श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘ हरवू पहाणारा थारा!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘वळचण’ म्हणजे एक आडोशाची जागा. अंधारी.., सहज नजरेस न पडणारी.. आणि म्हणूनच सुरक्षित! जुन्या काळातल्या कौलारु घरांच्या उतरत्या छपराचा पुढे आलेला भाग आणि वासा यामुळे निर्माण झालेला हा आडोसा म्हणजेच  ‘वळचण’ ! ही वळचण प्रत्येक घराचाच एक अविभाज्य भाग असायची. उन्हाची काहिली सहन न होऊन पसाभर सावलीच्या असोशीने किंवा अचानक एखादी पावसाची जोरदार सर येताच घरट्याकडे झेप घेण्याइतकी उसंत मिळाली नाही म्हणून पक्षी अतिशय विश्वासाने धाव घ्यायचे ते हाकेच्या अंतरावरच्या अशा कौलारू घरांच्या वळचणींकडेच!

अतिशय शांत जलाशयावर अचानक एखादा खडा पडताच असंख्य तरंग उमटत रहातात. ‘वळचण’ या शब्दाचा मनाला स्पर्श होताच असंच होतं. कधीही सहजासहजी डोकं वर न काढता मनाच्या वळचणीला अंग चोरून पडून राहिलेल्या जुन्या काळातल्या कितीतरी आठवणी त्या स्पर्शाने जाग्या होत मनात त्या जलाशयावर उमटणाऱ्या तरंगांसारख्याच झुलत रहातात.. !

वळचणीला कांही काळापुरतं आश्रयाला येणाऱ्या पक्षांसाठी त्या कौलारु घरांबाहेरची वळचण हा हक्काचा निवारा असायचा कारण त्यांना तिथे घरातली माणसं हुसकून न लावता आवर्जून थारा द्यायची. हा थारा आश्रयाला आलेल्या पक्षाला निश्चिंतता देणारा म्हणूनच सुरक्षित वाटायचा. वळचणीला आलेल्या पक्ष्यांच्या मनात संकोच्यापोटी आलेलं दबलेपण नसायचं आणि घरातल्या माणसांच्या मनातही उपकार करीत असल्याची भावना नसायची. ते नैसर्गिकपणेच आकाराला येत रुढ होत गेलेलं माणूस आणि निसर्ग यांचं आनंदी सहजीवनच होतं. आज मनाच्या वळचणीला विसावलेल्या त्या  काळातल्या असंख्य आठवणी मन:पटलावर जेव्हा तरंगतात तेव्हा त्या सहजीवनातील निखळ आनंदच आज कुठेतरी हरवून गेल्याच्या दुखऱ्या जाणिवेने निर्माण केलेली अस्वस्थता त्या आठवणींमधे अधिकच झिरपत जाते.

त्या आठवणी आहेत वळचणींच्याच पण त्या वळचणी कौलारु घरांच्या उतरत्या छपरांआडच्या वळचणी नाहीयत तर त्या अशा असंख्य कौलारु घरांमधल्या सर्वसामान्य आर्थिक स्तरावरच्या ओढग्रस्त जीवनशैलीतही त्या घरांच्या घरपणाने आवर्जून जपलेल्या  वळचणींच्या आठवणी आहेत!

घराच्या आडोशाच्या वळचणीने पक्ष्याला दिलेला थारा त्या पक्षासाठी चटके देणाऱ्या उन्हात अचानक आकाशात डोकावणारा एखादा ओलसर काळा ढगच असायचा.. किंवा.. अनपेक्षित आलेली एखादी गार वाऱ्याची झुळूकही ! तोच दिलासा त्या कौलारु घरातल्या घरपणांनी जपलेल्या वळचणी घरी आश्रयाला आलेल्या आश्रितांना अगदी सहजपणे देत असायच्या !

अशा घरांमधे उतू जाणारी श्रीमंती कधीच नसायची. घरात खाणारी पाचसहा तोंडं आणि मिळवणारा एकटा. प्रत्येक घराचं चित्र हे एखाददुसरा अपवाद वगळता असं एकरंगीच. अगदी पै पैचा खर्चही विचारपूर्वक, अत्यावश्यक असेल तरच करायचा हे ठामपणे ठरवून देणारं काटेकोर आर्थिक नियोजन आणि तरीही आपल्या चाहूलीने अस्वस्थता वाढवणारी महिनाअखेर या अशा घरांसाठी नेमेची येणाऱ्या पावसाळ्यासारखी सवयीचीच होऊन गेलेली. अशा घरातल्या बेतासबात शिक्षण झालेल्या गृहिणीही हे दरमहाचं तूटीचं अंदाजपत्रक कौशल्याने सांभाळून त्यातूनही स्वतःच्या होसामौजांना मुरड घालून वाचवलेला एखाददुसरा आणा अचानक येऊ शकणाऱ्या अडीअडचणीसाठीची बेगमी म्हणून धान्याच्या डब्यांच्या वळचणीला सुरक्षित ठेवीत असायच्या.

विशेष म्हणजे अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही या घरांनी स्वतःच्या मनातल्या वळचणींच्या खास जागा गरजूंसाठी आवर्जून निर्माण करुन सातत्याने जपलेल्या असायच्या. शिक्षणाच्या ओढीने घराबाहेर पडलेल्या एखाद्या गरीबाच्या मुलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत दूर करायला अशी घरेच त्या मुलाचे आठवड्यातल्या जेवणाचे एकेक दिवस वाटून घेत त्याला वार ठरवून देत. ते शक्य नसेल ती घरे स्वतःच्या घरी त्याची पथारी पसरायला लागणारी वीतभर जागा देत. ठरावीक दिवशी माधुकरी मागायला येणाऱ्या सेवेकऱ्यासाठी घासातला घास काढून अशा घरांमधे एखादा चतकोर माधुकरी घालण्यासाठी आठवणीने बाजूला  काढून ठेवला जात असे.

प्रतिकूल परिस्थितीतही गरजूना आश्रय देणाऱ्या, त्याला आधार वाटावा असा मदतीचा हात देऊ पहाणाऱ्या या घरांच्या घरपणाने आवर्जून जपलेल्या या जणू कांही वळचणीच्या जागाच तर होत्या !

आज काळ बदलला. घरं बदलली. माणसंही. हळूहळूच पण सगळंच बदलत गेलं. त्याचबरोबर पूर्वीचं जीवनशैलीतच दीर्घकाळ मुरलेलं समाजाप्रती असणाऱ्या गृहित कर्तव्याचं भानही. आज ते नाहीय असं नाही. पण पूर्वी प्रतिकूल परिस्थितीतही घरोघरी आवर्जून जपलेल्या वळचणींसारखं मात्र निश्चितच नाहीय. पूर्वी ते सर्रास असायचं आणि आज ते अपवादात्मकच दिसतं हे नाकारता येणार नाही.

हरवू पहाणाऱ्या हा वळचणींचा थारा नव्या काळानुसार नव्या रुपात  प्रत्येकाने निर्माण करणं न् तो जपणं हे आवश्यक आहे आणि अशक्यप्रायही नाही हे जाणवायला मात्र हवं!

समाजाकडून वर्षानुवर्षे कांही ना कांही रुपात सतत कांहीतरी घेतच आपण मोठे होत असतो. समाजाचे ते ऋण परतफेड करता येणारं नसतंच. तरीही अशा स्वनिर्मित वळचणींच्या रुपाने देणाऱ्याने स्वतःच्या मनात उपकार करीत असल्याची भावना न ठेवता घेणाऱ्यालाही संकोच वाटू नये अशा पध्दतीने हरवू पहाणारा वळचणीच्या आडोशाचा थारा जपणे समाजाप्रती असणारा कृतज्ञभाव व्यक्त करायला पूरकच ठरेल हे लक्षात घ्यायला हवं.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments