सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ काव्य भास्कर ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

वाचनाचे विविध फायदे आहेत. ह्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती होऊन ज्ञानात भर पडते. वाचनामुळे वाडःमय, साहित्य अशा नानाविध प्रकारांची गोडी लागून एक प्रकारची समृद्धी येते. आणि ही लाभलेली श्रीमंती वा लाभलेलं समाधान पण काही ओरच असतं बरं का.

वाचनाच्या साहित्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत.त्यापैकी कमी शब्दांत उच्च कोटीच्या भावना जागवणारं माध्यम म्हणजे काव्य , कविता. कविता करतांना आपल्या मनातील वा आपल्याला अपेक्षित असणारा संपूर्ण आशय हा अगदी मोजक्या शब्दांत रसिकांपर्यंत पोहोचवायचा असतो.ही कामगिरी खरोखरीच कसोटीची बरं.त्यामुळे गीत रचयितांना,कविंना मानाचा मुजरा.

आपल्याकडे एकसे बढकर एक काव्य रचयिते होऊन गेलेत आणि सध्या सुद्धा आहेत. ह्या होऊन गेलेल्या कविंमध्ये एक अजरामर नाव म्हणजे भा.रा.तांबे ह्यांचं. तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’, ‘कशी काळनागिणी, सखे ग, वैरीण झाली नदी’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘मावळत्या दिनकरा’, ‘जन पळभर म्हणतील’ यांसारखी एकाहून एक सुमधुर भावगीतं रचून मराठी काव्य समृद्ध आणि श्रीमंत करणारे राजकवी भा. रा. तांबे यांचा २७ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने हा आठवणींचा कप्पा परत एकदा उलगडतोयं.

खरतरं काव्य करणारे हातं,मनं,डोळे हे सरसकट  फक्त आणि फक्त भावनिक क्षेत्रात आढळतात. पण ही समजूत कशी चूकीची आहे हेच जणू ह्या राजकवींनी सिद्ध केलयं. ह्यांची कामकाजाची ठिकाणं आणि हुद्दे म्हणजे हे  संस्थानी वकील, दिवाण, न्यायाधीश, सुपरिटेंडंट अशा रुक्ष नोकऱ्या करीत होते आणि ह्या रूक्ष क्षेत्रात एकीकडे कार्यरत राहून एकीकडे मात्र स्वत्ःमधील कोवळं मनं,कविमनं ह्यांनी निगुतीने जपलं.आणि एकाहून एक सरस अशा गोड कविता आणि गाणी ह्यांनी सहजतेने रचल्यात. त्यांनी एकीकडे ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, वारा नेई सोने वाटे वाहुनिया दूर’ ह्यासारखी  निसर्गकविता, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’सारखं बहीणभावाचं खेळीमेळीचं नातं वर्णन करणारं गीत, ‘या बालांनो सारे या, लवकर भरभर सारे या’सारखी बालकविता आणि त्याच सहजतेने ‘डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नका’ अशी एका प्रेयसीची लोभस विनवणीही त्यांचीच देणं. ‘नववधू प्रिया मी बावरते’ अशी नवपरिणित तरुणीची घालमेलही ते एकीकडे मांडतात आणि दुसरीकडे ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’सारखं जीवनातलं कटू सत्य सांगणारं गीतसुद्धा लिहून जातात.

भा.रा.तांबे यांनी १९२६ सालच्या मध्य भारतीय कविसंमेलनाचं आणि १९३२ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. प्रणयप्रभा, तांबे यांची समग्र कविता अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सात डिसेंबर १९४१ रोजी ग्वाल्हेरमध्ये त्यांचं निधन झालं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments