?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘ओला’ पेक्षा कोरडंच जळणारे… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

पुण्यातली सार्वजनिक वाहतूक बेकार आहे, म्हणून एवढी वर्षे पुण्यातले रिक्षावाले मुजोरी करतायत. कालच एक पोस्ट वाचली – फेसबुक आणि whatsapp वर. ह्या लोकांचे नखरे आहेत म्हणून उबेर, ओलाचा व्यवसाय सुरु झालाय. अगदी तंतोतंत खरंय. मी तर  म्हणतो रिक्षा, टॅक्सीवाल्यांची ही मुजोरी जशी वाढत जाईल त्या प्रमाणात उबेर, ओला ह्यांचा व्यवसाय वाढत जाणारे.

उबेर, ओला कॅबच्या बुकिंगमधला कन्व्हिनियन्स, त्यांची सर्व्हिस, त्यांचा USP आहे. जेवढ्या पैश्यात कुठल्याही अवस्थेच्या गाडीतून हे रिक्षावाले नखरे करून उपकार केल्यासारखे पॅसेंजरना घेऊन जातात, तेवढ्याच पैशात हे ओला’वाले त्यांना एसी लावून गाडीतून पाहिजे तिथे नेतात. जेवढे त्यांच्या मीटरवर दिसतात त्याच पैशांचा आपल्याला मेसेज येतो. तेवढे पैसे कॅश, कार्डनी दिले की विषय संपला. फक्त ‘पीक अवर्सना’ हे लोक जास्त चार्ज करतात. ज्या लोकांना त्या वेळाची किंमत असते, ते जास्त पैसे देऊन जातात.

ओला काय किंवा उबेर काय, ह्यातले ड्रायव्हरही रिक्षावाल्यायेवढीच हातावर पोट असलेलीच लोकं आहेत. त्यातल्या बहुतेकांनी त्यांच्या स्वतःच्या गाड्या भाडेकरारावर ह्या कंपन्यांना दिलेल्या आहेत. त्यांच्या गाड्या फोडून ह्या कंपन्यांना काही एक फरक पडत नाही. रिक्षावाले त्या बिचा-या गाडीवाल्याच्याच गाडीचं नुकसान करतायत आणि एका गरीबाचाच रोजगार बुडवतायत. ह्याच्यामुळे लोकांच्या वेळेला भाडे न नाकारणाऱ्या, पैश्यांच्या सापडलेल्या थैल्या प्रामाणिकपणे परत करणाऱ्या सामान्य, प्रामाणिक रिक्षावाल्यांबद्दल ज्यांना आपुलकी वाटते, अश्या  माझ्यासारख्या असंख्य लोकांची सहानुभूती हे समस्त रिक्षावाले गमावून बसतायत. आयुष्यभर विरोधाला म्हणून विरोध करणाऱ्या नेत्यांच्या नादी लागून दुर्दैवानी एक दिवस ह्या रिक्षावाल्यांचंच भवितव्य अंधारात येणारे, हे ह्यांना कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे. ओल्याबरोबर सुकंही जळतं म्हणतात. इथे ‘ओला’ न जळता फक्त कोरडंच जळणारे, हे लक्षात घ्या. 

स्वतःची मुजोरी टिकवायला म्हणून दुस-याचा धंदा बंद पाडायचे दिवस गेले आता. तसा विचारच करायचा झाला तर रिक्षा आल्यावर टांगेवाल्यांनी किती दिवस संप केला होता? किती रिक्षा फोडल्या होत्या? एक्प्रेस वे झाला, लोकं गाड्यांनी जास्ती जायला लागले, म्हणून रेल्वेवाल्यांनी संप केला होता का?

रिक्षावाल्यांनो, काळाची पावले ओळखा, कुठलेही भाडे न नाकारता, दिवसाच्या कुठल्याही भाड्याला दीडपट वगैरे चार्ज न घेता, इमानदारीत रिक्षा चालवून  दिवसाला ९००-१००० रुपये कमावणारा रिक्षावालाही माहित्ये मला. अशी सर्व्हिस दिलीत तर लोक आपणहून कोप-यावरच्या स्टँडवरची रिक्षा पकडून जाणे पसंत करतील. तुम्हाला एकही दगड उचलायची वेळ येणार नाही.

साधारण ९६-९७ साली  रिक्षावाल्यांनी बेमुदत संप पुकारल्यावर (बहुतेक ग्राहक पंचायतीनी) पुण्यात ‘लिफ्ट पंचायत’ हा उपक्रम सुरु केला होता. एकटे जाणाऱ्या प्रत्येकांनी हात दाखवेल त्याला आपल्या गाडीत लिफ्ट द्यावी, अशी साधी आणि मोफत कल्पना होती. पुण्यातल्या लोकांनी मुजोरी रोखायला ती चकटफू आयडिया डोक्यावर उचलून धरली. ती एवढी यशस्वी झाली की, माझ्या आठवणीत पुढची २-३ वर्षं तरी कुठल्याही मागणीसाठी पुण्यात रिक्षावाल्यांचा संप झाला नाही.

— आज गरज आहे, अश्याच किंवा अगदी ह्याच उपक्रमाची. मी माझ्यापासून आजच सुरुवात करतोय. हात दाखवेल त्याला, शक्य असेल तिथपर्यंत, गाडीत लिफ्ट देण्याची. बघू, ही मुजोरी टिकते, का सामान्य नागरिकाची ताकद भारी पडते ते?

बंद_संप_ह्यावरच_बंदी_आणा

लेखक : अंबर कर्वे

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments