सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

मिरज तालुक्यातील गवळेवाडी गावातील घटना. शाळेच्या मैदानात खेळताना, मुलांना पाच फूट लांब आणि दोन इंच जाडीचा भला मोठा नाग दिसला. सदैव संरक्षणात तत्पर असलेल्या ‘ भालू ‘ या कुत्र्याला आणले गेले. नागाला पाहताच ‘भालू ‘ ने नागावर झडप घातली. आणि ‘ भालू ‘ आणि नागाची झुंज सुरू झाली . ‘भालूने ‘ नागाला आपल्या तोंडात धरून फेकून दिले .नागानेही आक्रमक होऊन ,भला मोठा फणा काढून, ‘ ‘भालू ‘ वर हल्ला करून त्याला दंश करण्यास सुरुवात केली. नाग फुसफुस आवाज करू लागला. दोन तासांच्या झुंजीनंतर ‘ भालू ‘ने नागाला जेरीस आणून ठार मारले. ‘भालू ‘ कोणालाही जवळ येऊ देईना. नाग मेल्याची खात्री झाली. आणि मगच तो घरी परतला. नागाच्या दंशाने ‘भालूच्या ‘ तोंडाचा  चेंदामेंदा झाला होता. काही तासातच त्याचे अंग सुजायला लागले. तोंडाला फेस यायला लागला. तो बेचैन होऊन लोळायला लागला .काही वेळाने आपल्या मालकाकडे पहात एका जागी झोपून राहिला. कर्तव्यपूर्ती करून चिरनिद्रेत विलीन झाला. डफळ्या रंगाच्या ,उंच ,सडपातळ, मोठ्या दमाच्या, शिकारी आणि पराक्रमी भालूला आजही गावकरी विसरले नाहीत.

एखादा कुत्रा पराक्रमी असेलच असे नाही.  पण दैवी म्हणावे असे सुंदर रूप आणि उत्तम अभिनय परमेश्वराने त्याला बहाल केलेले असते. त्यावर तो अलोट पैसा आणि जागतिक कीर्ती मिळवू शकतो आणि आपल्या मालकालाही मिळवून देतो १९४२ ते ४४ सालची गोष्ट. कॉलेजातीचा ‘कॉल ‘ त्याचे नाव. अत्यंत हूड असा कुत्रा. त्याच्या हूडपणाला कंटाळल्यामुळे मालकाला नकोसा झाला म्हणून त्याला त्यांनी विदर्भातल्या  डॉक्टरला देऊन टाकला. खरंतर ही जात थोडी अर्धांग आणि भोजरी असून सुद्धा पाच-सहा महिन्यात तो अवघड कामही उत्तमरीत्या करू शकला.  एके दिवशी पेपरमध्ये केली जातीचा कुत्रा पाहिजे अशी हॉलीवुडची जाहिरात आली.  ३०० कुत्र्यांचा इंटरव्यू झाला आणि त्यामध्ये कॉल ची निवड झाली.  ट्रेनरना खूप आनंद झाला.  लसीकरण होम या चित्रपटासाठी त्याची निवड झाली चित्रपटाचा नायक एक कुत्रा असूनही तो चित्रपट खूपच गाजला.  कितीतरी देशात तो चित्रपट दाखवला गेला आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. आणखी चित्रपटांसाठी अनेक देशातून पत्रे आली.  अनेक करारही झाले.  आता त्या 

कॉल ची कमाई वार्षिक ५० हजार डॉलर झाली.  लागोपाठ आणखी पाच सहा चित्रपट निघाले. काही वेळा तो प्रेक्षकात हास्याचे फवारे उडवायचा, तर कधी डोळ्यात अश्रूही उभे करायचा.  लसीकरण होम चित्रपटानंतर तो लसी म्हणूनच प्रचलित झाला.  लोकांनी त्याला डोक्यावर घेतले.  त्याच्या रेखाचित्रांची मासिके निघाली.  शाळेत शिक्षक त्याच्या निष्ठेच्या गोष्टी मुलांना सांगायला लागले.  धर्मोपदेशक त्याच्या निष्ठेवर प्रवचने देऊ लागले.  तो हॉलीवुडचा एक अमोल कुत्रा झाला.  श्वान प्रदर्शनात फक्त उपस्थित राहण्यासाठी एक दिवसाचे एक हजार डॉलर्स मिळत असत.  त्याचे सहा चित्रपट होईपर्यंत त्याने शूटिंग साठी वीस हजार मैलांचा प्रवास केला होता– कधी रेल्वेच्या वातानुकूलित खास डब्यातून, कधी खास बांधणीच्या स्टेशन वॅगनमधून, इतकच काय पण स्वतःच्या विमानातूनही तो प्रवास करीत असे.  एकदा कॅनडामध्ये शूटिंगला गेलेला असताना सैनिकांच्या हॉस्पिटलमधून त्याला पाहण्यासाठी निमंत्रण आले.  त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सैनिकांचे चेहरे एकदम खुलले.  त्याला प्रत्यक्ष पाहून सैनिकांना खूप आनंद झाला, कारण त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्याला पाहिलेले होते.  एक आश्चर्य म्हणजे एक दीर्घकाळ पडून असलेला सैनिक लसी ला पाहून ताडकन उठून बसला.  त्याचा हात चाटून त्याला शेकहॅण्ड  केले.  डॉक्टरांनी आणि औषधांनी जे काम झाले नव्हते ते लसीने केले.  किती कौतुक करावे त्याचे बरं.

आजकाल मेडिकल क्षेत्रात डॉग थेरपी म्हणून कुत्र्याचा वापर केला जातो. परदेशात ज्येष्ठ नागरिकांसाठी कंप्यानियन म्हणून कुत्रा पाळतात. आणि त्याला शिकवतात. ते   ज्येष्ठांचे चोरापासून ,धोक्यापासून रक्षण करतात. एखाद्याला एपिलेप्सीचा त्रास असेल, आणि कुत्रा बरोबर असेल ,तर त्या व्यक्तीला चक्कर येण्यापूर्वी काही क्षण कुत्र्याला अगोदर जाणीव होते. आणि तो त्या व्यक्तीला त्याचे कपडे पकडून खाली बसवतो, आणि सावध करतो… जर्मनीतील म्युनिच शहरातील घटना.  ‘आर्को ‘ हा एक म्हातारा कुत्रा. ५६ वर्षाच्या एकट्याच राहणाऱ्या वालडरमनने  त्याला ठेवून घेतले .एके दिवशी  वालडरमनला रस्त्यातच हार्ट अटॅक येऊन तो खाली पडला. ‘आर्को ‘ ५०  मीटरवर पळत जाऊन पादचाऱ्यांवर भुंकायला लागला. आणि त्यांना घेऊन  मालकाजवळ आला. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले .बरे वाटून परत घरी आल्यानंतर मालकाची सेवा करण्यासाठी आणखी काही वर्षे  तो जगला .” मी म्हातारा झालो तरी काय करू शकतो ” हे त्यांनी दाखवून दिले. मालकावरच्या निष्ठेला शब्दच अपुरे आहेत.

 कधी कधी एखाद्याचे दैव कधी उजळेल सांगता येत नाही. आमच्या  घरापासून ,रस्त्याच्या कडेला  झुडुपात एका कुत्रीने चार पिल्लांना जन्म दिला. आठ दहा दिवसांनी पिलांची आई कुठे गायब झाली समजले नाही. पिले रात्रंदिवस आईसाठी भुकेने ओरडत होती. त्यांची आई आली तर चावेल, म्हणून कोणी पिलांना उचलण्याचे धाडस करत नव्हते. अखेर माझ्या मैत्रिणीने त्याना उचलून घरी आणले. दूध-खाणे सुरू केले. त्यांच्या बाललीलांनी सगळ्यांना लळा लावला. दोन पिलांना कोणीतरी सांभाळायला घेऊन गेले. उरलेल्या दोघांची नावे ‘ बंड्या’  आणि  ‘ गुंडी ‘ अशी ठेवली गेली. काही  कौटुंबिक अडचण आल्याने ‘ बंड्या ‘ आणि ‘ गुंडीला’  ” पीपल फॉर ॲनिमल” च्या संस्थेत पाठवले गेले. इतर प्राण्यांबरोबर दोघेही छान रुळले. संस्थेतील काही गाढवांना उटीला पाठवायचे होते. उटी , (मसिन गुडी)  या ठिकाणी डॉक्टर मिसेस एलिना वोटर आणि डॉक्टर नायजेल वोटर (नॉर्वेचे भारतात स्थायिक झालेले व्हेटर्नरी डॉक्टर ) यांनी २० एकर जागेत “इंडिया प्रोजेक्ट फॉर नेचर” ही संस्था  स्थापन केली आहे. तेथे गाढवांबरोबर गुंड्या आणि बंडी यांनाही पाठवले गेले. परदेशस्थ काही संस्था आणि व्यक्ती अशा प्राण्यांना दत्तक घेतात. बंड्या आणि गुंडीच्या फोटोची जाहिरात झाली. यु .के. मधील एका प्रसिद्ध बँड ग्रुपचे गायक  पाँल प्राणीप्रेमी होते .त्यांनी फोटो, कागदपत्रे यांची पूर्तता केली .त्यांची नावे बदलून त्यांचे ‘ पॉल ‘म्हणजे (स्वतःचे) आणि  नँन्सी (बायकोचे) असे नामकरण केले. दत्तक विधान झाले . ‘बंड्या’ आणि ‘गुंडी’  मराठी जोडी  पाँल आणि नॅन्सी अशी इंग्लिश झाली. रस्त्याच्या कडेला झुडुपात जन्माला आलेली, रात्रंदिवस आईविना भुकेने व्याकुळ होऊन ओरडत राहिलेली ,’बंड्या ‘ आणि ‘ गुंडी ‘  म्हणजेच  पाँल आणि नॅन्सी उटीला आनंदी आणि मुक्त जीवन जगायला लागले. कसं नशीब असतं ना एकेकाचं !

 — क्रमशः भाग तिसरा . 

 ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments