श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-1 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

१९७१ च्या युद्धात कामगिरी बजावल्यानंतरही आम्ही बराच काळ पाकिस्तान सीमेवरच तैनात राहिलो होतो. आमचे तोफखाना दळाचे चौदावे फील्ड रेजिमेंट, जून १९७३ मध्ये जमशेदपूरला आले. Adjutant या पदावर मी अजून नवखा होतो. अत्यंत ‘कडक’ अशी ख्याती असलेले लेफ्टनंट कर्नल रामचंद्र परशुराम सहस्रबुद्धे हे आमचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते. 

जमशेदपूरच्या टेल्को कंपनीमध्ये कामाला असलेला एक माजी सैनिक, गुरबचन सिंग, एके दिवशी सकाळी मला भेटायला आला. तसा तो आमच्या युनिटमध्ये वरचेवर येत असे. माजी सैनिक असल्याने, रेशन, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि दारूच्या बाटल्या आर्मी कॅन्टीनमधून विकत घेण्याचा हक्क त्याला होता. त्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही त्याच्याकडे होती. टेल्कोच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा कोटाही तोच घेऊन जात असे. 

पंजाब रेजिमेंटचे, कर्नल ब्रार नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी टेल्कोच्या प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे जनरल मॅनेजर होते. गुरबचन सिंग हा त्यांचा ड्रायव्हर होता. टेल्को व टिस्कोच्या इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीही तो क्वचित चालवीत असे. अर्थातच, एक निष्णात ड्रायव्हर असल्याने, टेल्को (टाटा मोटर्स) आणि टिस्को (टाटा स्टील) अश्या मातबर कंपन्यांसाठी तो एक मोलाचा कर्मचारी होता.  

आमच्या युनिटसोबत संलग्न असलेल्या, ‘इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनियर्स’ (EME) या विभागाच्या सर्व सैनिकांशी गुरबचन सिंगचा परिचय होता. तसेच, आमच्या रेजिमेंटचे नायब सुभेदार/सुभेदार पदावरील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO), आणि नाईक/हवालदार पदावरचे नॉन कमिशन्ड ऑफिसर (NCO), हे सगळेच त्याला ओळखत होते. 

एरवी त्याचा संबंध मुख्यतः आमच्या युनिटच्या क्वार्टर मास्टर (QM) सोबतच येत असल्याने, मी त्याला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. त्या दिवशी मात्र आमच्या QM ने गुरबचन सिंगला माझ्याकडे पाठवले, कारण त्याचे सर्व्हिस बुक एखाद्या सेनाधिकाऱ्याकडून सत्यापित करून घेणे आवश्यक झाले होते. 

गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे, आणि त्यालाही सोबत घेऊन आमचे हेडक्लार्क माझ्याकडे आले. माझ्या नावाचा व आमच्या युनिटचा शिक्का त्या कागदांवर छापणे आणि मी सही करणे, असे एखाद्या मिनिटात होण्यासारखे काम असल्याने, सर्व सज्जता करूनच हेडक्लार्क माझ्याकडे आले होते. परंतु, निव्वळ ‘सह्याजीराव’ बनून काम करणे मला मान्य नव्हते. 

मी गुरबचन सिंगच्या आर्मी सर्व्हिससंबंधी सखोल चौकशी केली. त्याने सांगितले की, तो पूर्वी EME मध्ये व्हेईकल मेकॅनिक (VM) होता. खात्री करून घेण्यासाठी, आमच्या लाईट रिपेअर वर्कशॉप (LRW) मधल्या VM ला बोलावून मी विचारले असता, त्यानेही मला सांगितले की प्रशिक्षणकाळात गुरबचन सिंग त्याचा बॅचमेट होता. 

ही सर्व चौकशी चालू असतानाच अचानक, CO साहेबांनी माझ्यासाठी बझर वाजवल्याने मला तातडीने त्यांच्याकडे जावे लागले.  

CO साहेबांच्या ऑफिसमधून परतल्यावर माझ्या मनात नेमके काय आले देव जाणे, पण मी गुरबचन सिंगच्या कागदांवर सही करण्यास नकार दिला. आमच्या युनिटचे सुभेदार मेजर आणि हेडक्लार्क हे दोघेही माझ्या निर्णयामुळे थोडेसे नाराज दिसले.

त्यानंतर मी हेडक्लार्कना आदेश दिला की, सिकंदराबादजवळील त्रिमुलगेरी येथे असलेल्या EME सेंटरमध्ये, गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे पाठवून, त्यांची खातरजमा करून घेण्यात यावी. हे ऐकल्यानंतर मात्र, माझे डोके चांगलेच फिरले आहे, याबद्दल बहुदा आमच्या हेडक्लार्कची खात्रीच पटली असणार! प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला तरीही, दैनंदिन कार्यालयीन कामात तसा मी नवखाच होतो. त्यामुळे, हे खबरदारीचे पाऊल उचलणे मला आवश्यक वाटले होते. 

“Adjutant साहेब सध्या व्यस्त आहेत पण यथावकाश तुझे काम होईल” असे काहीतरी गुरबचन सिंगला तात्पुरते सांगून हेडक्लार्कनी वेळ मारून नेली असावी. 

आमच्या युनिटकडून गेलेल्या पत्राला आठवड्याभरातच EME सेंटरमधून तारेने उत्तर आले. त्यामध्ये लिहिले होते, “चीन सीमेवरील धोला-थागला जवळील चौकीवर तैनात असताना, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी, चिनी हल्ला होताच, गुरबचन सिंग हा शिपाई शत्रूसमोरून पळून गेला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा न समजल्याने, त्याला ‘बेपत्ता किंवा मृत’ घोषित केले गेले होते. आता तुम्हाला तो जिवंत सापडलेला असल्याने, त्याला त्वरित ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे. आम्ही आरक्षी दल पाठवून त्याला आमच्या ताब्यात घेऊ.”

सोप्या शब्दात सांगायचे तर, आर्मीच्या कायद्यानुसार तो एक पळपुटा किंवा ‘भगोडा’ शिपाई होता! आता त्याची रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई केली जाणार होती!

ती तार वाचून युनिटमधील आम्हा सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला. आमचे CO, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे तर माझ्यावरच भडकले. त्यांना न विचारता, न सांगता, मी अश्या प्रकारचे पाऊल का आणि कसे उचलले याबद्दल CO साहेबांनी मला जाब विचारला. 

“सर, EME सेंटरकडे चौकशी करण्याची सणक सहजच माझ्या डोक्यात आली. तोपर्यंत तुम्ही ऑफिसमधून निघूनही गेला होतात. परंतु, तुम्ही दिलेली शिकवण माझ्या चांगली लक्षात होती की, ‘कोणत्याही कागदावर डोळे झाकून सही करू नये’.” 

माझे उत्तर CO साहेबांना नक्कीच आवडले असावे. कारण ते एकदम शांत झाले आणि त्यांनी आमच्या युनिटचे 2IC, मेजर कृष्णा आणि बॅटरी कमांडर, मेजर (पुढे निवृत्त मेजर जनरल) महंती या दोघांनाही बोलावून घेतले. आम्हा सर्वांच्या विचार-विनिमयानंतर, एकमताने असे ठरले की, आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल टेल्कोच्या अधिकाऱ्यांना, अगदी निवृत्त कर्नल ब्रार यांनाही, सध्या काहीच कळवायचे नाही. महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.  

– क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments