श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है  एक रेखाचित्र उनके गाँव का जो निश्चित ही  निसर्गाचं अमोल दान (निसर्ग का अमोल दान )है। 

 

☆ निसर्गाचं अमोल दान☆

 

सातारा आमचं गाव.आमचं घर अजिंक्यताऱ्याच्या पायाशी परळी-सजजनगड-कास रस्त्यावर.पहाटे फिरायला गेलं अन् बोगद्याबाहेर पडलं की,डावीकडं खिंडीतला गणपती-कुरणेश्वर,तर उजवीकडे परळीचा डोंगर अर्थात “सज्जनगड “अन् समोर पसरलेला हिरवागार देखण्या डोंगरांनी सजलेला नयनरम्य परिसर! सारंच सुंदर !!

अजिंक्यताऱ्याच्या दक्षिण बाजूस सोनगावच्या दिशेनं चालायला लागलं की उतारावरुन रात्रभराच्या मुक्कामाला आलेले निळे निळे मोर शेतातले दाणे खाण्यासाठी म्याव,म्याव आवाज करत उतरत असतात,माणसांच्या चाहुलीने ते पुन्हा ओरडत वरच्या दिशेनं पळत सुटतात.

उगवतीला पसरलेली तांबूस छटा पाहून पक्षांचा किलबिलाट सुरू झालेला असतो.मधूनच भारद्वाज पक्षांचा हूं  हूं असा आवाज ऐकू येतो, आणि त्याच दर्शन झालं तर खूप छान!अन् त्याचं समोरुन फ्लाईंग दर्शन तर एकदमच भारी !!लहानपणी तर आमच्यासाठी ते खूप अप्रूप वाटायचं !!

पण आज आम्ही फिरायला आलो ते दुपारी,कारण पुण्याचा मुलगा नातू सगळेजण गणपतीसाठी आलेले.म्हणाले चला आपण कासला जाऊया.आणि हा सीझन फुलांचा त्यामुळे पर्वणीच !

कासच्या फुलांचा बहर सुरू झालेला सगळीकडे विविध रंगछटांची सुंदर फुलं बहरलेली दिसत होती.

कास पठार सुरू होण्यापूर्वी रस्त्याकडेच्या दोन्ही बाजूंची शेतं व पठारी भागावर जिकडं नजर जाईल तिकडं पिवळी हडूळ “सोनकीची “फुलं फुललेली दिसत होती.जणूं धरतीनं हळदुल्या रंगाची दुल ई पांघरल्यासारखी वाटत होती.

आम्ही जिथे गाडी थांबवून उभे होतो तिथून डावीकडं उरमोडी जलाशयाच्या लक्ष दर्पणातून सज्जनगडाचं पावन प्रतिबिंब खुणावत होतं,तर उजवीकडं कण्हेर धरणाचं आरस्पानी सौंदर्य डोळे दिपवीत होतं.दोन्ही बाजूंचे डोंगर उनसावलीच्या खेळामुळं हिरव्या-पोपटी रंगाचे रेशमी शेले पांघरुन बसलेत असं वाटतं होतं.किती पहावं आणि काय-काय पहावं असं होतं इथं आलं की !

डोंगर उतारावरुन खाली नजर टाकली की,गावकुसातल्या श्रमदान्यांनी खोदलेल्या चरांची सुंदर नक्षीदार  रांगोळी अन् त्यातून खाली वाहून गेलेल्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले पाझर तलाव, छोटीमोठी तळी , हिरवीगार भातशेती,असं निसर्गाचं मनोहारी दृश्य दिसत होतं.

खरोखरी निसर्गदेवता मानवाला किती भरभरून देत असते.पण त्यानं ते जपलं नाही, वृक्षतोड,वणवे लावणं असं केलं तर आपणच आपल्या हातानं आपला ” केरळ  उत्तरांचल “करु हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं व निसर्गाच्या या अनमोल ठेव्याला अबाधित राखावं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे.!

दिवस मावळायला आला होता म्हटलं आता निघायला हवं तेवढ्यात भटकंतीला गेलेले माझे नातू मुलगे सुना सगळे आले अन् मला मोबाईलमध्ये काढलेले सुंदर कासची फुलं, सूर्यास्ताचे फोटो दाखवूलागले मी पाहिले तुम्हीही पहा..!!!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा 

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments