सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक, समीक्षक, आणि पत्रकार श्री. प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचा आज स्मृतिदिन. 

(९/१/१९१८ – १०/७/१९८९)

मार्क्सवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. ऊर्ध्वरेषे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सुरुवातीपासूनची जडणघडण आणि स्थित्यंतरे जवळून अनुभवलेली होती. त्याच अनुषंगाने “ नवे जग “ या साम्यवादाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या, तसेच “ युगवाणी “ या त्रैमासिकाच्या संपादकपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. 

नोकरीच्या शोधात ते ब्रह्मदेशला गेलेले असतांना, म्हणजे १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले. आणि चारशे मैलांचा पायी प्रवास करत त्यांना भारतात परत यावे लागले. त्यानंतर नागपूर विद्यापीठात इंग्रजीचे रीडर म्हणून त्यांनी काम सुरु केले. 

पण मराठीवरही त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. त्यांनी धर्म आणि राजकारण या विषयांचाही सखोल अभ्यास केला होता. “ प्रतिभा “ आणि “ किर्लोस्कर “ या मासिकांमध्ये लिहिलेल्या लेखांपासून “ लेखक “ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. “ आम्ही हिंदू आहोत का ?” हा १९४२ साली किर्लोस्कर मासिकात प्रकाशित झालेला त्यांचा पहिला लेख.

“ प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा “ हाही त्यांचा त्याकाळी गाजलेला एक लेख. 

त्यांचे प्रकाशित साहित्य असे आहे —-

१. “ आई “ — मॅक्झिम गॉर्की यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद . 

२. “ बियॉन्ड दि लास्ट ब्लू माऊंटन “ — रुसी लाला यांच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. 

३. “ शृंखलाबद्ध प्रॉमिथ्युस “ – ग्रीक नाट्यकृतीचे भाषांतर . 

४. “ सफलतेमधील आनंद “ — जे.आर.डी. टाटा यांच्यावर रुसी लाला यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. 

५. “ हरवलेले दिवस “ – हे अगदी वाचनीय असे आत्मचरित्र. यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून  अनुभवलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे सविस्तर चित्रण श्री. ऊर्ध्वरेषे यांनी केलेले आहे.  या पुस्तकाला १९८९ सालचा “ साहित्य अकादमी पुरस्कार “ दिला गेला होता. 

६. याव्यतिरिक्त त्यांनी चिनी आणि रशियन भाषेतील अनेक पुस्तकांचे , तसेच माओ , स्टॅलिन , पुश्किन यांच्या ग्रंथांचे अनुवाद केलेले आहेत. 

एक सुस्वभावी , उत्साही , आणि इंग्रजीचे विद्यार्थीप्रिय निष्णात प्राध्यापक अशी ज्यांची ओळख सांगितली जात असे , त्या श्री. प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम.🙏

☆☆☆☆☆

इतिहास-संशोधक आणि मराठी – कोंकणी लेखक म्हणून सुपरिचित असणारे श्री. पांडुरंग सखाराम शेणवी-पिसुर्लेकर यांचाही आज स्मृतिदिन. (३०/५/१८९४ – १०/७/१९६९ )

श्री. पिसुर्लेकर हे सुरुवातीला एका पोर्तुगीज शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असत. पुढे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी इतिहास-संशोधन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तेव्हाच्या पोर्तुगीज सरकारच्या दफ्तर-खात्यात ते विनावेतन काम करू लागले. तिथे पोर्तुगीज, डच, फारसी, कन्नड, तमीळ, बंगाली, मराठी, अशा अनेक भाषांमधल्या विस्कळीत पडलेल्या अनेक कागदपत्रांची योग्य मांडणी करता यावी यासाठी , कोंकणी, मराठी बरोबरच पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश, संस्कृत, अशा अनेक भाषा त्यांनी आवर्जून शिकून घेतल्या ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घ्यावी अशीच. त्यांच्या नियोजनबद्ध कामाची दखल घेत १९३० साली त्यांची त्याच खात्याचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली, आणि तेव्हा कुठे त्यांना वेतन द्यायला सुरुवात झाली. आणखी संशोधनासाठी पोर्तुगीज सरकारने त्यांना लिस्बन आणि पॅरिस इथे पाठवले. 

त्यांचे सर्व संशोधन त्यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध आणि पुस्तके याद्वारे प्रकाशित झाले होते , आणि यामध्ये इतर भाषांमधीलही अनेक पुस्तकांचा समावेश होता. 

यापैकी, मराठा साम्राज्य व भारतातील पोर्तुगीज वसाहतींच्या परस्पर संबंधांवर लिहिलेला “ पोर्तुगीज – मराठे संबंध – अर्थात पोर्तुगीजांच्या दफ्तरातील मराठ्यांचा इतिहास“ हा अतिशय महत्वाचा ऐतिहासिक ग्रंथ मानला जातो. त्यांच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या इतर भाषांमधील अनेक ग्रंथांपैकी, “अ आंतिगिदादि दु कृष्णाइज्मु “ या ग्रंथाद्वारे ‘कृष्ण संप्रदाय इसवीसनापूर्वीपासून अस्तित्वात होता ‘ हे सिद्ध करण्याचा श्री. पिसुर्लेकर यांनी प्रयत्न केला होता. 

त्यांचे हे इतके सगळे काम त्यावेळी खूपच दखलपात्र ठरले होते. आणि त्यामुळेच त्यांना पुढीलप्रमाणे गौरविण्यात आले होते —

१. इतिहास संशोधनाबद्दल लिस्बन विद्यापीठातर्फे ‘ डी. लिट. ‘ पदवी देऊन गौरव. 

२. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीकडून ‘ जदुनाथ सरकार ‘ सुवर्णपदक . 

३. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीतर्फे ‘ कॅम्बल मेमोरियल ‘ सुवर्णपदक .   

४. पोर्तुगीज सरकारने दिलेले उच्च किताब —– ‘ नाईट ऑफ दि मिलिटरी , ऑर्डर ऑफ सॅंटियागो ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्टस् ‘ , ‘ शेव्हेलियर ‘. 

५. पॅरिसच्या पौरस्त्य सोसायटीचे माननीय सदस्यत्व – सन १९२३.  

६. सन १९२६ मध्ये पणजीच्या ‘ इन्स्टिट्यूट वास्को दि गामा ‘ या सरकारी संस्थेचे सभासदत्व . 

अशा कितीतरी महत्वाच्या मानसन्मानांना पात्र ठरलेले अतिशय मोलाचे आणि तितकेच कष्टप्रद काम सातत्याने ज्यांनी केले, आणि पुढच्या पिढीसमोर एक वेगळाच आदर्श ठेवला, त्या आदरणीय श्री. पांडुरंग पिसुर्लेकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी मनःपूर्वक आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments