श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके 

कॅप्टन अनुज नय्यर 

खूप व्रात्य होता हा मुलगा. उंच शिडशिडीत बांधा आणि अभ्यासासोबत खेळात अत्यंत कुशल ! पण त्याच्या खोड्या सर्वांना पुरत्या जेरीस आणणाऱ्या असत. गणिताच्या शिक्षकांचा हा तसा लाडका पण त्याच्या या स्वभावाचे गणित त्या शिक्षकांना कधी सोडवता आले नाही ! त्याला ते ‘उत्साहाचं गाठोडं’ म्हणत असत. 

असेच एका दिवशी साहेबांनी कुणाची तरी कुरापत काढली आणि सुंबाल्या केला. सर्वच त्याला शोधत होते… सरांनी तर चक्क फळ्यावर  लिहिले…. Wanted Anuj…. dead or alive! अर्थात हे सगळं गंमतीत! कारण  त्याच फळ्यावर दिलेलं गणित वर्गात अनुज शिवाय दुसरं कुणीच सोडवू शकत नव्हते! स्वारी मात्र दुसरीकडेच कुठे तरी नवीन खोडी काढण्यात दंग होती!

व्हॉलीबॉल खूप खेळायचा अनुज ! वडील म्हणायचे,”अरे, शर्ट खराब होईल !” तर यावर पठ्ठ्या शर्ट काढून खेळू लागला ! मग नंतर पँट खराब होईल असं वडील म्हणू लागले तेव्हा साहेब फक्त हाफ पँट घालून खेळत… पण खेळ पाहिजेच. पोराने चाळीतल्या एकाही घराची खिडकीची काच फोडायची म्हणून शिल्लक ठेवली नव्हती… पण तरीही त्याच्यावर कुणी डाफरलं नाही.. कारण पोरगं गुणाचं होतं. सर्वांच्या मदतीला धावून जायचं तर त्याच्या स्वभावाचा एक भागच होता.

पुढे अनूज आर्मी स्कूल मध्ये पुढील शिक्षणासाठी गेला आणि एक सच्चा सैनिक आकार घेऊ लागला… शाळेच्या अभ्यासात आणि खेळांच्या मैदानात ! पाहता पाहता अनुज सैन्य अधिकारी प्रशिक्षणासाठी निवडला गेला आणि तेथून उत्तीर्ण होऊन हा प्राध्यापक नय्यर साहेबांचा मुलगा सैन्य अधिकारीही झाला !

‘ तुला सैनिकच का व्हायचं रे? ‘ असं त्याला कुणीतरी तो अगदी लहान असताना विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, ” मला सियाचीन मध्ये जाऊन बघायचं आहे, थंडीचा माणसावर काय परिणाम होतो ते !”

आणि कर्मधर्मसंयोगाने त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली ती कारगिल मध्ये, आणि सहकारी होते लढाऊ जाट रेजिमेंटचे. एका वादळाला आणखी काय हवं असतं.. त्याला गर्जायचं असतं… फक्त वातावरण तयार झालं पाहिजे !

सैन्यात येऊन अनुजसाहेबांना जेमतेम दोन वर्षे झाली होती. जाट पलटणी मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून जबाबदारी मिळाली. मोकळा वेळ मिळाला की साहेब आई वडिलांना, मित्रांना पत्र लिहीत.. अगदी नेमाने ! इतके की सहकारी त्यांना letter man संबोधू लागले ! त्यांच्या अनेक पत्रांतून त्यांनी आपल्या देशसेवेच्या कल्पना मांडल्या होत्या. ‘सामान्य निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवणे हा आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे, असे ते नेहमी म्हणत. 

१९९९…. आपला देश क्रिकेटच्या विश्वचषकाच्या धुंदीत होता. तिकडे पाकिस्तान भारतीय हद्दीत घुसत होता…. लपून छपून ! छुप्या रीतीने पाकिस्तानी सैनिकांनी नागरिकांच्या वेषांत कारगिलच्या उंचच्या उंच पहाडांवर भारतीय भूभागावर हल्ला करता येईल अशा जागा पटकावून ठेवल्या होत्या. 

या घुसखोरीची खबर मिळाली तेव्हा तसा खूप उशीर झाला होता. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छिन्नविछिन्न देह पाहून आपल्या सैनिकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती ! आहे त्या परिस्थितीत, साधनसामुग्रीत भारतीय सैन्याने घुसखोरी मोडून काढण्याची मोहिम सुरू केली.

आपण युद्धक्षेत्रातच नेमणूकीस आहोत, याची खबर अनूजसाहेबांनी घरी लागू दिली नव्हती. उंच पहाडावरील एक महत्त्वाची जागा आपल्या ताब्यात घेणे अतिमहत्त्वाचे होते. सोळा हजारापेक्षा जास्त फूटावर असलेल्या त्या ठिकाणी चढाई करणे केवळ अशक्यप्राय गोष्ट. आणि हे करताना हवाईदलाची मदत घेणे गरजेचे होते. परंतू हवाईदलाची मदत पोहोचेपर्यंत थांबण्यात धोका होता.. पाकिस्तान आपली पकड अधिक मजबूत करू लागला होता… उशीर म्हणजे नुकसान !   

६ जुलै १९९९. उद्या सकाळी पहाडावर कब्जा करायला निघायचं होतं. अनूज साहेबांनी वडिलांना फोन लावला. सांगितलं नाही नेमकं कुठं हल्ला करणार आहेत ते, पण ‘मोठी कामगिरी करायला निघालोय’ एवढं मात्र सांगितलं.

प्राध्यापक नय्यर त्यांना म्हणाले होते, “देखो ! हार कर नहीं आना ! वरना मैं तुम्ही गोली मार दुंगा !” अर्थात हे सर्व प्रेमात आणि मुलावरच्या विश्वासानं बोललं जात होतं. हे दोघं केवळ मुलगा आणि वडील नव्हते तर दोन दोस्त होते, सखे होते !

त्यावर अनूज साहेब म्हणाले होते, “आपका बेटा हूँ… हारने की बात सोच भी नहीं सकता !” 

या पूर्वीच्या पत्रात त्यांनी स्पष्टच लिहिलं होतं…. ‘देशाप्रती असलेलं माझं कर्तव्य पूर्ण करण्याआधीच मरण्याएवढा मी बेजबाबदार नाही पपा ! भारतीय सेना आणि भारतीय जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो पाहून यावेळी मरणाचा विचार करणं अतिशय गैर ठरेल. शेवटच्या शत्रूच्या शरीरातून प्राण निघून जाईपर्यंत मी माझे श्वास घेतच राहीन… जयहिंद !’

पहाडावर चढाई सुरू झाली. पुढच्या तुकडीच्या हालचाली शत्रूने वरून अचूक टिपल्या आणि आगीचा वर्षाव सुरू केला. त्यात आघाडीचे सैन्याधिकारी, सैनिक जखमी झाले, धारातीर्थी पडले. मोहिम अयशस्वी होण्याची चिन्हे होती. 

दुसरी ताजी कुमक पहाडावर पाठवण्यात आली. यात अनूजसाहेब होतेच. पहाडावरून येणाऱ्या बातम्या त्यांच्याही कानी पडत होत्या. पहाडावर जाताना पुरेसा दारूगोळा सोबत असलाच पाहिजे, याचा त्यांना अंदाज होताच. वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता त्यांनी आपली बॅग़ भरायला आरंभही केला होता. एखादं लहान मूल जसं कुठं बाहेर जायचं असल्यास आपल्या पिशवीत जमतील तेवढी खेळणी भरून घेतं ना, त्यातीलच हा प्रकार. 

वरिष्ठ साहेब त्यांच्या पाठीमागेच उभे होते… त्यांनी हाक मारताच… अनूजसाहेब म्हणाले….”आया साहब ! बस और थोडे हॅन्डग्रेनेड्स ले लू ! इनकी जरुरत पडेगी !” जणू खेळायला निघालेल्या ह्या पोराचा खेळ प्रत्यक्ष मृत्यूच्या अंगणात ठरलेला होता. 

योगायोगाने जेव्हा अनूजसाहेब आपली युद्धाची तयारी करीत होते त्यावेळी दिल्लीत त्यांच्या मातोश्री त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांच्या पिशव्या भरत होत्या…. कारगिलमधे लेकाला पाठवण्यासाठी. आणि दुसऱ्या एका घरात आणखी एक व्यक्ती अनूजसाहेबांसाठी चॉकलेट्स पॅक करीत होती… त्यांची जीवाची मैत्रिण… टिम्मी ! 

थोड्याच दिवसांत अनूज आणि टिम्मी विवाहबद्ध होणार होते… दोघांनी एकाच नजरेने स्वप्नं पाहिली होती ! साहेबांच्या बोटांत सोन्याची एंगेजमेंट रिंग शोभत होती. मोहिमेवर निघताना अनूजसाहेबांनी आपली ही अंगठी आपल्या मोठ्या साहेबांच्या हवाली केली…. ” मी परत नाही येऊ शकलो तर ही माझी लाखमोलाची ठेव माझ्या प्रेयसीच्या हाती सोपवा !”

चढाई सूरू झाली ! अनूजसाहेबांचे वरिष्ठ मेजर रामपाल साहेब आघाडीवर होते. लढताना जबर जखमी झाले. त्यांना मागे आणावे लागले. त्यांची जागा अनूजसाहेबांनी घेतली. त्यांना आता कॅप्टन म्हणून बढती मिळाली होती… भर युद्धाच्या दिवसांत ही बढती म्हणजे देशाने खांद्यावर दिलेली एक मोठी जबाबदारी. 

निकराचा हल्ला करीत निघाले साहेब आणि त्यांचे बलवान जाट सैनिक. चढाई सोपी नव्हती… सोळा हजार फूट…. कडेकपारी…. पाय निसटला की जीवन निसटून जाईल याची खात्री… वरून प्रचंड गोळीबार होत होता. 

सैनिकांजवळचे अन्न पदार्थ संपले ! पोटात भुकेचा वणवा भडभडून पेटलेला होता. पण लढण्यासाठी दारूगोळा महत्त्वाचा होता. अन्नाचं ओझं होईल….! त्या बहाद्दरांनी अन्नाऐवजी बंदुकीच्या गोळ्या, हातबॉम्बचं ओझं सोबत नेणं पसंत केलं…. ‘सैन्य पोटावर चालतं’ ही म्हण या शूरांनी इथं खोटी ठरवली एका अर्थानं !

उपाशीपोटी लढणं….. कल्पना तरी करवते का सामान्य माणसांना? पण असामान्य माणसांची कथा आहे ही…. आणि खरी आहे ! 

अनूजसाहेब सर्वांत पुढे होते. उंचावरच्या सांदी कोपऱ्यात पाकिस्तानचे चार बंकर्स होते. त्यात बसून ते आरामात फायरिंग करीत होते. साहेबांनी गोळीबाराच्या पावसात पुढे धाव घेतली आणि पहिले तीन बंकर्स उध्वस्त केले… त्यातील नऊ शत्रू थेट वरती पाठवले…. त्यांच्या मशिनगन्स निकामी केल्या…. पण… चौथा बंकर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात तिकडून आलेल्या एक आर.पी.जी.गोळ्याने त्यांच्या शरीराचा वेध घेतला…. रॉकेट प्रॉपेलर गन ! हिच्यातून गोळी नाही तर बॉम्बच डागला जातो एक प्रकारचा. त्या अस्त्राने या अभिमन्यूचे प्राण हिरावून नेले ! 

तोवर कामगिरी फत्ते झाली होती…. पहाड ताब्यात आला होता… पाकिस्तानची राक्षसी पकड त्यामुळे ढिली पडणार होती ! पुढे विजय आवाक्यात होता, दृष्टीपथात होता ! पण हे पहायला कॅप्टन अनूज नय्यर आणि त्यांचे काही साथीदार या जगात नव्हते ! 

प्राध्यापक एस.के.नय्यर यांच्या घरातील टेलिफोन खणखणला…. लष्करी अधिकारी होते फोनवर…. “जयहिंद सर….” आणि असंच काही बोलून ते अधिकारी नि:शब्द झाले काही वेळेसाठी….

नय्यर साहेब म्हणाले….. ” माझा लेक लढतानाच मरणाला सामोरं गेला ना?”

” सर, केवळ भारतीय सेनाच नव्हे तर संपूर्ण भारत देश आपल्या सुपुत्राचा ऋणी राहील कायम !” ते अधिकारी कसेबसे म्हणू शकले ! काय बोलणार अशा वेळी? 

केवळ चोवीस वर्षे वयाचे, केवळ दोनच वर्ष लष्करी सेवा झालेले कॅप्टन अनूज नय्यर… मरणोपरांत महावीर चक्र ! त्यांनी आपले शब्द खरे केले…. शत्रूचा नि:पात झाल्यावरच आपला श्वास थांबवला ! 

 ७ जुलै….. या पराक्रमाचा स्मरण दिन ! भावपूर्ण आदरांजली हे महावीर योद्धा !

…  जय् हिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments