सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गंध सुगंध… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘चला, उठा, मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली’ म्हणत येणाऱ्या छोट्या मुलाची जाहिरात टीव्हीवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते. आणि तऱ्हेतऱ्हेचे सुगंध परिसरात दरवळू लागतात. सुगंधी तेल, साबण, उटणे, अत्तर यांचे वास नाकाला येऊ लागतात.

पंचंद्रियात गंधाचे इंद्रिय हे फार तीक्ष्ण असते. कोणत्या वासामुळे आपण कुठे आहोत हे डोळ्यांनी न पाहता सुद्धा समजते. त्यावरून सहज आठवले ते पदार्थांचे वास!

यांच्या एका स्नेहांकडे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास जावे की कांदे पोह्याचा वास अगदी बाहेरच्या दारापर्यंत यायचा! तसे कांदे पोहे तेच पदार्थ घालून केले तरी त्यांच्या इतके छान जमतील असं वाटायचं नाही. तो कांदे पोह्याचा वास अजूनही स्मरणात आहे!

 उन्हाळ्यातील संध्याकाळी अंगणात पाणी मारले की येणारा मातीचा वास- मृद्गंध, संध्याकाळी उमलणारी जुई, मोगरा, रात राणीची फुले यांचे सुगंध हे काही कुपित भरून ठेवायचे गंधच नाहीत मुळी! ते फक्त मनाच्या कुपीतच भरून राहतात आणि आपले आपल्याला अनुभवता येतात. असाच एक गंध माझ्या आजोळ च्या घरात मी मनात भरलेला! माझ्या मामाच्या घरी म्हैसूर सँडल्स वापरला जाई.तो येणारा चंदनी वास मला आजोळच्या घरी घेऊन जातो. आम्ही ‘हमाम’ साबण वापरणारे त्यामुळे त्या चंदनी सोपचा वास आमच्यासाठी दुर्मिळच होता!

सुगंध हा असा सांगता तरी येतो पण माझ्या मुलीला आजीची गोधडी पांघरली, की आजीचा वास त्या गोधडीला येतो आणि तसाच वास आईच्या गोधडीलाही येतो असं ती म्हणायची तेव्हा मी बघतच राहायची! पण ते आजीचं आईचं ते पांघरूण तिला मायेच्या सुगंधात ओढून घ्यायचं!

कितीतरी वेगळे वास दिवस भरात घेतो. किराणा मालाच्या दुकानात  तेल, डाळी, धान्य, साबण इत्यादींचा एकत्रित वास भरलेला असतो. पॅकिंगच्या जमान्यात दुकानात येणारे हे वास आता कमी झाले आहेत. कापडाच्या दुकानातील कोऱ्या कापडाचा गंध हाही वेगळाच! तो कॉटन ला येणारा वास आता सिंथेटिक कपड्यांना नाही!

कामावर जाताना येताना लोकल, बस प्रवास यातील गंध, घामाचा कुबट वास नको म्हणून मारलेले विविध प्रकारचे स्प्रे यामुळे होणारे वासाचे मिश्रण नाकाला झोंबणारेच वाटते काही वेळा तर ते ऍलर्जीकही  असते.

गंध सुगंधांच्या या दुनियेत देवघरात येणारा वास काही वेगळाच असतो वातावरणाचा परिणाम असेल किंवा काही असेल पण तिथे येणारा धूप, कापूर, उदबत्ती, अत्तर यांचा सुगंध मनाला पवित्रतेचा आनंद देतो. वेगवेगळे गंध आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मिळत असतात आणि कळत नकळत ते आपण घेत असतो.कोळीणीला माशांच्या गंधाइतके काहीच प्रिय नसते. तिच्या उशाशी वासाच्या फुलांपेक्षा मासळीचा गंधच तिला अधिक आनंद देतो! बालगंधर्व अत्तराचे खूप शौकीन होते. त्यांच्या रोजच्या स्नानाच्या पाण्यात विविध प्रकारची अत्तरे वापरली जायची. त्यांच्यासाठी कनोजहून अत्तरे मागवली जायची.पूर्वीच्या काळी राजे रजवाडे अशा सुगंधी अत्तराचे मोठे खरेदीदार असतं.तो जमाना गेला!  गंधांचे महत्त्व बदलले.सेंटची कृत्रिम दुनिया जन्माला आली आणि पाश्चात्य संस्कृतीचे सुगंध दरवळू लागले.

गंधाच्या दुनियेत एकदा शिरल्यावर बरेच काही सुगंध आणि आठवणी मनात दरवळू लागल्या. अंगणातल्या वेलीवर उमलणारी जुईची नाजूक फुले तोडून गजरे ओवणारी माझीच मी मला आठवली. सोनचाफ्याची फुले दप्तरात ठेवून वह्या पुस्तकांना सुगंधित करणारी आणि मोगऱ्याच्या वासावर अजूनही जीव टाकणारी मी, सुगंधाच्या बद्दल किती किती लिहू?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments