डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ आईचा खिसा आणि बापाचा पदर….! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

औषध देण्याचे माझे काम करून दुपारी मी निघालो… दिवस थंडीचे असले तरी दिवसा ऊन खूप कडक असतं …. या कडक उन्हात मी घामाघुम….! 

मोटर सायकलच्या डिकीला अडकवलेली गार पाण्याची बाटली मी तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायलो …आणि पुढे निघालो….

हे पाहून भीक मागणारी एक माऊली म्हणाली, ‘ये दोन घास खाऊन घे माज्यासंगट… भुक्याजला आसशील…. !’

मला पुढच्या वेळा गाठायच्या होत्या…. मी म्हणालो, ‘नगो मावशे, फुडं जायाचं हाय…./

म्हातारी तोंड पाडत म्हणाली, ‘व्हय बाबा तु कशाला आमचं शिळं नासकं खाशील ?’

हे ऐकून मात्र आवर्जून तिच्या ताटात जेवायला बसलो….ताटात “इत्तूसं” काहीतरी होतं… जे लहान मुलालाही पुरणार नाही….मी खायला सुरुवात केली… माझ्या लक्षात आलं…. प्लेट मधले घास, मी जास्त खावं म्हणून माझ्या साईडला ती ढकलत होती…. आणि तिने जास्त खावं म्हणून प्लेटमधले तेच घास मी तिच्या साईडला गुपचूप ढकलत होतो…

हे देता – घेता माझं पोट भरलं….! 

मी त्या माऊलीकडे पाहिलं…. जेवणात मला वाटेकरी केल्यामुळे तिचं पोट नक्कीच भरलं नसावं ….

तरीही तिचा तो सुरकुतलेला चेहरा अत्यंत तृप्त आणि समाधानी होता….!

घेण्यातला आनंद मी जरी मिळवला असला…. तरी देण्यातलं समाधान मात्र तिच्याकडे होतं…!

काहीतरी घेऊन मिळतो तो आनंद…. पण देऊन मिळतं ते समाधान….!!!

आईच्या पदराला खिसा कधीच नसतो…  तरी ती आयुष्यभर द्यायचं काही थांबत नाही…!

 बापाच्या शर्टाला कधी पदर नसतो…..परंतु लेकरांना झाकायचं, मरेपर्यंत तो बिचारा काही सोडत नाही…!!

…… या खिसा आणि पदरामधलं जे अंतर आहे…. तितकंच आपलं खरं आयुष्य….!

हा खिसा आणि पदर जर आयुष्यात नसेल…. तर — 

तर…. उरतो केवळ जगण्याचा “भार” आणि वाढत जाणाऱ्या वयाचे “वजन” ! 

आणि “ओझं” म्हणून  उगीचच वाहत नेतो आपणच आपल्याला… वाट फुटेल तिकडे….!!! 

 

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments