श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘हद्द…’ – भाग – 4 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

तात्यांनी थबकून कानोसा घेतला. कण्हण्याचा आवाज जरा मोठ्यांनी आला. ‘ हा त्याचाच आवाज.. तो अडलकलाय इथं..’ तात्यांनी ओळखले, बायकोला हाक मारली. कंदील बाजूला ठेवून बॅटरी तिच्या हातात दिली. ‘तुळई बाजूला करून त्याला बाहेर काढायलाच हवं… पण एवढी मोठी तुळई, ती ही एका बाजूने मलब्याखाली अडकलेली, आपल्याला हलेल तरी का ?’ तात्यांच्या मनात विचार आला…  ‘ पण काहीही झालं तरी त्याला बाहेर काढायलाच हवं.. आपल्यालाच हलवायला हवी तुळई, एवढया रात्री मदतीला येणार तरी कोण ? गाव तसे कोसावर.. त्यात हा पाऊस आणि रात्र.. तिथंवर जाऊन माणसे गोळा करून आणेपर्यंत त्याला काही झाले तर.. ? नाहीsनाहीss! आपणच करायला हवं काहीतरी..’ मनात आलेल्या नकारात्मक  विचारांनी दचकून त्यांनी मनातून ते विचार झटकले आणि तुळई हलवायचा प्रयत्न करू लागले. तुळई त्यांना तसूभर सुद्धा हलली नाही. त्यांनी बॅटरीचा झोत तुळईवर पडेल अशी बाजूच्या दगडावर बॅटरी ठेऊन बायकोला मदतीला बोलावले. दोघे मिळून तुळई हलवण्याची धडपडू लागले पण तुळई जरासुद्धा हलली नाही.

       ही तुळई हलवून बाजूला करण्याची ताकद आता आपल्या या म्हाताऱ्या हातात उरलेली नाही याची जाणीव झाली तेंव्हा त्यांच्या डोळ्यांतून ओघळलेली आसवे पावसाच्या थेंबाबरोबर गालावरून ओघळून गेली.  त्यांनी सदऱ्याच्या ओल्या बाहीनेच डोळे टिपले. क्षणभर हताश झालेल्या मनाला सावरले. त्यांनी क्षणभर ‘ आकाशातील देवाला ‘ हॅट जोडले आणि काहीसा विचार करून तुळईच्या बाजूचे दगड बाजूला करायला सुरुवात केली. काही दगड- माती बाजूला सारल्यावर त्यांना तो दिसला.. अर्धा दगड- मातीत गाडला गेलेला दगड-तुळईच्या बेचक्यात राहिल्याने वाचलेला, रक्तबंबाळ झालेला. तो दिसताच तात्यांनी बायकोला जवळ बोलावून कंदील, बॅटरी पुन्हा व्यवस्थित बाजूला ठेवायला सांगून तिच्यासह दगड, विटा, माती बाजूला करायला सुरुवात केली.

      ” घाबरू नको, आम्ही आलोय, काढतो तुला बाहेर. “

      त्याला ऐकू जाईल का ? समजेल का ? याचा विचार न करता दगड बाजूला करता करता तात्या मोठ्याने त्याला म्हणाले.  वय झालेल्या तात्यांच्यात बारा हत्तीचं बळ आले होते. मनात फक्त त्याला बाहेर काढायचा, त्याला वाचवायचा विचार होता. ते तुळईच्या बाजूचे दगड बाजूला करत असतानाच एक दगड  त्यांच्या पायाची सालटे काढीत घरंगळत खाली गेला.अगदी थोडक्यात त्यांचा पाय वाचला होता. तात्या त्याकडे दुर्लक्ष करून बायकोच्या मदतीने मलबा बाजूला करण्यासाठी धडपडत होते. तुळईच्या वरचा, बाजूचा मलबा बाजूला करून झाल्यावर तात्यांनी पुन्हा तुळई हलवायचा प्रयत्न केला. तुळई जरा हलल्यासारखी वाटली तेंव्हा त्यांना आणखी हुरूप आला.

      ” ए, इकडे ये आणि जरा जोर लाव. ” त्यांनी बायकोला बोलावले आणि ते चार म्हातारे हात तुळई हलवण्यासाठी धडपडू लागले. कितीतरी वेळ प्रयत्न करून त्यांनी थोडी थोडी करत तुळई बाजूला केली.  बाजूला केलेल्या तुळईच्या आधारानेच तात्या बेचक्यात त्याच्याजवळ उतरले. त्यांनी त्याच्या पायावरील मलबा बाजूला केला. दरम्यान तो बेशुद्ध पडला असावा. तात्यांनी आणि त्यांच्या बायकोने प्रयत्नांची शिकस्त करत कसातरी त्याला उचलून बाजूला आणत घरात आणला. त्याला पलंगावर ठेवून ते थकले-भागलेले दोन जीव विसावले. 

                                  क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments