? इंद्रधनुष्य ?

☆ हट्ट… अट्टाहास… आणि दुराग्रह… भाग -1… डाॅ. श्रीराम गीत ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

करियर हा शब्द रुळला तेव्हापासून त्याला तीन शब्द चिकटले आहेत. हट्ट, अट्टाहास आणि दुराग्रह!

यात प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असते. मम्मीची भूमिका नवर्‍याच्या कारकिर्दीवर अवलंबून असते. पप्पांची भूमिका ‘ हम करे सो कायदा ‘ अशी असते किंवा ताटाखालचे मांजर कायमच म्यावम्याव करते. मुला-मुलींच्या  भूमिका पक्क्या कधीच असत नाहीत. कधी बाल हट्ट असतो, कधी स्वप्नांचा अट्टाहास असतो, तर ऐकीव गोष्टींचा दुराग्रह करणारे काही निघतातच.

नेहमीच्या उदाहरणातून या गोष्टी मी स्पष्ट करतो. प्रथम या तीन शब्दांचा अर्थ मला अभिप्रेत काय आहे त्याबद्दल. हट्ट प्रत्येकाच्या(अपवाद संतमहंतांचाच)मनात असतो. पण यथावकाश तो पुरा होणे शक्य नाही हे समजून घेणारा त्या हट्टाचा नाद सोडतो. सुंदरच बायको, श्रीमंतच बंगलेवाला नवरा, मुला-मुलींचे पायलट बनण्याचे किंवा सिनेस्टार बनण्याचे स्वप्न ही झाली हट्टाच्या संदर्भातील काही नेहमीची उदाहरणे. नोकरीच्या सुरुवातीला किंवा वयाच्या गद्धेपंचविशीपर्यंत हे हट्ट संपत जातात.

सुंदर बायको किंवा श्रीमंत नवरा मिळेपर्यंत तिशी गाठणे, लग्न न करणे हा झाला अट्टाहास. कर्ज काढून एखादा अभ्यासक्रम पूर्ण करून पायलट किंवा सिनेस्टार बनता येत नाही हेही तिशीत कळते. मग हे सारे पुढची तीस वर्ष मिळेल ते गोड मानून मार्गाला लागतात. आपल्या आसपास  अशी अनेक उदाहरणे सहज ओळखू येतात.

दुराग्रह मात्र वाईटच. स्वतःबरोबर संपूर्ण कुटुंबाची फरपट करण्यामध्ये दुराग्रही मुलगा, मुलगी, आई, वडील खलनायकाची भूमिका बजावत राहतात.दुराग्रहाची विविध रूपे मला दर वर्षी दर महिन्याला सामोरी येत असतात. काहीवेळा दुराग्रह समजावून देणारा भेटला तर फरक पडतो. याउलट काही जणांनी कान व मेंदू बंद केल्यामुळे ऐकायचा संबंधच नसतो. करीयरची निवड करण्याचे निकष, त्यातील  ठोकताळे, हातातील खर्चायची रक्कम, शिकण्यासाठीची वर्षे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकण्यासाठी लागणाऱ्या क्षमता, या साऱ्या ताळेबंदाची नीट माहिती घेतल्यावर काहींचा दुराग्रह दूर होऊ शकतो.

दहावीला जेमतेम 64 टक्के मार्क असलेली मुलगी डॉक्टर व्हायचंय म्हणते, चित्रकलेत अजिबात रस नसलेला मुलगा ॲनिमेशन किंवा गेमिंगमध्येच जायचे सांगतो, बारावीला 57 टक्के व जेईईला 50/300 मार्क पडलेला मुलगा  आयआयटी रिपीट करायला मला कोट्याला वडील पाठवत नाहीत म्हणून अडून बसतो. ही आहेत दुराग्रहाची ठळक उदाहरणे. शिकणे सोपे पण हट्ट, अट्टाहास, दुराग्रह सोडणे कठीणच.

लहानपणी चॉकलेट खावेसे वाटते. पावसात वडापाव आणि कांदाभज्याची आठवण होते. तसे वयाच्या 14 ते 19 दरम्यानचे हट्ट असतात. समोर येईल ते करावेसे वाटते. बरे वाईटाचे भान नसते. सिगरेटचा झुरका, चोरून पाहिलेला सिनेमा, बुडवलेली परीक्षा,अर्थातच कोणाच्यातरी प्रेमात पडणे, यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. ऐकीव करियरचा हट्ट इयत्ता बारावीपर्यंत हळू हळू कमी होतो. नववी दहावी– स्वप्नाळूपणा या दोन वर्षात जातो. संशोधक बनायचं असं म्हणणारा, फिजिक्स किती जड जातं हे कळते अन् हट्ट सोडतो. गणित कठीण जाणारा इंजिनीअरिंगवर  विचार करतो. पंधरा वीस टक्के मार्क अकरावीलाच कमी झाल्यावर मेडिकल मिळणार नाही याचा अंदाज येतो. कविता करणारी, त्यातच रमणारी मुलगी, भाषा शिकताना त्यातील छटा कळल्यावर भानावर येते. लेखक, पत्रकार, सिनेमासाठी लेखन करायचे असे म्हणणारेही थोडे जागे होतात. यांचे हट्ट हळूहळू कमी होतात.

मात्र इयत्ता बारावीनंतर अट्टाहासाची अनेक उदाहरणे दिसतात. रात्र रात्र जागून इंटरनेटवर विविध संस्था, नवीन अभ्यासक्रमांची न ऐकलेली नावे, एखाद्या गडगंज श्रीमंत मित्राने कुठे तरी विकत घेतलेला प्रवेश, यातून मनात असूयेचा प्रवेश होतो. 

— क्रमशः भाग पहिला

लेखक – डॉ. श्रीराम गीत

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments