सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ काहीतरी ढासळलंय ! –  अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

आईनं विस्तवावर पळी चांगली कडक तापवली, अन बाहेरचं दार अर्धवट उघडत मुसळधार पावसाला चांगला सणसणीत चटका दिला ! ” मेल्या, आता तरी तोंड काळं कर तुझं !” चिडचिड करतच तिनं धाडकन दार लावून घेतलं.

आजचा सलग पाचवा दिवस ! अंगात यावं तसं पिसाळून कोसळतोय हा वरून. खाली ती भुई तरी कुठवर सोसणार? शेवटी तिनं पण हात टेकले. तसा हिरव्याकंच माळाला पायदळी तुडवत पाण्याचे लोटच्या लोट घराभोवतीनं दंगल करू लागले, आणि पावलाइतकं पाणी गुडघाभर कधी झालं कळलंच नाही.

आज तर जणू माजावर आल्यासारखा कोसळतोय पाऊस. दिवसभर बिचारी पन्हाळ उर फाटेस्तोवर पाणी ओकत होती. बाहेर कुत्री आडोशाला पार मुटकुळं करून गप पडून होती. अधूनमधून अंगावरचं पाणी झटकण्यापुरती काय ती अंग हलवायची. पाखरांचे तर हाल बघवत नव्हते. कोवळ्या झाडावरची कोवळी घरटी केव्हाच जमिनीनं झेलली होती. वळचणीला चार दोन साळुंक्या भेदरून बसल्या होत्या. परसात बांधलेल्या आडव्या बांबूवर एकच कावळा जमिनीकडे गोठून गेल्यागत बघत बसला होता. वर पत्र्यावर जणू ताशाची टिप्पर घुमावी तसा थर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज लय धरून सुरूच होता.

दुपार कलंडली तसा पावसानं उजेडाला पार कंबरेत लाथ घालून हाकलूनच दिला. लगोलग माजघरात पहिले शिरला तो अंधार ! आईनं तोवर घाईघाईनं जेवणं, भांडी उरकून घेतलं होतं. आम्हा पोरांना सक्त ताकीद दिली होती की खबरदार खाटेवरून खाली उतराल तर ! तेवढ्यात पोतराजानं आभाळाच्या पाठीवर जणू कडाडकन आसूड ओढला. आई म्हणाली, ” नक्की जवळपास कुठंतरी वीज पडलेली दिसतेय. ह्यांची घरी यायची वेळ होईल आता, तेवढा तरी जरा थांबू दे रे पाऊस !”

घराला अंधारानं अजूनच मिठी मारली. आईनं देवापाशी दिवा लावायला घेतला. फडफडत ज्योत कशीतरी उजेड फेकत राहिली. उग्रट वासाच्या उदबत्तीसमोर देवाला मिटल्या डोळ्यांनी नमस्कार करत आमचं शुभंकरोती सुरू झालं. मला आवडायचं असं बसून सगळं म्हणायला. फक्त ते तेराच्या पुढचे पाढे म्हणजे अंगावर काटा यायचा. बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजातही आईचं लक्ष आमच्याकडे बरोबर होतं.  ‘ तेरी साती किती म्हणालास ?’ मग परत तेरा एके तेरा पासून सुरू ! पाऊस कोसळतच होता. आतापर्यंत घरातले ते चाळीसचे पिवळे बल्ब मरगळलेला प्रकाश घरभर शिंपडायला लागले होते. दाराशी आईने पेला उपडा करून ठेवला. बाहेर गेलेलं माणूस लवकर घरी येतं म्हणे !

पाऊस आता रंगात आला होता. तोच दार वाजलं. ओल्या कंच भिंतीत पाणी पिऊन फुगलेलं लाकडी दार भेसूरपणे किरकिरत उघडलं, दारात नखशिखांत भिजलेले वडील उभे ! हातातल्या छत्रीची पार दैना झालेली दिसत होती. आईने आधी जाऊन टॉवेल आणला नि म्हणाली, “आधी कपडे बदला, डोकं कोरडं करा, मी तोवर चहा ठेवते.” नेमके तेव्हाच लाईट गेले. वडिलांचा दरारा आणि बाहेरचा मिट्ट काळोख, एकदमच घरात शिरले. आईने पुढचं मागचं दार घट्ट लावून घेतलं. दोन्ही दारात एक एक चिमणी पेटवून ठेवली. प्रकाशामुळे ‘जनावर’ घरात शिरत नाही, त्यासाठी हा खटाटोप. वडिलांनी तोवर कपडे बदलून कंदील खाली काढला, अंगठ्याने वरची कडी उचलून अलगद काच बाहेर काढली. कपड्याने सगळी काजळी स्वच्छ पुसली. मग ते गोल बटण फिरवून वात थोडी वर घेतली. पेटवली, आणि परत सावकाश काच लावून कंदील स्वयंपाकघरात आणून ठेवला. हे काम दुसऱ्या कोणी केलेलं त्यांना मुळीच खपायचं नाही. काचेवर इतकी सुद्धा काजळी त्यांना चालत नसे. भोवतीभोवतीनं फिरणारे आम्ही मग कंदीलाभोवती जेवायला बसलो. जेवताना वाटेत कसं सगळीकडे पाणी भरलंय ते वडिलांनी अगदी रंगवून सांगितलं. आईचा चेहेरा अजूनच काळवंडला काळजीनं ! जेवता जेवता ती मधूनच ओल धरलेल्या भिंतीकडे आणि तग धरलेल्या कौलांकडे पहात होती.

पाऊस अजून तस्साच आदळतोय. कंदिलाच्या उजेडातच वडिलांनी अंथरुण घातलं. आईनं देवापुढचा दिवा शांत केला, देवाला नमस्कार केला अन येऊन आडवी झाली. तशी आम्ही पोरं तिच्या उजव्या डाव्या कुशीत जाऊन झोपलो. वडील उजवा हात डोक्याखाली घेऊन कुशीवर वळून झोपायचा प्रयत्न करत होते. पण पावसाचा कर्कश्श आवाज कोणालाच झोपू देत नव्हता.

साधारणतः तासभर असाच गेला असेल, तोच “धप्प” आवाज झाला. वडील लगेच उठले, कंदील मोठा केला आणि आवाजाच्या दिशेने स्वयंपाकघराकडे गेले आणि तसेच घाईघाई परत आले. आईला उठवलं, तिलाही दाखवलं, …स्वयंपाकघराच्या भिंतीची एक वीट खाली पडली होती. दोघांच्याही अंगाचा थरकाप उडाला. सत्तर वर्षाच्या जुन्या भिंतींनी गेले पाच दिवस पावसाशी घेतलेली झुंज आज कुठेतरी डळमळली. भिंतीची एक वीट कोसळली. दोघांनीही आम्हाला मुलांना उठवलं. आणि मधल्या खोलीत घेऊन गेले. तिथे आम्हाला झोपवून दोघेही तसेच काळजीनं बसून राहिले. पाऊस काही ऐकायला तयार नव्हता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा काळोख घराभोवती घिरट्या घालत होता. आणि पुन्हा एकदा आवाज आला, “धप्प, धुडुं !” वडील उठले तसं आई काळजीनं म्हणाली, 

“काही कुठं जाऊ नका बघायला, काय व्हायचं ते होऊ दे पण तुम्ही तिकडे जाऊ नका हो !” पण वडिलांना कुठला धीर निघतोय. ते हळूहळू जवळ जाऊन बघून आलेच. खोल आवाजात त्यांनी सांगितलं, “अजून चार विटा पडल्यात ! दाराची वरची बाजू मोकळी झाली गं !” बहुदा दोघांनीही डोळ्याच्या कडा पुसल्या असाव्यात. पण काळोखात सगळं लपवलं गेलं. मग त्यानंतर पाच दहा मिनिटांच्या अंतराने आवाज येतच राहिले, एक एक वीट पडतच राहिली. आम्ही जीव मुठीत घेऊन एकमेकांच्या आधारानं तसेच बसून होतो.

हळूहळू रात्र पुढे सरकत होती. पावसाचा जोर थोडा ओसरला होता. पूर्वेला झुंजूमंजू व्हायला लागलं होतं. अंधार थोडा विस्कटायला लागला होता. रात्र तर सरली म्हणून आई वडील सुस्कारा सोडतायत तोवर एकच मोठ्ठा आवाज झाला आणि छपरासकट सगळं स्वयंपाकघर जमीनदोस्त झालं. एवढ्यावरच पावसाचं समाधान झालं नाही म्हणून आतापर्यंत शाबूत असलेला व्हरांडाही एकाएकी ढासळला. सुदैवाने आम्ही बसलो होतो ती मधली खोली तेवढी अजून तग धरून होती. पण केव्हा काय होईल सांगता येत नव्हतं.

एकदाचं फटफटलं ! बाहेर माणसांची जरा चाहूल जाणवायला लागली. पाऊस सुद्धा ओसरला. तसे भीत भीत आम्ही सगळे तो पडक्या भिंतींचा ढिगारा ओलांडून बाहेर मोकळ्या अंगणात आलो. एव्हाना आमचं घर पडल्याची बातमी आजूबाजूला पसरली. कोणीतरी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेलं. दिवस जरा वर आल्यावर आई वडील परत घराकडे गेले. घराच्या चारही बाजूच्या भिंती ढासळल्या होत्या. पण देवळीतला गणपती मात्र तसाच होता, सुरक्षित ! आईला त्याचंच खूप समाधान वाटलं.

त्यानंतर काही दिवस काकांच्या घरी राहिलो आम्ही. तोवर जुनं झालेलं हे पडकं घर पूर्णच पाडून सगळं पुन्हा नव्याने बांधायला घेतलं. ह्या सगळ्यात झालेलं कर्ज पुढचे अनेक पावसाळे पुरलं !

 पण आज एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की त्या रात्री जर आम्ही आसरा घेतलेली खोली सुद्धा पडली असती तर ? पण देवळीतला बाप्पा रात्रभर ती भिंत जणू धरून बसला होता आमच्यासाठी. रोज त्याच्यासमोर शुभंकरोती म्हणायचो न आम्ही, मग आमच्यासाठी तो एवढं तर नक्कीच करणार न !

आज इतक्या वर्षांनंतर बाहेर तस्साच पाऊस कोसळतोय ! लाईटही गेलेत. पण आता घरात इन्व्हर्टर आहे. काळोखाला इथे प्रवेशच नाही. भिंती मजबूत आहेत, ओल येतच नाही. फक्त शुभंकरोती तेवढी ऐकायला येत नाहीये. देवघरात इलेक्ट्रिकची समई चोवीस तास मिणमिणतेय, पण उदबत्ती मात्र लागतच नाही. धुराची एलर्जी आहे ! पूर्वीपेक्षा घर खूप भक्कम आहे आता,…….

 तरीसुद्धा काहीतरी ढाsसळssलंs sय ! 

काहीतरी     ढाss s स  ळ s s तं ss य !

— लेखक: अज्ञात..

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments