सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्री. विनायक लक्ष्मण भावे

मराठी लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. विनायक लक्ष्मण भावे यांचा आज स्मृतिदिन.  (६ नोव्हेंबर १८७१; – १२ सप्टेंबर १९२६). 

श्री भावे यांचे बालपण आणि शालेय शिक्षण ठाणे येथे झाले होते. शाळेत असताना जनार्दन बाळाजी मोडक या त्यांच्या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली आणि  त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली. मग याच छंदामुळे प्रेरित होऊन श्री. भावे यांनी १ जून १८९३ रोजी, म्हणजे वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी, ठाणे शहरातल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली. इ.स. १८८७ मध्ये, म्हणजे ते मॅट्रिकच्या वर्गात असतांना त्यांच्या वडिलांनी त्यांना इतिहासाचे पुस्तक विकत आणून दिले नाही, हेही या संग्रहालयाच्या स्थापनेसाठी त्यांना उद्युक्त करणारे एक महत्वाचे कारण ठरले होते.  

सन १८९५ मध्ये भावे मुंबईतून बी.एस्‌.सी. झाले. नंतर त्यांनी अनेक वर्षे मिठागरे चालवण्याचा व्यवसाय केला.

इ.स. १८९८ पासून वि.ल.भावे यांनी खऱ्या अर्थाने सार्वजनिकरित्या लेखनास सुरुवात केली आणि त्यांचा वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधीचा ९८ पानी निबंध, ‘ ग्रंथमाला ’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई – अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्यांनी थोडक्यात सांगितला आहे.

१९०३ साली त्यांनी ‘ महाराष्ट्र कवी ‘ हे मासिक काढले आणि ‘ उत्तम संपादक ‘ अशी नवी ओळख त्यांना मिळाली.  त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. काही कारणाने १९०७ साली हे मासिक बंद पडले. पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची ( म्हणजे सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची ) किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या. 

याच विषयासंदर्भातला  ‘महाराष्ट्र सारस्वत‘ हा त्यांचा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला होता. या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत (इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी वाचकांना  ‘महानुभाव  पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय‘ यांचा सविस्तर परिचय करून दिला. महाराष्ट्र सारस्वत हा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार या उपाधीनेच ओळखले जाऊ लागले. 

ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी  त्यांनी ‘ मराठी दप्तर ’ नावाची स्वतंत्र संशोधन संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. तसेच अज्ञानदास यांच्या अफजलखानाच्या पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून तो प्रकाशित केला. त्यांनी ‘ विद्यमान ’ नावाचे मासिकही काढले होते. 

त्यांनी नेपोलियनचे चरित्र प्रथमच मराठीत आणले ही विशेषत्वाने सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट. 

सारस्वतकार वि.ल. भावे यांचे प्रकाशित साहित्य—-

  • अज्ञानदासाचा अफजलखान वधावरचा पोवाडा (१९२४ मध्ये संपादित)
  • चक्रवर्ती नेपोलियन (चरित्र-१९२१-२२)
  • तुकारामबुवांचा अस्सल गाथा (भाग १ला, १९१९; भाग २रा, १९२०)
  • दासोपंतांचे गीतार्णव (संशोधित आवृत्ती)
  • नागेश कवींचे सीतास्वयंवर (संशोधित आवृत्ती)
  • महानुभावीय महाराष्ट्र ग्रंथावली-कविकाव्यसूची (१९२४)
  • महाराष्ट्र सारस्वत
  • वच्छाहरण (महानुभावीय काव्य, संपादन १९२४)
  • शिशुपालवध(महानुभावीय काव्य, संपादन १९२६)
  • मराठी दफ्तर, रुमाल पहिला, लेखांक १ – श्रीमंत महाराज भोसले यांची बखर (शेवगावकर बखर)
  • मराठी दफ्तर, रुमाल दुसरा , लेखांक १ ते ४
  • श्री शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम (५३ पृष्ठांचा निबंध)
  • सामराजाचेरुक्मिणीस्वयंवर (संशोधित आवृत्ती)

सारस्वतकार श्री. वि. ल. भावे यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Mayuressh Deshpande

वाह, संपदकीय सदरातून खूप छान माहिती आपण विशेषतः आजच्या पिढीपर्यंत आणली आहेत.

त्यासाठी आपले खूप खूप आभार.