सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

तपोवनातील बोधिवृक्षाचा कुलवृत्तान्त श्री प्रदीप गबाले ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

पाण्याच्या खजिन्याकडून कळंबा गावाकडे जाताना प्रथम कळंबा फिल्टर हाऊसचा थोडासा चढ लागतो. हा चढ चढून पुढे गेलो की, दूरवर उजव्या हाताला असणारा गर्द झाडीचा एक हिरवा ठिपका आपलं लक्ष वेधून घेतो. कळंबा आयटीआयपर्यंत आल्यानंतर मात्र या गर्द ठिपक्याचे रूपांतर भल्या मोठ्या वृक्षाच्या पसाऱ्यात झालेले असते. हा हिरवागार वटवृक्ष ही तपोवन जवळ आल्याची खूण असते.

तपोवन आणि वृक्षारोपण यांचं फार जुनं नातं आहे. विद्यापीठ शाळेला भेट देणाऱ्या नामांकित पाहुण्यांना तपोवनात नेऊन त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून, त्यांची स्मृती जपण्याची आगळी वेगळी परंपरा विद्यापीठाचे एक संस्थापक दीक्षित गुरुजी यांनी सुरू केली. यासाठी तपोवन आश्रमात राहणारे विद्यार्थी आणि स्वतः दीक्षित गुरुजी ४  फूट लांब, ४ फूट रुंद आणि 3 फूट खोलीचा खड्डा स्वतः कष्ट करून खणत असत. त्यामध्ये चांगली माती भरून नंतर वृक्षारोपण केले जाई. तपोवनात आतापर्यंत संत श्री मेहेर बाबा, संत श्री केसकर महाराज, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल, भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. वळे, जपानमधील भारतीय राजदूत मो. ज्ञा. शहाणे, तेंडोलकर वकील, लोहिया शेठजी, प्रभाकरपंत कोरगावकर, रावबहादूर सर रघुनाथराव सबनीस, लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात, चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर, नाना धर्माधिकारी , लेफ्टनंट जनरल नागेश, भारताचे माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई , प्रसिद्ध दिग्दर्शक यशवंत पेठकर, नॉर्वेच्या विदुषी सुमतीबाई, डॉ. रा.शं. किबे, दादा धर्माधिकारी, कु. विमलाताई ठकार, वि.म. परांजपे, नाना गबाळे तसेच अनेक नामवंत लेखकानी वृक्षारोपण केले आहे.  

या सर्व नामवंतामध्ये विद्यापीठ सोसायटीचेे पहिले अध्यक्ष डॉ. जॉर्ज एस. अरुंडेल यांचे नाव महत्त्वाचे आहे. २९ नोव्हेंबर १९२८ रोजी डॉ. जॉर्ज एस्.अरुंडेल हे तपोवनात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी, भारतीय भरतनाट्यम या नृत्यप्रकाराला जागतिक पातळीवर नेणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना, डॉ. रुक्मिणीदेवी अरुंडेल याही होत्या.   डॉक्टर अरुंंडेल हे त्यावेळी होमरूल चळवळीच्या प्रणेत्या डॉ.ॲनी बेझंट यांचे सहायक म्हणून काम करत होते. तपोवन आश्रमाची उभारणी ज्या थिऑसॉफीच्या (विश्वबंधुत्व) तत्त्वावर झाली होती, त्या थिऑसाॅफीचे जागतिक मुख्यालय मद्रास (चेन्नई ) येथील अड्यार या ठिकाणी आहे. या अड्यारच्या केंद्रात असणाऱ्या अतिशय प्राचीन वटवृक्षाचे एक रोपटे डॉ.ॲनी बेझंट यांनी तपोवनात लावण्यासाठी म्हणूून पाठवले.  डॉ. जॉर्ज अरुंडेल हे वटवृक्षाचे रोपटे घेऊन स्वत: तपोवनात आले. दीक्षित गुरुजींनी डॉ. जॉर्ज अरुंडेल यांच्या हस्तेच हे वटवृक्षाचे रोप लावून घेतले. तो शुभ दिवस होता २९ नोव्हेंबर १९२८. ‘ बोधिवृक्ष ‘ असे या वटवृक्षाचे नामकरण करण्यात आले. या बोधिवृक्षाचे रोपटे मद्रासच्या ज्या थिऑसॉफी केंद्रातून तपोवनात आणले गेले त्या केंद्रात तो मूळ वृक्ष आजही आहे. अड्यार नदी मद्रासला ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते, त्या ठिकाणी हा भारतातील सर्वात वयोवृद्ध वृक्ष आजही डौलात आणि ताठ मानेने उभा आहे. त्याचे आयुष्यमान सुमारे ४५० वर्षाचे असावे असा तज्ज्ञांचा अंदाज असून, हा वृक्ष केवळ भारतातीलच नव्हे तर कदाचित जगातील सर्वात पुरातन वृक्ष असण्याची शक्यता आहे. या झाडाच्या पारंब्या जेथे जेथे जमिनीवर टेकल्या आहेत तेथे तेथे जणू दुसरा बुंधाच तयार झालेला आहे. असे हजारो बुंधे तयार झाल्यामुळे झाडाचा मूळ बुंधा कोणता हे ओळखता येत नाही. याच्या फांद्यांचा पसारा ६२००० चौरस फुटापर्यंत पसरलेला असून झाडाच्या फांद्या जमिनीपासून चाळीस फूट उंचीवर आहेत. एकेका फांदीचे वजन 30 टनापेक्षा जास्त भरेल असा अंदाज आहे. समुद्रकिनारी बहुतेक नारळ – पोफळीची झाडे वाढतात. पण हा वटवृक्ष त्याला अपवाद आहे.  झाडाचे जतन व्हावे म्हणून या झाडाभोवती एका विस्तीर्ण उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली असून अड्यार नदीकाठच्या या उद्यानाचा पसारा २६० एकर इतका विस्तीर्ण आहे. या उद्यानाचे नाव ‘ हडलस्टोन गार्डन ‘ असे असून या बागेत इतरही शेकडो दुर्मिळ वृक्ष आहेत. वटवृक्षाच्या शीतल छायेतून चालताना आपणास अंतर्मनातील शांततेचा अनुभव येतो. या बागेत दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे .अनेक प्राण्यांचेही वास्तव्य येथे आहे. या ठिकाणी अहिंसा धर्माचं पालन तंतोतंत केलं जातं. अहिंसा म्हणजे केवळ प्राणी, झाडे यांची हत्या न करणे असा नसून, आपल्या एखाद्या शब्दानेही कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेणे. विचाराने, आचाराने आणि उच्चारानेही कोणाचे मन दुखावले जाणार नाही हे पाहणे म्हणजेच विश्वबंधुत्व. विश्वबंधुत्वाचा अर्थ केवळ मानवजातीपुरता मर्यादित नसून हे बंधुत्वाचं नातं मानवाबरोबरच वृक्ष, प्राणी आणि इतर जीवांशीही जोडले जाते. म्हणूनच तेथे वृक्ष किंवा एखादी फांदी तोडण्यासही मनाई आहे. अड्यार येथील अशा पवित्र वटवृक्षाचे रोप जागतिक थिऑसाॅफी फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि विद्यापीठ सोसायटीचे पहिले अध्यक्ष डॉ. जॉर्ज एस. अरुंडेल यांनी स्वतः आणून, स्वतःच्या शुभहस्ते तपोवनात लावले आहे. तपोवन हे खऱ्या अर्थाने ‘तपोवन’ आहे याची साक्ष हा बोधिवृक्ष आजही देत आहे. 

आज तपोवनातील बोधिवृक्षाचाही सुमारे अर्धा एकर परिसरात विस्तार झाला आहे. या वृक्षावर सकाळी विविध पक्षांचा किलबिलाट आपल्याला ऐकावयास मिळतो. विशेषत: हिरव्यागार पानांच्या देठांमधून लालचुटुक,  गोलाकार फळांनी हा वटवृक्ष  बहरला की त्याचे सौंदर्य वेगळेच असते. ही लालचुटुक फळं खाण्यासाठी साळुंकी, तांबट पक्षी,  कावळे ,कोकीळ, बुलबुल, मैना, यासारख्या पक्षांची जणू स्पर्धाच लागते. या झाडावर घार आणि कावळे यांची शेकडो घरटी आहेत. आपली मान गर्रकन फिरवणारे शेकडो पिंगळे या वडाच्या ढोलीमध्ये  लपलेले असतात. आता झाडाच्या मोठमोठ्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचल्या असून त्याचे रूपांतर जणू दुसऱ्या बुंध्यामध्ये होऊ लागले आहे. तपोवनाच्या शेजारी असणाऱ्या कलानिकेतनच्या मुलांना हा विशाल वटवृक्ष जणू नेहमी साद घालत असतो. ही कलाकार  मुले या डेरेदार वृक्षाचे पेंटिंग करताना स्वतःला विसरून जाताना दिसतात. तपोवनात असलेल्या शाळेतील विद्यार्थी, तसेच जवळ असणाऱ्या आयटीआय चे विद्यार्थी दुपारच्या वेळी या वटवृक्षाच्या सावलीत निवांतपणे अभ्यास करताना दिसतात. तपोवनाचे संस्थापक पूज्य दीक्षित गुरुजींनी एक सुंदर बाग या वटवृक्षाच्या सभोवती तयार केली होती, परंतु काळाच्या ओघात ती बाग आता नाहीशी झाली आहे. पण गुरुजींनी या वृक्षाभोवती बांधलेला मोठमोठ्या घडीव दगडांचा पार अजूनही सुस्थितीत आहे. वटवृक्षाचा पसारा आता खूप लांबूनही पाहायला मिळतो. सेेवा, स्वाध्याय, स्वावलंबन आणि साधी राहणी या तपोवन आश्रमाच्या चतु:सूत्री  बरोबरच अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचे संस्कार दीक्षित गुरुजींनी, या बोधिवृक्षाच्या साक्षीने  तपोवनातील आश्रमीय विद्यार्थ्यांवर केले .सध्या 93 वर्षाचे आयुष्यमान असणारा तपोवनातील हा बोधिवृक्ष लवकरच शतायुषी होईल.

लेखक – श्री प्रदीप गबाले (तपोवनवासी)

निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.

9766747884

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments