सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ तक्रारी थांबव कर्णा! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कर्ण कृष्णाला विचारतो – “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईन . कारण मी क्षत्रिय नव्हतो!

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.—-तर मग मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?”

कृष्णाने उत्तर दिले:

“कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथ, घोडे, धनुष्यबाण, यांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली.  आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

सांदिपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.—–मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल… फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा…

प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत. 

आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही. 

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते…

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,

कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, 

कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही—

त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगीदेखील तुम्ही चांगलाच विचार करा, भगवंताचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद…!

—— पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते…

जय श्रीकृष्ण   

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments