? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग १ – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

श्रीकांत कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात होता. साल होते १९७४. त्याची पाचवी सेमिस्टर झाली व दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या. ड्रॉईंग, सबमिशन आणि स्टडीच्या जंजाळातून थोडासा मोकळा झालेला श्रीकांत आपल्या गावी म्हणजे वडगावला परतला. त्याला खरे म्हणजे या सुटीत  पाच-सहा दिवस मस्त झोप, खूपशी विश्रांती आणि शिवारातील शेतात मनसोक्त हुंदडायचे होते व अभ्यासाचा थकवा उत्साहात बदलायचा होता. तसे तो ठरवूनच गावी आला होता. पण ‘माणूस घडवितो आणि देव बि-घडवितो’ अशी एक इंग्रजी म्हण श्रीकांतने वाचली होती. त्याचे प्रत्यंतर त्याला आपल्या घरी नेमके याच दिवाळीला येईल , ही अपेक्षा नव्हती.

दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुगंधी तेल व उटणे लावून अंघोळ झाली , फराळ झाला आणि त्याच्या वडिलांनी म्हणजे आप्पानी त्याला विचारले,

“श्री, किती दिवस सुट्टी आहे रे ?”

“आप्पा , परीक्षा संपवून आलोय. त्यामुळे चांगले तीन आठवडे सुट्टी आहे . सुट्टीत मी शेतात काम करायचे म्हणतोय. ” श्रीकांत बोलला.

“ते ठीक आहे. पण परवा भाऊबीजेला तुझ्या आक्काकडे जाऊन ये. तिच्यासाठी व तुझ्या भाचरांसाठी कपडे आणलेत, तेच ओवाळणीला टाक. वाटल्यास एखादा दिवस रहा व लगोलग परत ये. माझा बडोद्याचा दोस्त यशवंता आजारी आहे व त्याला भेटायला मला जावे लागणार आहे. लांबचा पल्ला आहे व मी रेल्वेतून प्रवास नाही केलेला. तुला माझ्या सोबत यावे लागेल. तुझी आई तयार असंल तर तिला पण घेऊन जाऊ या. आलं का लक्षात ? “

” होय आप्पा, जाऊ या की. पण खर्च खूपच होईल. मी येईन बरोबर.” श्रीकांत बोलला.      

“आधी ते भाऊबीज तर करून ये. मग बघू कधी निघायचं ते .” आप्पा बोलले व तो विषय तिथेच थांबला.

श्रीकांत भाऊबीजेला आक्काकडे जाऊन आला. तिथे भाऊजीसकट सर्वांना त्याने कपडे दिले. आक्काने पण दुपारी गोडधोड आणि रातच्याला मस्त मटणाचा बेत केला. दुपारी आणि संध्याकाळी आग्रह करायला आक्काची नणंद सुरेखा होती. नुकतीच बारावी झालेली व नाकीडोळी नीटस , पण सावळ्या रंगातही उठून दिसणारी ती श्रीकांतच्या बळेच पुढे पुढे करीत होती. त्याची आक्कापण त्यासाठी तिला प्रोत्साहन देत होती. सगळ्यांच्या आग्रहाखातर तो भाचे कंपनीला घेऊन तिच्याबरोबर भाऊजींचे शिवार देखील बघून आला. थोडक्यात त्याचा वेळ झकास गेला. दुसऱ्या दिवशी त्याने आक्काला बाय बाय केले, पण बाकीच्यांच्या पेक्षा सुरेखाच जास्त वेळ हात हलवीत होती हे कांही त्याच्या नजरेतून सुटले नाही. बोलण्याचा ओघात त्याने आक्काला सांगून टाकले होते की आठवड्याच्या शेवटी माई आणि आप्पांच्या बरोबर तो बडोद्याला आजारी यशवंत काकाकडे जाणार आहे.

त्याच्या बहिणीला त्याबद्दल फार आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. ती काकांना श्रीकांतपेक्षा अधिक ओळखत होती व तिला ते काका आवडत ही होते. तिच्या लग्नात याच काकांनी पुढे होऊन आप्पाना खूप आर्थिक मदत केल्याचेही तिला माहीत होते. त्यामुळे सगळेजण काकांचा मनापासून आदर करीत होते.

श्रीकांत परत गावी आला व त्याने आक्काची , भाऊजींची खुशाली आप्पाना , माईला सांगितली. त्यावेळी आप्पा बोलले, ” यशवंत काका आजारी आहेत. तुझ्या आक्काच्या लग्नात यशवंत ने पुढे होऊन मला रुपये दहा हजार दिले होते. त्यामुळे तर आक्काचे हे मालदार स्थळ मला निभावता आले व तिच्या आयुष्याचे सोने झाले. यशवंतला त्याचे पैसे परत करण्यासाठीच आपण जातोय. त्याच्या बऱ्याच ऋणातून मला मोकळे व्हायचे आहे.”

श्रीकांतला बऱ्याच ऋणाचा अर्थ नाही समजला पण हे पैशाचे डिटेल्स आजच समजले. आक्काच्या लग्नावेळी तो दहावीत होता व पैशाचे व्यवहार त्याला कोणी सांगीत नव्हते. त्यावेळी नुकतीच दहावीची परीक्षा झाली असल्याने आक्काच्या लग्नात त्याने भरपूर मजा केल्याचे त्याला आठवत होते. यशवंत काकाही त्याला बाबांचे एक चांगले दोस्त म्हणून व लग्नात त्यांनी आप्पाना मदत केली होती म्हणून आवडत होते. काकांची सासुरवाडी बडोदा होती. तिथल्या गायकवाड वाड्यात त्यांचे सासरे कामाला होते व त्यांनी यशवंत काकांनादेखील तिथे नोकरी लावली होती. आता त्यांचे  सासरे नव्हते व त्या सर्व कुटुंबाचा भार यशवंत काकांवर होता. जे थोडेफार त्याच्या कानावर होते ते एवढेच होते. बडोद्याला माई-आप्पाना घेऊन जायचे म्हणजे पुण्याहून डायरेक्ट अहमदाबाद रेल्वे नव्हती. पुना ते मुंबई आणि मुंबई ते बडोदा असा प्रवास करणे आवश्यक होते. रिझर्वेशन करून गेल्यास कांही त्रास नव्हता. श्रीकांतने आप्पाना विचारून घेतले व पुण्याच्या मित्राला सांगून चार दिवसानंतरची तीन तिकिटे रिझर्व्ह केली. थोडक्यात सर्वांचा बडोदा प्रवास निश्चित झाला.

काकांचा आकरावीतील मुलगा रमेश त्यांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला आला होता. घरी जाण्यासाठी रमेशने टांगा ठरविला होता. टांग्यातून ते घरी निघाले. श्रीकांतसारखा उंच, गोरा व बडबड्या रमेश श्रीकांतला आवडून गेला. त्याच्याकडून सर्वाना समजले की काकांना दवाखान्यातून घरी आणले होते . घरी काका, काकी, काकीची आई, रमेश आणि त्याची एक वर्षांनी मोठी असलेली बहीण सुजाता असे पाचजण होते. त्याचे घर चांगले पाच खोल्यांचे होते. गायकवाड वाड्यात यशवंत काकांना मान होता. अर्थात त्याला कारण काकांचे सासरे व दोघांचे प्रामाणिक काम होते. सरकारांच्या नियमानुसार मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार करीत होते व त्यामुळे सुजाता आणि रमेश उत्तम शिकत होते. सुजाता आता कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. ती हुशार होती व घरी काकीना खूप मदतही करीत होती. तसे बडोद्यात मराठी बोलणारे लोक सरकार वाड्याच्या परिसरात बरेच होते. त्यामुळे तिथे कोणास परके वाटत नव्हते. हे सर्व श्रीकांतला रमेशने त्याच्या बडबड्या  व मोकळ्या स्वभावास अनुसरून टांग्याच्या घोड्याच्या टापांच्या आवाजात न विचारता सांगितले होते. श्रीकांतची व रमेशची गट्टी व्हायला त्यामुळे वेळ नाही लागला. टांग्यातून जाताना थोड्या अरुंद दहा-बारा फुटी रस्त्याने टांगा चालला होता. रस्त्याच्या बाजूला जुन्या पद्धतीच्या इमारती होत्या. जवळजवळ वीस मिनिटे झाल्यानंतर टांगा एका प्रशस्त रस्त्यावर आला. ही बहुतेक उच्चभ्रू लोकांची वस्ती असावी. चार-पाच मिनिटात टांगा एका प्रशस्त प्रवेशद्वारातून आत गेला. समोर दोनशे फूट अंतरावर एक वाडासदृश इमारत व त्याच्या दोन्ही बाजूला छान राहण्यासाठीच्या इमारती होत्या. त्यातील मोठ्या वाड्यापासून दूर असलेल्या इमारती जवळ टांगा थांबला. या इमारतीत देखील चार-पाच कुटुंबे रहात असावीत. इमारतीच्या बाहेर एक गोरटेली मुलगी साडीमध्ये उभी होती. रमेश बोलला, “माझी ताई तुम्हा सर्वांची बाहेर वाट पाहतेय . बहुतेक बाबांनी तिला पाठवले असावे “

टांग्यातून सगळेजण उतरले. रमेश व सुजाताने त्यांच्या सामानाच्या दोन बॅगा घेतल्या. श्रीकांतने दोन घेतल्या. माई आणि आप्पा सुजाताच्या मागोमाग निघाले. त्या इमारतीतील दोन नंबरच्या दरवाजातून सगळे आत गेले. आत यशवंत काका व काकी उभे होते. काकींच्या आई जुन्या लाकडी खुर्चीवर बसल्या होत्या. नमस्कार, क्षेम-कुशल झाल्यानंतर प्रवासाचा शीण घालवण्यासाठी हात-पाय धुणे झाले. चहा व कांदापोहे झाले. श्रीकांत आणि अप्पांची बॅग रमेशच्या खोलीत गेली. माईंची बॅग सुजाताच्या खोलीत गेली. काकीनी पाणी गरम करून ठेवले होते. आंघोळीची खोली एकच होती. त्यामुळे सर्वांची आंघोळ वगैरे आटोपायला चांगला दीड तास गेला. यशवंत काका व आप्पा बऱ्यापैकी बोलत बसले होते. श्रीकांतची आंघोळीची पाळी येईपर्यंत त्याने एक डुलकी घेतली, नंतर फ्रेश झाला , आंघोळ केली, नवीन स्वच्छ कपडे बदलले आणि तोही यशवंत काकाबरोबरच्या बोलण्यात सामील झाला. आता चांगले चार-पाच दिवस तिथेच काढायचे होते, ते कसे जाणार ही एकच चिंता त्याच्या मनात घर करून होती. बोलण्याच्या ओघात काकांना सौम्य हार्ट अटॅक आल्याचे व त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे समजले. कदाचित ऑफिसातील बैठ्या कामामुळे असेल, पण त्यांना दिलेल्या गोळ्यांवरून  त्यांची तब्येत नाजूक असावी असा कयास बांधता येत होता. सुजाता आणि रमेश दोघेही अभ्यासात हुशार होते. सुजाता बी कॉम.च्या पहिल्या वर्गात होती व रमेश आकरावीत होता. बारावीत मेरीटमध्ये येऊन त्याला इंजिनीअर व्हायचे होते. आप्पानी श्रीकांत समोर काकांना त्यांचे दहा हजार रुपये परत केले व त्यांनी मुलीच्या लग्नात केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. बडोद्याला आल्याचे मुख्य काम असे पूर्ण झाले होते. पहिला दिवस असा ओळखी, विश्रांती आणि एकमेकांचे क्षेमकुशल यातच गेला. यशवंत काकांची तब्येत सोडली तर घरातील वातावरण व सर्वांचे वागणे श्रीकांतला भावून गेले. त्या रात्री श्रीकांत रमेशच्या खोलीत लौकरच झोपी गेला. मात्र आप्पा, माई, काका आणि काकू बराच वेळपर्यंत गप्पा मारीत होते.

क्रमश: भाग १

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments