सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ भावाचे माहेरपण… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 “हे काय,चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस, यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा..?” अनुने पर्स टेबलावर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळली देखील,…

अभी जाम मूडमध्ये ओरडला, ” मै मायके चला जाऊंगा तुम देखती रहीयो,..” पाणी पिताना येणारं हसू दाबत..अनुने हातानेच खुणावलं,..आणि घोट गिळत विचारलं, ” नक्की बरा आहेस ना..?”– अभी अगदी फुल मूड मध्ये,..” हम तो चले परदेस,…हम परदेसी हो गये,..”

आता अनु त्याच्याजवळ जात त्याला दटावत म्हणाली,” अभ्या नाटकं नको हं, पटकन सांग काही दौरा आहे का कम्पनीचा,..?”

“ नाही मॅडम मी खरंच माहेरी चाललोय,..पुण्याला..” अनुने लाडाने त्याला पाठीत हलकी चापट देत म्हटलं,..

” ताईंकडे चाललास ना, मग असं सांग ना,.. हे काय नवीन,.. म्हणे माहेरी चाललो,..”

अभिने शर्टची घडी केली, इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे, तिचा हात हातात घेऊन म्हणाला..” म्हणू दे मला, हा शब्द छान वाटतोय,..यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत,.. मग तायडी आणि माझंच राज्य होतं,.. भाऊबीजेला ओवाळलं तिने मला आणि माझ्या हातात तिने हे तिकिटाचं पाकीट ठेवलं,..” मी म्हटलं, ” अग, मला ओवाळणी देतेस काय,.?”

तर ताई म्हणाली,..” ओवाळणी नाही रे, तुला माहेरपणाला बोलावतीये,..”

मी जोरजोरात हसायला लागलो,.. तसं तिने मला जवळ घेतलं..खूप रडली गळ्यात पडून. म्हणाली, ” आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलास अभ्या,..त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास,..तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात. पण तिला माहेर तरी आहे,..तुला कुठे रे माहेर,..? कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्यासोबत जगलो, त्या उजळवण्याची जागा, माहेर असते,..आई बाबा गेले की पुरुषाची ती जागा नक्कीच हरवते ना..मग मला वाटलं आपण माहेरी जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं- म्हणजे माझ्याकडे.. अनु आली की तू निघणार आहेस..तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय म्हणजे उगाचच म्हणायला नको,..गाड्यांना गर्दी आहे,..मी वाट बघेन तुझी, “ एवढं सांगून तायडी गेली,..

“ आता मी चाललो माहेरी,.. जाऊ ना राणीसरकार,..?”

अनु म्हणाली, “आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते,..” नको जाऊस ना माहेरी,मला करमत नाही,..प्लिज, आपण मज्जा करू,..थांब ना,..” एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली,..तसं अभिने तिला जवळ ओढलं,.. कुजबुजत्या स्वरात म्हणाला, ” खरंच नको जाऊ का ग..?” अनु म्हणाली, ” जा बाबा जा, जिले तेरी जिंदगी,..तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं,.. आपल्या विषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं,.. मायेचा हात, आठवणींचा पाट सतत गप्पांमधून वाहणं… सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं,..”

अभि म्हणाला, ” अस्सं….. मग येतोच हे सुख उपभोगून,..”

अनु त्याला बसमध्ये बसवून आली,.. तिला वाटलं, खरंच भारी कल्पना आहे ही, भावाला माहेरपण करायचं,….तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला,.. “ ये ना दोन दिवस, अभि गावाला गेलाय, मला सोबत होईल तुझी,..” दुसऱ्या दिवशी भाऊ हजर,..

दोन्हीकडे माहेरपण रंगलं,..बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींच्या गप्पांना ऊत आला,..कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटाने डोळे गच्च भरून आले,..एक नातं घट्ट होतं, ते आणखी विश्वासाने घट्ट झालं,..भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं.

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments