श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “अजूनही आशा आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

(सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी लिहिलेले आणि नंतर गायब झालेले लिखाण आज अचानक जुनी कागदपत्रे चाळताना सापडले आणि वाचल्यानंतर हे जाणवले की त्यातील बहुतेक सारी मते आजही मला जशीच्या तशी मान्य आहेत)

लालयेत पंच वर्षाणि  दश वर्षाणि ताडयेत ।

प्राप्तेतु शोडषे वर्षे,  पुत्रं मित्रवदाचरैत ।।

 असे एक संस्कृत वचन आहे.  मुलांचे पाच वर्षे लाड करावेत, दहा वर्षे धाकात ठेवावे आणि सोळाव्या वर्षानंतर मुलांशी मित्राप्रमाणे वागावे असा सरळ अर्थ.

मूल झाल्यावर पहिली पाच वर्षे लाडाची असतात. त्यावेळी मुलं हा आपला आनंद असतो.  लाडाच्या या पाच वर्षात आपण मुलांपासून मिळवलेला आनंद अवर्णनीय असतो व आपल्या आयुष्याला तो अर्थ प्राप्त करून देत असतो.  नंतरची दहा वर्षे मुलांवर संस्कार करायचे असतात.  अशावेळी मुले ही आपली जबाबदारी असते.  त्यांना जबाबदार समाजघटक बनवण्यासाठी सुसंस्कारित करणे व उत्तम नागरिक म्हणून तयार करणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असतेच असते. त्यासाठी त्यांना धाक दाखवून का होईना परंतू सुसंस्कारित करणे व पुढील आयुष्यासाठी त्यांचा पाया भक्कम करणे ही जबाबदारी असते.  त्यानंतर मुले पालकांच्या ऐकण्याच्या पलिकडची असतात.  त्यामुळे त्यांच्याशी मित्रत्वाचे म्हणजेच सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय कौटुंबिक संबंध सुरळीत रहात नाहीत. जबाबदारीची दहा वर्षे संपल्यावर मुलांना त्यांच्या पायावर उभे राहून पुढील आयुष्याच्या वाटचालीत त्यांचे मित्र, साथीदार,  भागीदार या भूमिकेतून त्यांच्याशी वागून कौटुंबिक संतुलन टिकवणे हे आपल्या स्वतःच्या सुखा समाधानासाठी आवश्यक असते.

 मुलांच्या एकूण जडणघडणीत व पालन पोषणात कुठेही गुंतवणूक हा विचार करणे ही गोष्टच मला चुकीची वाटते.  मुलेही म्हातारपणाची काठी वगैरे जुने विचार आजच्या काळाच्या संदर्भात योग्य आहेत की नाही याचा विचार निश्चितच आवश्यक ठरेल.

पूर्वीच्या पालकांच्या व आत्ताच्या पालकांच्या परिस्थितीत, मनस्थितीत तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीत खूपच फरक पडलेला आहे.  चिंतायुक्त पालक पूर्वीचेही होते व आजचेही आहेत.  परंतु त्यांच्या चिंतांमध्ये फरक आहे.  पूर्वी फक्त एकच माणूस कमावत असे.  त्याच्या कमाई मध्ये घरखर्च चालवणे ही तारेवरची कसरत असे. आवश्यक गोष्टींसाठी उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना नाकीनऊ येत असत. त्यामुळे चैनीच्या गोष्टी करणे अशक्यच असे. आजचे पालक त्यामानाने जास्त कमावतात . बहुतांश घरात आई वडील दोघेही कमावते असतात. स्वतःच्या सुखात फारशी तडजोड न करता त्यामध्ये मुलांचेही कोड कौतुक करणे, सर्व कुटुंबाने मिळून काही किमान चैनीच्या गोष्टी करणे सर्वमान्य झाले आहे.

यामध्ये स्वतःच्या सुखाला मुरड घालून फक्त मुलांसाठीच काही करणारे पालक अपवादात्मकच.  त्यामुळे मुलांनी म्हातारपणाची काठी बनावी अशी अपेक्षा ठेवणे हीच चुकीच्या विचारांची गंगोत्री ठरावी.  जे पालक अशा गुंतवणुकीच्या अपेक्षेने मुलांसाठी काही करत असतील तर ही रिस्की गुंतवणूक आहे हे ध्यानात ठेवावे.  मुलांनी जर पुढे विचारले नाही तर ज्याप्रमाणे चुकीच्या पतपेढ्या, बँका वगैरे मधील अधिक व्याजाच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक कधीकधी बुडीत होते तशी ही गुंतवणूक सुद्धा बुडीत होण्याची शक्यताही गृहीत धरली पाहिजे. नातेसंबंधातील प्रेमळ सहजीवनाच्या विचारापेक्षा व्यावहारिक विचार जेव्हा प्रबळ होतात त्यावेळी त्यात व्यवहारांमधील रिस्क ही सुद्धा गृहित धरली पाहिजे. 

पुराण काळाचा विचार केल्यास मुले ही म्हातारपणाची काठी वगैरे विचार त्यावेळी नसावेत असे वाटते.  पंचवीस वर्षे गृहस्थाश्रमाची पूर्ण केल्यावर म्हणजे साधारणपणे मुले गृहस्थाश्रमाच्या टप्प्यावर आल्यावर पालकांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची जी समाजव्यवस्था होती असे ऐकिवात आहे ती चांगलीच.   साधारण २५ ते ३० वर्षा दरम्यान गृहस्थाश्रम व 55 ते 60 वर्षा दरम्यान वानप्रस्थाश्रमात प्रवेश ही खरेतर आदर्श समाजव्यवस्था म्हटली पाहिजे.  आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास रिटायरमेंट नंतर पालकांनी वानप्रस्थ स्वीकारणे हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह ठरेल.  वानप्रस्थाश्रम म्हणजे आजच्या संदर्भात विचार करता मुलांच्या संसारात लुडबूड न करता स्वतंत्रपणे राहून समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवणे.  स्वतःचे अनुभव, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन यावर आधारित एखादे  समाजोपयोगी कार्य निरपेक्ष बुद्धीने पत्करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आयुष्याची पुढील वाटचाल करणे.  आज अनेक समाजोपयोगी संस्था कार्यरत आहेत.  अनेक संस्था उत्तम कार्य करतात.  फार मोठ्या धनलाभाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या चरितार्थाच्या गरजेपुरते अर्थार्जन करून अशा संस्थांच्या कार्यात झोकून देण्याची आज गरज आहे.  अशा गरजांची पूर्तता या वानप्रस्थाश्रम संकल्पनेतून आजच्या काळात करता येणे शक्य आहे.  मुलांच्या संसारात लुडबूड न करता समाजोपयोगी कार्याचा आदर्श त्यांचे पुढे ठेवला तर त्यांनाही पालकांविषयी निश्चितच आदर वाटेल.

यावर कुणी असे म्हणतील की असले फालतू व्यवहारशून्य आदर्शवाद नकोत. 

प्रॅक्टिकली बोला.

ठीक आहे, प्रॅक्टिकली बोलू.

पहिली पाच वर्षे तुम्ही मुलांसाठी काय करता हो ? खरं म्हणजे तुम्ही मुलांच्या कौतुकात येवढे मग्न असता की, सर्व जगाचे भान विसरता.  जळी स्थळी  मुलांचा विषय व कौतुक याने तुमचे आयुष्य भरून व भारून गेलेले असते.  तो आनंद, ते भारलेपण व कौतुकाची नशा आयुष्यामध्ये येवढे विविध रंग भरते की,  तुमचे आयुष्य हे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे झालेले असते. म्हणजे या पाच वर्षात तुम्ही मुलांसाठी जेवढे करता त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक आयुष्यात सुख, आनंद मिळवता.  म्हणजे पहिली पाच वर्षे तुम्ही फायद्यातच असता.  पुढील दहा वर्षांचा विचार करता असे पहा की तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, तुम्हाला अक्षय सुखाचा झरा देणाऱ्या कुटुंबाच्या सौख्यासाठी ( म्हणजे त्यात तुमचे सुख सुद्धा आहेच )  पडलेली जबाबदारी तुम्ही स्वीकारली, म्हणजे तुम्ही मुलांसाठी काय केलं ?  जे केलं ते स्वतःच्या कर्तव्य पूर्तीसाठी केलं. म्हणजे ही दहा वर्षे ना नफा ना तोटा या परिस्थितीत.  पंधरा वर्षानंतर आपण मुलांचे कौटुंबिक भागीदार म्हणजे पुन्हा बरोबरीतच. आता व्यावहारिक विचार असा की, तुम्ही गृहस्थाश्रमाच्या काळात जी काही संपत्ती मिळवली असेल तेवढाच तुमचा भाग. तो जर तुम्ही मुलांना दिलात तरच फक्त ती गुंतवणूक. यात काहीही वडिलोपार्जित इस्टेटीचा भाग नाही आणि जर तुम्ही वडिलोपार्जित इस्टेट सुद्धा खर्च केली असेल तर तुम्ही मुलांचे कर्जदारच.  अन् स्वकष्टार्जित संपत्ती मुलांना देतानाच जर तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांचे समोर मांडून अथवा लेखी एग्रीमेंट करूनच त्यांना दिली तर व्यवहाराचा भाग पूर्ण झाला.  आणि ही एवढीच फक्त तुमची म्हातारपणाची काठी झाली.  परंतु या पद्धतीने तुम्ही काही समाजसेवी संस्थांशीही एग्रीमेंट करू शकता. त्यासाठी ते मुलाशीच केले पाहिजे असेही बंधन कुठाय ?  मुलांशी पटत नसल्यास व तुमचे कडे संपत्ती असल्यास म्हातारपणी जगणे कठीण व अशक्य नाहीच.  त्यासाठी म्हातारपणाची काठी विकत घेण्याची तुमची क्षमता असतेच.  ज्यांची अशी काठी विकत घेण्याची क्षमता नाही त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यात झोकून देण्याची गरज व आवश्यकता आहेच.  सहसा सध्या प्रत्येकजणच वृद्धापकाळाची सोय म्हणून काही उत्पन्नाची तजवीज करून ठेवत असतोच.  फक्त सर्वात दुर्दैवी असे पालक की जे दुर्धर रोगाने आजारी आहेत, मुले विचारत नाहीत अथवा प्रॅक्टिकली त्यांना ते शक्य होत नाही व जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही.  या व्यक्ती मात्र खरोखरच दुर्दैवी त्यांचेसाठी सरकारनेच काही सोय करावी.  एक पर्याय असा की त्यांचा वृद्धापकाळाचा खर्च सरकारने उचलावा.  अथवा त्यांचेसाठी इच्छामरणाचा कायदा करावा.  माझ्यामते मुले ही म्हातारपणाची काठी नव्हेतच  आणि ती गुंतवणूक तर अजिबातच नाही व जबाबदारी फक्त मर्यादित कालावधी पुरतीच. पालकत्व हे आव्हान नव्हे तर ती कौटुंबिक सुखांसाठी आपण होऊन स्वीकारलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी ज्यांना नको आहे व टाळताही येत नाही त्यांना वाटणारे आव्हान. 

शेवटी आपल्या पिढीने तरी असे काय भव्यदिव्य केलंय की ज्यामुळे पुढच्या पिढीने आपले उपकार मानावेत ?  म्हणूनच या एकविसाव्या शतकातील तरुणांना मी म्हणतो –

एकविसाव्या शतकातील तरुणांनो,

आम्ही तुमचे बाप आहोत,

म्हणूनच,

तुम्हाला मिळालेला जन्मसिद्ध शाप आहोत. आम्हीच दिले तुम्हाला,

भ्रष्ट स्वातंत्र्याचे वरदान ?

सामाजिक अराजकतेचे दान ?

ढासळत्या पर्यावरणाचे थैमान.

आम्हीही होतो तरुण एकेकाळी,

पण नाही थोपवू शकलो हा प्रवाह,

नाही परतवू शकलो या लाटा,

पराभूत अन्  प्रवाहपतिताचं जिणं, 

जरी जगलो तरी……….

नाही गेलो भोव-याच्या तळाशी. 

प्रवाहातील पत्थरांना चुकवत,

कपाळमोक्ष नाही होऊ दिला.

म्हणूनच अजूनही अशा आहे,

प्रवाह वळवता येईल,

बिघडलेलं सावंरता येईल,

सुकृताच्या अनुभूतीवर

विकृताचा आकृतिबंध सुधारता येईल.

खरंच येईल तरुणांनो,

आम्हाला आशा आहे.

आमच्या शापित जीवनाला,

शिव्या घालत बसण्यापेक्षा,

आमच्या सुकृताच्या अनुभूतीचं सार जाणून घ्या. विचार करा, कृती करा.

या कृतीत आमचं जीवन संपून जाणं

अनिवार्य असेल तरी कचरू नका,

पण प्रवाहपतित होऊ नका.

इतिहासाची पुनरावृत्ती करू नका.

भविष्यकाळाच्या भल्यासाठी,

भूतकाळाच्या छातीत खंजीर खुपसणं,

आवश्यकच असेल तर ………..

हे नव्या पिढीतील ब्रुटसांनो, 

हा वृद्ध सीझर, निशस्त्र होऊन,

तुमचा वार झेलण्यास सिद्ध आहे,

अन गर्जना करतोय,

देन सीझर मस्ट डाय.

देन सीझर मस्ट डाय.

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments