सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!! ) –इथून पुढे —–

*हा काळ होता अंदाजे इसवीसन १३३० चा ..!! एका पायाने लंगडा तैमुर, दिल्ली उध्वस्त करून पुढे सरकत होता ..!!

पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले .. लुटालूट करायला तो ज्या, ज्या गावात जाई, ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे .. सर्व धनधान्य बाड-बिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत ..!!* 

लुटायचे, मारायचे, बाटवायचे .. पण कुणाला ..??

गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात .. ह्या गोष्टींमुळे, तैमुरच्या सैन्याची उपासमार होऊ लागली .. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई .. त्यावेळी गनिमी कावा करून, अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात ..!! दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात ..!! रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले ..!! ह्या गनिमी हल्ल्यांनी तैमुर हैराण झाला .. सैन्य देखील उपाशी राहू लागले तशी सगळ्यांची चिडचिड ही वाढू लागली ..!!

रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले. रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना त्या काळजी घेत असत, की तैमुरच्या सैन्याला झोप मिळणार नाही ..!! हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो, ब्राम्हणी, रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती..!!

एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे .. तंबूला आगी लावणे, आगींमुळे हत्ती पिसाळणे, सततचे जागरण यामुळे, तैमुरचे सव्वा लाख सैन्य, अक्षरश: जेरीस आणले गेले ..!!

बरेच सैनिक तडफडून मरण पावले .. मेरठवर हल्ला केल्याचा तैमुरला आता पस्तावा होऊ लागला .. नेमक्या ह्याचवेळी, लपून बसलेले जोगराजसिंगचे सैनिक, अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले ..!! 

त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या .. त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे ..!!

तीच कहाणी स्त्री सेनेची होती ..!! रामप्यारीने दिवसा व रात्री लढण्यासाठी, आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडांवर बसून, तैमुरच्या सैन्यावर शर-वर्षाव करे, तर दुसरी तुकडी तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत ..!!

*पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया, लढाईच्या ऐन धुमाळीत, तैमुरच्या दिशेने निघाला ..!! तैमुरच्या  अंगरक्षकाना उडवून, बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारीने पाहिले मात्र, ती आपल्या तुकडीसहित, त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली, आणि सपासप सैनिक कापत, रामप्यारी बाईची स्त्री सेना, तैमुरच्या जवळ पोचली..!!

चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून, तैमुरचे सैनिक पुरते गोंधळले .. हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका, खिजराखानने ओळखला .. त्याने तैमुरचा घोडा खेचून, सटकण्याचा प्रयत्न केला .. त्यात तो काहीसा यशस्वीही होत होता तोच, २२,००० सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन, ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले .. घमासान लढाई पेटली .. तैमुर चक्क पळून जात होता .. रामप्यारीने त्याला पाहिले व पळणाऱ्या तैमूरचा  पाठलाग चालू केला ..!!

रामप्यारी घोड्यावर आणि तैमुर देखील घोड्यावर ..!! तैमुरने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणा-या तैमुरच्या काखेच्या उघड्या भागावर, रामप्यारीने दौड घेतानाच, बाण चालवले. रामप्यारीने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली .. पण विष लावलेले बाण शरीरांत शिरल्याने तैमुर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला ..!!

खिजराखानला मागे येताना बघून रामप्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली ..!!

ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून, तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून, समरकंदला पळून 

गेला ..!! गळा, छाती तसेच बगलेतील जखमांमुळे, तैमुर लवकरच मेला ..!!

अशा ह्या ‘पळपुट्याचे’ तिकडे शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे उभे आहेत ..!!

आणि इथे त्याचे नांव, आपल्या मुलाला दिले जात आहे ..!!

*देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी, एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले ..!!

पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर मात्र लक्षांत ठेवला ..!!

तैमुरसारख्या नराधमाला समोर गाठून, त्याला विदीर्ण करणाऱ्या रामप्यारीबाई चौहानला देखील भारतीय लोक पार विसरून गेले .. कारण हा खरा इतिहास आम्हाला कधीच शिकवलाच गेला नाही ..!!*

तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!

रामप्यारीला मानाचा मुजरा ..!!

—समाप्त— 

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments