डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंदाचे भागीदार ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ज्यांना वयोमानामुळे किंवा इतर कोणत्या परिस्थितीमुळे अजिबात ऐकू येत नाही, अशा लोकांचं रस्त्यावर जगणं मुश्कील झालंय….

ऐकू न आल्यामुळे, कोणतंही काम करण्यास त्यांना अडथळा येतोच…. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, रस्ता ओलांडताना किंवा चालताना गाडीचे आवाज न ऐकू आल्यामुळे एक्सीडेंट होऊन मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे प्रमाण वाढत आहे…

आणि याचमुळे मागील तीन महिन्यांपासून माझ्या भीक मागणाऱ्या वृद्ध माता पित्यांच्या कानाची तपासणी सुरू करून, त्यांना श्रवण यंत्रे देण्यास सुरुवात केली आहे.  

मशीन मिळाल्यानंतर, कानात मशीन घालून ही मंडळी कानावर आडोशासारखा हात धरून…. अगदी मन लावून…. नजर एका जागी स्थिर करून…..रस्त्यावरील गाड्यांचा आवाज ऐकतात….हॉर्न ऐकतात… रस्त्यावर चाललेला गोंगाट ऐकतात….! 

एरव्ही खरंतर अशा गोष्टी आपण ऐकायचं टाळतो….. पण “ते” मात्र जीव लावून या गोष्टी ऐकत असतात…. ! 

मी गंमतीने त्यांना या बद्दल विचारतो, तेव्हा ते म्हणतात,  “ काय करणार डॉक्टर?  पूर्वी  जेव्हा ऐकायला येत होतं तेव्हा जवळची माणसं सोबत असून सुद्धा बोलत नव्हती…. आज पुन्हा ऐकायला यायला लागलंय…. पण आज ती जवळची माणसं सुद्धा नाहीत आणि त्यांचा आवाज सुद्धा ….. मग काय करणार ? आम्ही बसतो गाड्यांचे आवाज ऐकत, आपल्याला ऐकू येतं याचा आनंद घेत….! “ 

हे ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचं कारुण्य रेखाटायला माझ्याकडे शब्द नाहीत…..! 

आपल्या माणसांचा आवाज शोधणारी…. निर्जीव गाड्यांच्या हॉर्नशी संवाद साधू पाहणारी…. ही पिढी हळूहळू डोळ्यादेखत नष्ट होईल…. ! 

आपल्या वृद्ध आई-वडील, आजी आजोबा यांना न सांभाळणारी ही मंडळी आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत माहित नाही…! 

मी लहानपणी पुस्तकात वाचलं होतं– “आपण आज जी माणसं पाहतो, ती फार फार पूर्वी माकडं होती…” 

मला भीती वाटते …. इथून पुढच्या काही वर्षानंतर लहान मुलांच्या पुस्तकात धडा असेल— “आपण आज जी “माकडं” पाहतो आहोत… ती फार फार पूर्वी “माणसं” होती ! “

अशी वेळ येण्याअगोदर आपल्या जुन्या खोडांना आपणच जपलं पाहिजे…. ! 

कानाची मशीन ही एक अत्यंत “महाग” गोष्ट आहे… 

परंतु ऐकू यायला लागल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान हे त्याहीपेक्षा जास्त “मौल्यवान” वाटतं मला ….!

“महाग” आणि “मौल्यवान” यातला फरक एकदा समजला की खर्च झाल्याचं दुःख होत नाही…. !!!

कळत-नकळतपणे आपणही सर्व जण त्यांच्या या चेहऱ्यावरील ” आनंदाचे भागीदार ” आहात, म्हणून आपणास कळविण्याचा हा खटाटोप !!!

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments