? विविधा ?

☆ तारा…भाग -3 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

तारा आपला पती वालीच्या पराक्रमावर लुब्ध होती. त्याच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान होता तिला. परंतू त्याच्या  अत्याचारी, आततायी, अत्यंत क्रोधीत असलेल्या स्वभावाबद्दल ती सदैव कुंठीत असायची. त्याच्या अशा स्वभावाला आवर घालण्याचा सतत प्रयत्न करीत असे. परोपरीने, अनेक प्रकारे त्याला समजावीत असे. परंतू तो अहंकार, गर्वाने चूर असल्यामूळे तिचे तळमळीचे सांगणे धुडकावून लावत असे. त्यामुळे ती सतत मनोमन दुःखी राहत असे.

वास्तविक सुषेन राजाची कन्या तारा अत्यंत बुध्दीमान असून तिला अनेक विषयांचे सूक्ष्म ज्ञान होते. निसर्ग व मानवी जीवनांत भविष्यात होणारे अनेक उत्पात, येणारी संकटे याची पूर्व चाहुल तिला नेहमीच लागत असे. तिच्यातील आंतरीक शक्तीच्या या चिन्हांची ओळख ठेवण्यात ती अतिशय निपुण होती. परंतू तिच्यातील या अलौकीक गुणांची वालीने कधीच कदर ठेवली नाही. तो स्वतःच्याच मस्तीत जगत होता. दुसर्‍यांना तुच्छ लेखण्यातच धन्यता मानत होता.

मतंगत्रृषींची शापवाणी ऐकून वालीचे सर्व मित्र त्या आश्रमांतुन भिऊन काष्किंधनगरीत पळून आले. वाली व ताराने भिऊन पळून येण्याचे कारण  विचारल्यावर त्यांनी तिथे घडलेली सर्व सविस्तर हकीकत सांगितली.

वाली चिंतामग्न झाला. तारा तर फारच दुःखी व चिंतामग्न झाली. ती वालीला म्हणाली, “स्वामी! आपण फार मोठा पराक्रम केला खरा! पण अविचाराने ही जी घटना घडली ती अशुभसूचक वाटत आहे. मतंग त्रृषीसारख्या श्रेष्ठ व महान तपस्याकडून हा शाप मिळणे म्हणजे आपल्यावर आलेली फार मोठी इष्टापत्ती आहे.” ताराला दुःख अनिवार होऊन अगदी ओक्साबोक्सी रडू लागली.

ताराच्या सांगण्याचा परिणाम की, भविष्यात घडणार्‍या भिषण घटनेच्या नांदीची कल्पना आली असेल म्हणून असेल, वाली स्वतः मतंगत्रृषीकडे क्षमा मागण्यासाठी गेला.पण त्याचे दैवच फिरले असल्याने की काय, मतंगत्रृषींनी त्याच्याकडे ढुंकुनही न पाहतांच पाठ फिरवून आश्रमाकडे निघून गेले.

वाली हताश होऊन निराश मनाने परतला. तारा मात्र भविष्यात येणार्‍या भीषण, अनिष्ट संकटाच्या भितीने फार उदास झाली.

दुदुंभीचा मुलगा मायावी राक्षस वडीलांच्या वधामुळे सूडाने पेटून उठला. वडीलांचा सूड घेण्यासाठी मायावी एका मध्यरात्री किष्किंधा नगरीच्या दाराशी येऊन मोठमोठ्याने ओरडत वालीला युध्दासाठी आव्हान करु लागला. साहसी व पराक्रमी वालीने मायावीचे आव्हान स्विकारले.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments