सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अनुवादित कथा – “रद्दीवाला” – श्री घनश्याम अग्रवाल ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

(मूळ हिंदी कथा 👉 “रद्दीवाला”)

रद्दीवाला हे त्याचं नाव होतं आणि कामही. आपली चार चाकी हातगाडी, त्यावर एक तराजू, रद्दी, काही भंगार सामान घेऊन तो गल्लोगल्ली फिरायचा. ‘रद्दी, जुनंपुराणं, भंगार सामान,’ असा ओरडत तो फिरत रहायचा.  नेहमी बायका आणि आही काही वेळा पुरुषसुद्धा, त्याला बोलावून घरातली रद्दी किंवा घरातलं मोडकं तोडकं सामान मोलभाव करून देत. सामान्यत: रद्दीवाल्यांकडे लोक, त्यांचा एकूण चेहरा-मोहरा, त्यांची परिस्थिती आणि एकूण काम, यामुळे चोर, उचल्या वगैरे समजून,  त्यांच्याकडे तिरस्काराच्या दृष्टीनेच बघतात. सहा किलो रद्दी वजन करत चार किलो म्हणायचं, गृहिणीने स्वत: वजन केलं, तरी एखादा किलो मारणं हा त्यांचा डाव्या हाताचा मळ असतो.  कधी कधी एखादी छोटी-मोठी वस्तू उचलणं, पोटासाठी ते करतही असतात. त्यामुळे ते गेटच्या बाहेर पडेपर्यंत, त्यांच्याकडे शंकित नजरेने बघितलं जातं. उपेक्षित झाल्यावर केवळ पेपरच नाही, तर माणूसही रद्दी होतो, याचंच तो प्रमाण आहे.

त्या दिवशी पत्नी रद्दीवाल्याला रद्दी देत होती. मी तिथे पोचलो, तर म्हणाली, ‘मी बाहेर चालले आहे. याच्याकडून तीस रुपये घ्या.’ ती असं म्हणाली आणि निघून गेली.

मी प्रथमच त्याच्याकडे नीट काळजीपूर्वक पाहीलं. तो घामाने थबथबलेला होता. खिशातून पैसे काढत होता. मी म्हटलं, ‘काही घाई नाही. आरामात दे.’ मग त्याला विचारलं , ‘पाणी पिणार?’ त्याने होकारार्थी मान हलवली. त्याने पाणी प्यालं आणि रडवेल्या डोळ्यांनी ग्लास परत करत म्हणाला, ‘शुक्रीया.’

‘अरे, पाण्यासाठी कसले आभार?’

‘पाण्यासाठी नाही साहेब. आजपर्यंत मागितल्यावर पाणी मिळालय. आज प्रथमच कुणी तरी आपणहून विचारून पाणी पाजलय!’

मला त्याच्या बोलण्याने बरं वाटलं. जुनी  का होईना, पण अनेक वर्षं पुस्तकं, वर्तमानपत्र वाचून, तो काहीसा लिहू-वाचू लागला होता. शिवाय उर्दू भाषाच अशी, की अशिक्षित जरी बोलू लागला, तरी त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा वेगळाच ढंग येतो.  मी त्याच्याशी बोलू लागलो तशी त्याचं जीवनच त्याच्या जिभेवर आलं.

‘सध्या परिस्थिती मोठी बिकट आलीय. कॉम्पिटिशन वाढलीय. जेव्हापासून टी. व्ही. आलाय, तेव्हापासून लोक गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून वर्तमानपत्र घेतात. मासिके, पुस्तके कमी झालीत. तेव्हा किमती वाढणारच ना! रद्दी खरेदी कारायला जाताना आमच्या लक्षात येतं, की माणूस गरीब आहे की श्रीमंत, कंजूष आहे की दिलदार. शंकेखोर, झिक झिक करणारा आहे की साधा-सरळ माणूस आहे. आम्ही सगळ्यांना जाणतो, पण लोक मात्र आमच्याकडे तुच्छतेने बघतात. पहिल्यासारखी मजा आता धंद्यात राहिली नाही.’ काही क्षणांसाठी आपली विवशता दृष्टीआड करत, आणि डोळ्यात चमक आणत तो म्हणाला,        ‘ तरीही कशीबशी गुजराण होतेच आणि कधी कधी आपण किंवा दुसर्‍या मजल्यावरचे दिलदार, शानदार शायरसारखी माणसे भेटतात, तेव्हा वाटतं, जीवन सुंदर आहे. इथं जगणं सहज शक्य आहे.’

दुसर्‍या मजल्याप्रमाणे म्हणजे….’ मी विचारल्यावर मला त्याने सविस्तर सांगितलं, त्याचं असं झालं की रद्दीवाला जेव्हा ‘रद्दी रद्दी’ म्हणत चालला होता, तेव्हा त्या दुसर्‍या मजल्यावरच्या माणसाने त्याला वर बोलावलं. तो आपला तराजू आणि थैली घेऊन वर गेला. खोलीत काही वर्तमानपत्रे आणि मासीके इकडे तिकडे पडलेली होती. हे सगळं घेऊन जा, असं त्याने म्हणताच, रद्दीवाल्याने सगळं गोळा केलं. त्याने तराजू काढून वजन करायला सुरुवा केली, तशी तो म्हणाला, ‘वजन करण्याची गरज नाही. घेऊन जा.’ असं ऐकताच त्याने रद्दी थैलीत भरली. आज जरा जादाच कमाई होणार, या खुशीत  तो खिशातून पैसे काढू लागला. ‘राहू दे. राहू दे. पैसे नको देऊ. तशीच घेऊन जा.’ वजन न करता त्याने आत्तापर्यंत रद्दी खरेदी केली होती. पण फुकटात… आश्चर्य आणि आनंदाने त्याने त्याच्याकडे पहिले. तशी तो पुटपुटला, ‘ मी कुठे पैसे देऊन खरेदी केली आहेत. कवी झाल्याने बाकी काही मिळो, न मिळो, पण काही मासिके फुकटात जरूर घरी येतात.’ रद्दीवाला डोळ्यांनी शुक्रिया आदा करत आणि हातांनी सलाम करत पायर्‍या ऊतरू लागला. पायर्‍या उतरत काय जवळ जवळ पळतच तो खाली आला. वीस-पंचवीस रुपयांची फुकटात कमाई झालेली होती. त्याने गाडीवर थैली ठेवली एक क्षणभर पुन्हा दुसर्‍या मजल्याकडे बघितलं, जिथे त्याचा दिलदार, शानदार कवीसारखा माणूस रहात होता. दुसर्‍या मजल्याकडे बघत पुन्हा एकदा सलाम करत तो गाडी ढकलू लागला.

आता जेव्हा जेव्हा तो दुसर्‍या मजल्यापुढून जातो, तेव्हा तेव्हा त्याचा ‘रद्दी…. रद्दी…’ असा आवाज तीव्र होत जातो. दोनेक महिन्यांनंतर जेव्हा वरून आवाज येतो, तेव्हा तो घाई-गडबडीने, उत्साहाने जिन्याच्या पायर्‍या चढू लागतो. वजन न करता, फुकटात रद्दी घेऊन शुक्रिया म्हणत व सलाम करत तो जिना उतरतो. गाडीवर थैली टाकतो. मजल्याकडे बघतो. पुन्हा सलाम करतो आणि गाडी ढकलत पुढे जातो.

आजदेखील सगळं काही तसंच झालं. पण जेव्हा तो सलाम करून पायर्‍या उतरू लागला, तेव्हा त्याला एक उग्र, तिखट आवाज ऐकू आला. ….’ ए, जातोयस कुठे?…. पैसे…?

तो चमकला हतप्रभसा गोंधळून उभा राहिला. ते विवश डोळे आणि पसरलेला हात काही काळ बघत राहिला. त्याच्यात एवढीही हिंमत उरली नाही की आपली बाजू मांडण्यासाठी तो एवढं म्हणू शकेल की, ‘साहेब यापूर्वी आपण कधीच पैसे घेतले नाहीत, म्हणून आज…..’ त्याने गुपचूप खिशात हात घातला आणि विसाची नोट पसरलेल्या हातावर ठेवली. सलाम करून तो जिन्याच्या पायर्‍या असा काही उतरू लागला, जसा काही तो पहाड चढतोय. दोन किलोचं ओझं चाळीस किलोचं वाटू लागलं. तो जड मनाने आणि जड पावलांनी आपल्या गाडीपर्यंत  आला. थैली ठेवली. सवयीनुसार दुसर्‍या मजल्याकडे पाहीलं. सलाम केला आणि गाडी पुढे ढकलू लागला. मग पुन्हा थांबला. त्याला आताही, तो उग्र, तिखट आवाज ऐकू येत होता ….’ ए, जातोयस कुठे?…. पैसे…?’ ते विवश डोळे आणि पसरलेला हात अजूनाही दिसत होते. त्याने विनाअश्रूंच्या रडवेल्या डोळ्यांनी पुन्हा दुसर्‍या मजल्याकडे बघितलं आणि सलाम करत जड मनाने तो गाडी ढकलू लागला. जड मन…. यासाठी नाही की त्याला फुकटात रद्दी मिळाली नाही. त्याला वीस रुपये द्यावे लागले. हा तर याचा रोजचा धंदा आहे. पण यासाठी तो दु:खी झाला की त्याचा दिलदार, शानदार शायर साहेब आज गरीब झाला होता.

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

मूळ लेखक – श्री घनश्याम अग्रवाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments