सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २७ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ आसामी सिल्कचा, पदर भरजरीचा ✈️

तेजपूर हे आपल्या सैन्याचे मोठे ठाणे आहे. सैनिकांची ने-आण करणाऱ्या मिलिटरीच्या वाहनांची रस्त्यावर सतत ये- जा होती. लष्कराच्या उपयोगासाठी एक  विमानतळही आहे. तेजपूर शहर आखीव-रेखीव,नेटके आहे. तेजपूर ओलांडून भालुकपॉ॑गच्या गर्द अरण्यातून आमची गाडी चालली होती. संध्याकाळचे सात वाजायचे होते तरी काळोख झाला होता. दोन्ही बाजूंच्या उंच, काळसर दिसणाऱ्या वृक्षांमुळे अंधार अधिकच घनदाट झाला होता. अचानक ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला. ‘गणेशबाबा, गणेशबाबा’ असे दबक्या आवाजात म्हणत भक्तिभावाने एक हात कपाळाला लावून, मान झुकवून त्याने नमस्कार केला. आम्ही बाहेर पाहिले तर एक हत्ती रस्त्याच्या कडेला अंधारात झाडांमध्ये उभा होता. त्याला बहुतेक रस्ता ओलांडून पलीकडच्या जंगलात जायचे होते. आमच्या गाडीच्या  दिव्यांच्या प्रकाशामुळे तो थांबला होता. जंगली हत्तीचे सहज दर्शन घडले. नंतर ड्रायव्हरने सांगितले की, अशा जंगलात दिसणाऱ्या हत्तींना ते ‘गणेशबाबा’ म्हणतात. त्यांना श्रद्धेने नमस्कार करतात. तो म्हणाला की, ‘आम्ही असे व्यवसायानिमित्त जंगलात फिरतो आणि आमची बायकामुले आसाममधल्या एखाद्या खेड्यात जंगलाजवळच राहत असतात. वाघ, गवे, रानरेडे व इतर जंगली प्राणी यांची आम्हाला कायम भीती असते. पण गणेशबाबा आमचे, आमच्या कुटुंबाचे रक्षण करतो. हत्तीच्या स्वरूपातील गणपती आपले रक्षण करतो ही श्रद्धाच त्यांना जगण्याचे बळ देत असावी.

नामेरीला पोहोचल्यावर आवरून, जेवून आम्ही तिथल्या गच्चीवर गेलो. आजूबाजूचे वृक्ष काळपट हिरवे पांघरूण घेऊन स्तब्ध उभे होते. आकाशाच्या मोकळ्या घुमटात तारकांच्या लक्ष लक्ष ज्योती उजळल्या होत्या. अपार शांतता अनुभवत उभे होतो. थंडी वाढल्याने फार वेळ गच्चीत थांबता आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जियाभरोली नदीने आणि तिच्या परिसराने आम्हाला भारून टाकले होते. नदीच्या पलीकडे अरुणाचल राज्याची हद्द सुरू होते. परदेशी प्रवासीही इथे मुक्कामाला असतात. इथून पुढे बोमदिला, सेला खिंड, तवांग इथे जाता येते.

आजचा मुक्काम  काझीरंगाला होता. वनविभागाचे हे विश्रामधाम  स्वच्छ, शांत आणि दाट झाडीत लपलेल्या छोट्याशा टेकाडावर आहे. काझीरंगा अभयारण्य म्हणजे दाट जंगल नसून दहा-बारा फूट उंच वाढलेल्या गवताचा विस्तीर्ण प्रदेश आहे. यात मध्ये मध्ये कच्चे- पक्के रस्ते आहेत. संध्याकाळी जीपमधून काझीरंगाचे दर्शन घेतले. लांबवर हरणे, माकडे, सांबर, रानरेडे, हत्ती, गेंडे दिसत होते. एका छोट्या पाणथळीवरील पुलावरून पाण्यातील मगर, छोटी कासवे दिसली. लांबवर उडणारे पांढरे बगळे, गरुड, नीलकंठ व काही इतर पक्षी या सर्वांचे दूरदर्शन झाले.

दुसऱ्या दिवशी पहाटे हत्तीवरून सैर केली तेंव्हा खरे काझीरंगा दिसले. सात आठ हत्ती एकदम निघतात. सर्वांना मिळून एक बंदूकधारी रक्षक त्यातल्या एका हत्तीवर असतो. सर्व हत्तींनी एकत्र राहायचे असते. आमच्या हत्तीणीचे नाव होते ‘जयमाला’. माहूत जरा पोरगेलासा होता. पुरुषभर उंचीच्या गवतातून जात असताना हत्ती मधे मधे सारखे सोंडेने गवत उपटून खातात.पहाटेच्या वेळी गवतावर पडलेले दंव आपल्या अंगावर गुलाबपाण्यासारखे उडत असते. हरणांचा कळप, एक शिंगी गेंडे, रानटी म्हशी, गवे असे काही दिसले की माहूत गवतातून आमच्या हत्तीणीला शक्य तितके त्यांच्याजवळ नेत असे. असाच एक रानटी म्हशींचा कळप होता. त्यात एक पिल्लूसुद्धा होते. आमच्या तरुण रक्ताच्या माहुताने जयमालेला पुढे काढून अगदी त्या रानटी म्हशींच्या जवळ नेले. त्यातल्या आईचा काय गैरसमज झाला कोण जाणे. पण अकस्मात ती आमच्या हत्तीणीवर चाल करून आली. तिने तिच्या फताड्या शिंगांनी जयमालेला जोरदार धडक दिली. बाकीचे हत्ती मागे होते. आमची हत्तीण या रानम्हशीशी झुंज देऊ शकली असती. पण हत्ती हा जात्याच अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. तो सहसा चूक करीत नाही. आपल्या पाठीवर बसलेल्या चार प्रवाशांची आपल्यावर जबाबदारी आहे या उपजत शहाणपणामुळे तिने गर्कन अबाउट टर्न घेतला. ही युद्ध करण्याची वेळ नाही हे जाणून आम्हाला त्या रागीट म्हशीपासून शक्य तितक्या लांब घेऊन जाऊ लागली. पण ती म्हैस इतकी खवळली होती की तिने मागून येऊन जयमालेला जोरदार ढुशी दिली. उतरल्यावर पाहिले तर त्या हत्तीणीच्या पार्श्वभागावर त्या म्हशीच्या शिंगाचा अर्धचंद्राकृती ओरखडा उठला होता  आणि त्यातून रक्त येत होते. माहूत तिला औषधपाणी करायला घेऊन गेला. आम्ही भालूकपाॅ॑गच्या ‘गणेशबाबाला’ मनोमन नमस्कार केला.

शिलाॅ॑ग ही मेघालयाची राजधानी. नागमोडी,  वळणावळणाच्या रस्त्याने डोंगर माथ्यावर वसलेले हे शहर ब्रिटिशांना स्कॉटलंडची आठवण करून देत असे. गारो, खासी व जयंती  अशा टेकड्यांनी मेघालय बनले आहे. हिरव्यागार डोंगर माथ्यांवरून पांढऱ्या शुभ्र ढगांचे थवे भटकत असतात. वाटेत बांबूची झाडे, जंगली केळींची झाडे, लहान मोठे तलाव दिसत होते. वेगवेगळी रंगीबेरंगी फुले आणि त्यावर स्वच्छंद भिरभिरणारी, रंगवैभव मिरविणारी मोठी फुलपाखरे दिसली. ‘बडा पाणी’ या विस्तीर्ण तलावाकाठी थोडा वेळ थांबलो. हॉटेलवर सामान ठेवून संध्याकाळी तिथल्या बाजारात हिंडलो.  तिथल्या ‘दिल्ली मिष्टान्न भांडार’ने सर्वात मोठ्या आकाराची जिलेबी बनवून गिनीज बुक मध्ये नाव नोंदविल्याचे वाचले होते. दुकानात खूप गर्दी होती. एका भल्या मोठ्या पसरट कढईत शिस्तीने सारख्या आकाराच्या जिलब्या तरंगत होत्या. कढईमागील तज्ञ आहात त्या व्यवस्थित उलटून पाकात बुडवून ताटात ठेवीत, की लगेच त्या प्रवाशांच्या ओठात पडत. पंधरा-वीस मिनिटांनी आमचा नंबर लागला. जिलेबी खरंच छान होती.

हॉटेलवर परतल्यावर काउंटरवरील मॅनेजर बाईंशी थोड्या गप्पा मारल्या. माहिती विचारली. तिथल्या  भिंतीवर एक वेगळाच फोटो होता. एका झाडाची मुळे लांबवर वाढत जाऊन, खालचा खळाळता, दगड गोट्यांनी भरलेला ओढा पार करून पलीकडल्या झाडांना जाऊन भेटली होती. असा डबल डेकर ब्रिज त्या चित्रात दिसत होता. तिने सांगितले की ही एक प्रकारच्या रबर प्लांटची मुळे( हे एक शोभेचे जंगली रबर प्लांट आहे यापासून रबर मिळत नाही) अशी भक्कम असतात व लांब लांब वाढत जातात. हुशार मानवाने त्या मुळांना वळण देऊन, आधार देऊन दुसऱ्या टोकाला नेले. तिथल्या आजूबाजूच्या खेड्यातल्या माणसांना ओढा ओलांडायला त्याचा उपयोग होतो. आता ते प्रवाशांच्या आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. या लिव्हिंग रूट ब्रिजचे (living root bridge) आकर्षण परदेशी प्रवाशांना जास्त आहे. कारण जगात फारच क्वचित असे नैसर्गिक जिवंत ब्रिज आहेत. आम्ही अर्थातच फोटो पाहून समाधान मानले कारण तिथपर्यंतचे जंगलातले धाडसी ट्रेकिंग आमच्या आवाक्याबाहेरचे होते.

आसाम भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments