? विविधा ?

☆ “मरणा अगोदर जगून घ्या…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

जीवन फार धावपळीचे झाले आहे. शिक्षण महाग झाले आहे.बाजारातील सर्वच आवश्यक असणा-या गोष्टी महाग झाल्या आहेत.मध्यमवर्गीय कुटुंब चालवणे खूपच कसरतीचे झाले आहे.आपण आपल्या जबाबदा-या पार पाडत असतोच, पण हे करत असताना समाधान मिळते का याकडे कुणाचे लक्ष आहे का?

तर मी म्हणतो,आपण कसे समाधानी राहू यावर लक्ष केंद्रित करा खूप दुर्घटना माणसांच्या आयुष्यात घडत असतात आणि आपल्याला या घटना पचवायची ताकद ईश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने देत असतो.ती संधी वेळीच स्वीकारा सत्य जे समोर येतं त्याकडे पाठ फिरवू नका. मग  ते सत्य आनंद देईल किंवा दु:ख देईल.

मेहनत सर्वजण करतात.रतन टाटा असे म्हणतात आपण कोण आहे या पेक्षा आपण कसे आहोत हे महत्वाचे आहे.स्वभाव जुळत नाहीत.जबरदस्तीने काही कामे करावी लागतात. पण काही वेळा इलाज नसतो.पण लादलेली कामे कर्तव्य म्हणून केली तर त्रास होणार नाही.सर्वच गोष्टी माणसाच्या मनासारख्या होत नाहीत हे मान्य करून घ्यायला शिकलंच पाहिजे.

मी आपल्याशी बोलता बोलता कुठला विषय कुठे घेवून जात आहे हे माझ्याच लक्षात आले नाही. आजचाच एक प्रसंग, एक माणूस गाडीवरून जात असताना छान गाणं गुणगुणत होता. म्हणजे मला ऐकू आलं इतका त्याचा आवाज होता. साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा तो तरूण असावा.सांगण्याचा हेतू दिवसभर काम करून थकून घरी जात असताना तो इतका खूष असेल तर तो किती समाधानी आहे हे त्याच्या गाणे गुणगुनणण्यावरून लक्षात आले. पैसा खूप जवळ असला म्हणजे आपण खूप समाधानी आहोत आणि राहू ,हा मनाचा गोड गैरसमज  आहे.

लोक आपण न केलेल्या गोष्टीकडे फोकस करत बसतात. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केले ते ही कोणत्या परिस्थितीमध्ये हे लक्षात घेत नाहीत.उलट त्यांनी काय केलं नाही यावर बोलत राहून मिळालेला आनंद त्यांना उपभोगता येत नाही. तर न केलेल्या गोष्टी उगाळत बसल्यामुळे येणा-या आनंदावर पाणी फिरून जात असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कुणामुळे कुठलेच कोणाचे काम थांबत नाही हे तर मान्य आहे.आपण एखादे काम केले नाही म्हणून ते काम काही काळ थांबेल पण कायमस्वरूपी ते काम थांबत नाही. कुणीच ते काम करणार नाही असं होत नाही…ते काम कोणाकडून तरी होणार हे नक्की!

सांगण्याचा उद्देश असा की जीवन जगत असताना समाधानी राहायला शिकलं पाहिजे.स्वप्नं बघताना जी स्वप्ने पूरी करता येतील अशीच स्वप्ने पहावी.आणि ती स्वप्ने पूरी करून त्याचा आनंद घ्यावा.रोजची धावपळ करत असताना आपल्यासाठी काही वेळ घालवावा मग त्यामध्ये आपला छंद जो आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे.मग तो छंद लिखाणाचा असेल, वाचनाचा असेल ,मुव्ही पाहण्याचा असेल, निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा असेल, मित्राशी गप्पी मारण्याचा असेल आपल्याला ज्यात मन रमेल तो छंद आपण मनापासून जोपासावा आणि का जोपासू नये?

गेलेली वेळ परत येत नाही वय वाढत जाते,अनुभव येत राहतात मागे वळून पाहिले तर आपण घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात.पण असे न होता एखादा निर्णय आयुष्य बदलून जातो.असं काहीसं घडत असतं!

समोरच्या माणसाने काय करावे, कसे वागावे, हे आपण नाही ठरवू शकत पण आपण मात्र योग्य दिशेने योग्य विचाराने वागण्यास काय हरकत आहे…

समोरचा माणूस चुकीचं वागत असेल तर आपला नाईलाज असतो आणि त्याच्या बदलण्याने त्रास होत असेल तर तो त्रास आपण का करून घ्यावा.जर त्याला तो त्रास होत नाही तर आपणतरी तो त्रास का करून घ्यायचा. काही वेळा समोरचा कसा वागतो त्याच्याशी तसेच वागावे लागते.

आपल्यातल्या मीपणालाही केव्हातरी संधी द्यावीच लागते. समोरचा माणूस मनासारखा वागत नाही म्हणून दु:खाला कवटाळून का बसावे.भांडण एकाशी त्याचा परिणाम आपण इतर गोष्टींवर करत असतो, हे का कळत नाही ? आपलं एकाशी भांडण होतं. पण इतर नात्यातून जो आनंद  मिळणार असतो तो का आपण घेत नाही. जीवन आपल्याला पुन्हा मिळणार आहे का हो, नाही ना ? आणि वय उलटी गिनती करणार आहे का नाही ना? लहानपण, तरूणपण व म्हातारपण चुकलं आहे का, नाही ना?

जगात एकच गोष्ट अटळ आहे

मरण….येणारच फक्त कधी येईल आणि कोणत्या रूपाने येईल माहीत नसतं, फक्त त्याला कारण हवे असते…म्हणून मरणा अगोदर जगून घ्या…जगून घ्या……….

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments