डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

सत्यासत्य ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’. 

आपल्या शिष्याला गीतेतील जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगतानाच्या वेळेचे हे साईबाबांचे उद्गार ! यातून बाबा केवळ भगवद्गीतेतील श्लोकाचेच विवरण करतात असे नाही, तर ते त्याबरोबरच संभाषण शास्त्र आणि कला यांचे मूलतत्व सांगतात. 

संभाषण हे मूलतः आपण व्यक्त होण्याचे, दुसऱ्याशी संपर्क साधण्याचे एक साधन आहे. आपण दुसऱ्यापाशी व्यक्त होतो म्हणजे काय करतो? आपण आपल्या मनातील काहीतरी समोरच्याला सांगतो. कसे? त्या बाबीवरील आपले ज्ञान दुसऱ्याच्या विश्वातील अनुभवांच्या जवळातजवळ जाऊन सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीचे आणि ऐकणाऱ्याचे अनुभव विश्व एकच असते (जे फारच क्वचित घडते) तेव्हा हे अतिशय सुलभ होते. मात्र या दोघांच्या अनुभव विश्वात जितकी तफावत अधिक तितके हे कठीण होत जाते—आपण एका साध्या उदाहरणातून पाहू या—

माझ्या समोर गुळाचा खडा आहे. समोरच्याला हे काय आहे ते माहिती नाही. आता होणारे संभाषण कसे असेल?

‘ हे काय आहे?’

‘ गूळ ’

‘ याचं काय करायचं? ’

‘ हा खायचा.’

‘ कसा लागतो तो?’

‘ गोड ’

‘ गोड म्हणजे? ’ 

‘ तू साखर खाल्ली आहेस ना? साखर गोड असते.’ 

‘ म्हणजे गूळ साखरेसारखा लागतो? ’ 

(पाहिले ना सत्याचे शब्दरूपात कसे असत्य झाले!)

‘ तसे नाही रे. करंजी गोड असते.’

‘ म्हणजे हा करंजीसारखा लागतो?’ (आणखी एक असत्य!)

आता कितीही पदार्थांची नावे सांगितली तरी गुळाची चव त्यांचापेक्षा वेगळीच असणार ना ! मग किती असत्य सांगायचे?

‘आपल्या जिभेवर जे विशिष्ट रससंवेदक असतात ते जेव्हा चेतविले जातात ती चव,’– मी शास्त्राचा आधार घेतला आणि तो माझ्याकडे मोठा आ वासून भूत बघितल्यासारखा पाहू लागला. आता कशी समजावून सांगू मी त्याला गुळाची चव? त्याच्या अनुभवविश्वातून सगळ्या पदार्थांची यादी सांगूनही मला गुळाची चव सांगता येत नव्हती. 

अखेरीस मी त्याला म्हटले, ‘ तू खाऊन बघ ना, म्हणजे तुला समजेल याची चव.’ 

किती सोपा मार्ग ! पण इथे शब्द कुचकामी ठरले, कारण मी त्याला त्याची निश्चित अनुभूती देऊ शकत नव्हतो. म्हणजेच जे अनुभूतीजन्य असते ते सत्य असते आणि त्याला शब्दरूप द्यायचा प्रयत्न केला की ते असत्य होते. अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर हा ‘ संप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ आणि ‘ असंप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ यांच्यातील  फरक आहे. प्रज्ञेच्या आधाराने झालेले ज्ञान हे कधीच निर्भेळ असू शकत नाही – संपूर्ण सत्य असू शकत नाही; ते अनुभूतीजन्यच असले पाहिजे. 

म्हणूनच संभाषणात शाब्दिक संभाषणापेक्षा चेहेऱ्यावरील आणि नजरेतील भाव व देहबोली अधिक परिणामकारक ठरतात. अन्यथा ‘ मला असे म्हणायचे होते की ….’ किंवा ‘ पण मला असं नव्हतं म्हणायचं ….’ असे सांगायची वेळ येते. 

संपूर्ण सत्य हे केवळ अनुभवजन्यच असते. ते शब्दरूप घेऊन आले की भेसळीने त्याचे असत्य होते. 

‘जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’.

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments