंगी राष्ट्रध्वज पांघरलेली, फुलांनी सजवलेली शवपेटी… त्यात मेजर शशीधरन साहेबांचा निष्प्राण देह…. घरी आला… शेवटच्या दर्शनार्थ… ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादत होता. तिला धावत जायचं होतं त्याचं अंतिम दर्शन घ्यायला…. पण पायांत शक्ती नव्हतीच आधी पासून, आणि आता त्या पावलांना आधार देणारे हातही निघून गेले होते…. जीवनरथाचं एक चाक निखळून पडलं होतं!

तिने त्याचा हात हातात घेतला….. त्या अचेतन हातामधली ऊब तिच्यासाठी अजूनही तशीच होती. ती थोडी मागे सरली…. तिच्या चाकाच्या खुर्चीमागे तो उभा असल्याचा भास झाला तिला… जणू तो म्हणत होता… ‘मी आहे तुझ्या पाठीशी!’ 

शूर वीर सैनिकाच्या मानवंदनेसाठी हवेत गोळीबाराच्या एकवीस फैरी झाडण्यात आल्या…. चिता धगधगू लागली.. ती आता स्तब्ध, नि:शब्द.. तिच्या डोळ्यांतील आसवांचा पूर पापण्यांशी झगडतो आहे…. त्याने तिला उचलून घेतल्याच्या आठवणींच्या डोहात ती बुडून गेलेली…. गोळीबाराच्या आवाजानं सैरभैर होऊन स्मशानातील झाडांवरून उडून गेलेली पाखरं आता पुन्हा फांद्यांवर येऊन बसली होती.. शांत! 

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील नेदुमबसरी गावचे विजयन नायर पुण्याजवळच्या खडकवासला येथील केंद्रीय जल संशोधन केंद्रात नोकरीसाठी आले होते. शशीधरन हे विजयन आणि लता नायर यांचे एकुलते एक सुपूत्र.

शशीधरन राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सैन्याधिकारी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या पदकवायतीमधील सावधान-विश्रामचा आवाज घरबसल्या ऐकता ऐकता मोठे झाले. देशभरातून आलेले सुदृढ, बुद्धीमान आणि आत्मविश्वासाने भारलेले युवक बघून त्यांनाही वाटायचं… ‘आपल्याही अंगावर हा गणवेश चढवता आला तर?’

तसं कुटुंबातलं, घरातलं फारसं कुणीही सैन्यसेवेत नव्हतं. याचाच अर्थ शून्यातून आरंभ करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं… एकट्यानं. त्यासाठीचा मार्ग शशीधरन यांनी निवडला आणि त्या मार्गावर आत्मविश्वासाने पावलेही टाकली.  

केंद्रीय विद्यालयांतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकू लागले. अर्थातच एन.सी.सी. मध्ये प्रवेश घेतलाच… कवायतीसाठी शशीधरन दर रविवारी वीस किलोमीटर्सचं अंतर सायकल हाकत यायचे आणि परत जायचे….. हे एवढं सायकलींग, त्यात पुन्हा कवायत… थकून जायला व्हायचं… स्वप्नं अशीच तर पूर्णत्वास जातात! 

एके दिवशी शशीधरन डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये दाखल झाले… आणि एक कणखर सैन्याधिकारी म्हणून भारतीय सैन्यात रुजू झाले!

पुण्यात सुट्टीवर आलेले असताना त्यांचा परिचय तृप्ती यांचेशी झाला… परिचयाचं रुपांतर प्रेमात झालं…. साखरपुडा झाला ! आणि काहीच दिवसांत तृप्ती यांना multiple arteriosclerosis नावाचा विकार जडल्याचं निष्पन्न झालं. या विकारात रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंती कडक होऊन जातात. रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. 

तृप्ती यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही बाब नायर यांच्यापासून लपवली नाही. मित्र-नातेवाईकांनी ‘हे लग्न करू नये’ असा सल्ला शशीधरन यांना दिला, पण साहेबांनी त्यांना साफ नकार दिला. आणि मोठ्या दिमाखात तृप्ती यांना मिसेस तृप्ती शशीधरन नायर असं हक्काचं नाव दिलं… एका सैन्याधिका-याची पत्नी म्हणून सन्मान प्राप्त करून दिला. 

पण पुढे दुर्दैवाने सौ. तृप्ती यांचा आजार बळावला आणि त्यांचे कमरेखालील शरीर लुळे पडले. मेजरसाहेबांनी तृप्ती यांची सर्वतोपरी काळजी घेतली… त्यांना अतिशय सन्मानाने वागवलं. हे दांमप्त्य अनेकांसाठी प्रेमाचा आदर्श बनलं! मेजरसाहेब ११ जानेवारी,२०१९ रोजी देशासाठी कश्मिरमध्ये हुतात्मा झाले!

लेफ्टनंट कर्नल संदीप अहलावत साहेब आपल्या ट्विटर पोस्ट म्हणतात… 

‘If you do not know or have not read about the love story of Maj Shashidharan and Trupti Nair. Then you do not know what pure and selfless love is!!’

‘मेजर शशीधरन आणि तृप्ती यांची प्रेमकहाणी तुम्हांला माहिती नसेल, तुम्ही ती वाचली नसेल तर तुम्हांला पवित्र आणि नि:स्वार्थ प्रेम माहित नाही, असं होईल!’     

“My dear countrymen, Please tell your children about Maj Nair, his life is a lesson in how to respect a woman and how to honour your words!!,”

“माझ्या देशवासियांनो, आपल्या मुलांना मेजर शशीधरन नायर यांच्याविषयी सांगा… शशीधरन यांचे आयुष्य म्हणजे महिलांना कसा आदर द्यावा, आपला शब्द कसा पाळावा, याचा आदर्श वस्तूपाठच आहे.”

अहलावत साहेबांचा हा सल्ला प्रत्येकाने मानला तर किती छान होईल. भारतीय सैन्यपरंपरेमध्ये महिलांचा सन्मान करणे, हे महत्त्वाचे तत्व मानले जाते आणि ते सैनिकांमध्ये बिंबवले जाते. मेजर शशीधरन नायर साहेबांनी हे तत्व प्रत्यक्ष जगून दाखवले. 

मेजर शशीधरन नायर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. साहेबांच्या हौतात्म्याच्या काहीच वर्षे आधी त्यांचे पिताश्री विजय नायर देवाघरी गेले होते! साहेबांच्या मातोश्री लताजी यांना, त्यांच्या पत्नी तृप्तीताईंना जीवनाची लढाई लढण्यासाठी परमेश्वर अधिक शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना!

३० जुलै हा शशीधरन साहेबांचा जन्मदिवस. हुतात्मा सैनिकांच्या जन्मदिनी, बलिदानदिनी, उमा कुलकर्णी या भगिनी या सैनिकांची आठवण आपल्याला करून देतात. त्यानुसार त्यांनी मेजर साहेबांची आठवण करून दिली. मेजरसाहेबांची प्रेरणादायी प्रेमकहाणी मला समजली तशी आपल्यासमोर नव्याने मांडली. आपणही इतरांना सांगाल ना?  धन्यवाद! जयहिंद! 

– समाप्त – 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments