डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ परिवर्तन — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

त्या सगळ्या उच्चभ्रू बायका. नवरे अत्यंत श्रीमंत, म्हणून याही श्रीमंती मिरवणाऱ्या. पैसा मिळवायला कष्ट करावे लागतात, याची काडीमात्र जाणीव नसणाऱ्या —-

गीता अशीच, हाय सोसायटी लेडी. मस्त शोफरड्रिव्हन कार मधून फिरावे, खूप खरेदी करावी, क्लब मध्ये जावे, हेच आयुष्य. गीताला दोन मुले. समीर आणि सायली. सायली चांगली शिकली आणि 

तिच्या मध्यम वर्गीय मैत्रिणीच्या भावाच्या प्रेमात पडली. गीता म्हणाली, ” सायली, अग कोण शोधलास हा इतका सामान्य मुलगा? काय ग तो साधा चार खोल्यांचा फ्लॅट आणि काय ती माणसं. तुझा निभाव लागणार नाही असल्या घरात. मी किती छान मुलगे बघत होते तुझ्यासाठी. ‘

सायली शांतपणे म्हणाली, “ आई, बस झाल्या तुझ्या त्या श्रीमंत आणि उच्च कल्पना. मला नाही आवडत ते मूर्ख श्रीमंत मुलगे. मला खात्री आहे, मी कपिल बरोबर नक्की सुखी होईन. काय ग कमी आहे त्याच्यात? एवढा छान शिकलेला, किती चांगला पगार आहे त्याला. आई, मी कपिलशीच लग्न करणार. बाबांना सुद्धा फार आवडलाय कपिल. सून आण हो तुझ्या असल्या उच्च हाय ब्रो सोसायटीची. ” 

सायलीपुढे गीताचे काहीही चालले नाही. — खरं तर कपिल मध्ये नाव ठेवायला जागाच नव्हती. दिसायला छान, वागायला अतिशय सभ्य आणि हुशार मुलगा होता तो. त्याचे आईवडील, बहीण सगळे खूप चांगले, आणि सायली त्यांना फार आवडायची. पण गीताला ही मंडळी अजिबात आवडत नव्हती. तिचा क्लब, हाय फाय मैत्रिणींमध्ये हे कुटुंब अगदीच मध्यमवर्गीय ठरणार होते.

सायलीला छान नोकरी लागली, आणि तिने कपिलशी लग्न केले.

”अग निदान, वेगळी तरी रहा सायली. कशी राहणार तू त्या चारच खोल्यात. ?” गीताने खरोखरच्या काळजीने विचारले.

“ आई, मी काका काकूंबरोबरच रहाणार सध्या तरी. उगीच का म्हणून मी वेगळी राहू? बघू नंतर. ” सायली खूषच होती सासरी.

गीताला आता समीरच्या लग्नाचे वेध लागले. समीर कॅनडाला जॉब करत होता. समीर बेताचा, फार काही हुशार नाही, पण कॅनडामधून त्याने थोडे थोडे कोर्सेस केले, आणि बऱ्यापैकी नोकरीही मिळवली. त्याला कॅनडाची सिटिझनशिप मिळाली आणि गीताचे हात गगनाला टेकले.

“समीर, आता मुली बघायला लागूया ना रे? करायचंय ना यंदा लग्न? तू कुठे ठरवले असलेस तर सांग. नाही तर मी आता बघायला लागणार मुली तुला. ” 

“ हो आई, बघा तुम्ही जरूर. मला फोटो पाठवत रहा, मग पुढे बघूया, काय काय होते ते. ”

गीताने मुली बघण्याची मोहीम हाती घेतली. विवाह मंडळात समीरचे नाव नोंदवले. दरम्यान गीताची मामी तिला म्हणाली, “ अग, आपल्या सीमाची मुलगी आहे लग्नाची. विचारू का, करतेय का लग्न तिचे? तुमच्या तोडीसतोड आहेत हो ते श्रीमंत. ”

गीता म्हणाली, ” हो, विचार मामी. सगळी माहिती काढ. मुलगी काय शिकलीय, तयार आहे का परदेशी कायम रहायला, ते विचार, आणि त्यांना मला फोन करायला सांग. ”

दोन दिवसांनी, गीताला फोन आला. — “ मी अजिताची आई बोलतेय. तुमच्या मामीनी मला तुमचा नंबर दिला. तुमचा मुलगा लग्नाचा आहे ना?” 

त्यांनी त्यांच्या मुलीची सगळी नीट माहिती सांगितली. पत्रिका मेल करते, आणि बाकी सगळेही मेलवर पाठवते म्हणाल्या. — सगळी माहिती, प्रथमदर्शनी तरी योग्य वाटली गीताला. तिने रविला, तिच्या नवऱ्याला हे दाखवले, आणि आपण मुलगी बघायला त्यांच्या घरी जाऊया का असे विचारले. अजिताच्या आईवडिलांना तसा फोन गेला, आणि चार दिवसांनी दोघे दिघ्यांच्या घरी मुलगी बघायला गेले.

त्यांचा मोठा बंगला, थाटमाट, नुसत्या चहासाठी केलेले भरभरून पदार्थ, सगळं बघून गीता खूष झाली. अजिता चहा घेऊन आली. किती सामान्य होती ती दिसायला. आणि शिक्षणही नुसती आर्टस् ची डिग्री. — गीताला आणि रवीला प्रथमदर्शनी ती मुळीच आवडली नाही. पण अजिताच्या आईने खुबीने सुचवले,

“ एकुलती एक मुलगी आमची, हे सगळे तिचेच तर होणार आहे पुढे. ” 

गीताने समीरला तिचा फोटो पाठवला.

“ आई, किती ग सामान्य मुलगी आहे ही. मला मुळीच नाही आवडली. तू कितीही वर्णने केलीस ना, तिच्या श्रीमंतीची, तरी ही मुलगी मला अजिबात नको. मला बायको चांगली, हुशार स्मार्ट हवीय. बंगले दागिने नको आहेत. प्लीज केवळ श्रीमंती बघून नको ग असल्या मुली बघू आई. ” 

गीताला त्याचे म्हणणे अजिबात आवडले नाही, पण समीर हट्टी होता. गीताने मुली बघण्याची मोहीम चालू ठेवली, पण तिच्या चौकटीत बसेल अशी मुलगी मिळेना.

एक दिवस समीरचा फोन आला, “ आई, मी लग्न ठरवतोय. माझ्याच ऑफिसमध्ये काम करणारीआहे ती. आणि तुला आश्चर्य वाटेल, पण ती मराठी मुलगी आहे अग. नुकतीच इथे बदलून आलीय, आणि मूळची कनेडीअन सिटीझन आहे. तिचे आईवडील खूपच वर्षांपूर्वी इथे सेटल झाले, आणि ही मोना इथेच जन्मली म्हणून सिटीझन झाली. मी गेले वर्षभर तिला भेटतोय, पण नक्की नव्हते आमचे, म्हणून तुम्हाला नाही सांगितले. मी फोटो पाठवतो. आता मुली बघू नकोस. चांगली आहे मोना आणि तिची सगळी फॅमिली. ”

गीताला आनंदच झाला. त्याचे त्यानेच ठरवले, ते उत्तमच झाले की. आणि पुन्हा तिकडची, मिळवती मुलगी. गीताने दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला, आणि सगळी माहिती विचारली. समीर पुढच्याच महिन्यात लग्न करणार म्हणत होता. पण गीताला आणि तिच्या नवऱ्याला कॅनडाचा व्हिसा इतक्या लवकर मिळणे शक्य नव्हते.

“ अरे समीर, जरा उशिरा करा ना लग्न. एवढी काय घाई आहे रे? नाहीतर इकडे भारतात येऊन करा. ” 

“ नाही ग शक्य. मोनालाही व्हिसाचा प्रॉब्लेम नाही का येणार? आणि तिच्या आईवडिलांना पुढच्याच महिन्यात वेळ आहे. नंतर ते भारतात येणार आहेत. मोनाच्या आजी खूप आजारी आहेत, म्हणून जायलाच हवेय त्यांना. तिकीटेही बुक झाली आहेत त्यांची. ”

गीताने आणि रवीने लगेच व्हिसाची डेट मिळवायचा प्रयत्न केला, आणि नशिबाने, त्यांना लग्नाच्या तारखे अगोदरचा व्हिसा मिळालाही. मोठ्या आनंदाने त्यांनी हे समीरला सांगितले, आणि तोही खूषच झाला.

विमानाची तिकिटे बुक केली, आणि गीताची खरेदीची लगीनघाई सुरू झाली. नव्या सूनबाईसाठी, गीताने हौसेने खूप खरेदी केली. नवीन गळ्यातले, कानातले, मंगळसूत्र घेतले. हौसेने हिऱ्याची अंगठी, नेकलेसही घेतले. दरम्यान, विडिओ कॉलवर मोना समीरशी त्यांना बोलता आले, बघता आले. छान होती मोना दिसायला. तरतरीत होती, आणि चांगली वाटली बोलायला. चांगले बोलत होती मराठी.

ठरलेल्या दिवशी गीता रवी कॅनडाला पोचले. मोना आणि समीर दोघेही आले होते एअरपोर्टवर त्यांना न्यायला. गीताला, रवीला अतिशय आनंद झाला त्या दोघांना बघून. गीताला वाटले, बरेच झाले. ही मुलगी नशिबात होती समीरच्या.

जेटलॅग गेल्यावर, मोनाने त्यांना आपल्या आईवडिलांकडे नेले. अतिशय सामान्य वस्तीत त्यांचे घर होते. गीताला आश्चर्यच वाटले, इतकी वर्षे परदेशात राहूनही, हे इतक्या साध्या अपार्टमेंट हाऊसमधेच राहतात अजून?– मोनाचे आईवडील, बाहेर आले. अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. — म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?” 

– क्रमशः भाग पहिला.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments