सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर  सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस !

 तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील  हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर   सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले!सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर  असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी  पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे  द्रौपदीला दाखवून  दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच  देवरूप  आणि  मानव  रूप यांच्या सीमेवर होतं!  जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून  द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून

तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना

एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं !कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो .सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या

स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो ,तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो .आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात !पावसाच्या सरी बरोबरच  पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी  एक हातचा तुझ्याकडे , परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments