श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गोपीनाथ गणेश तळवलकर:

ख्यातनाम बालसाहित्यिक गोपीनाथ  तळवलकर यांनी बाल साहित्याबरोबरच प्रौढ साक्षरांसाठीही लेखन केले आहे. कणिका, खंडखाव्य, बालकविता, कादंबरी, आत्मचरित्र असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.काही वेळेला ते ‘गोपीनाथ’ या टोपण नावानेही लेखन करत असत.

आकाशवाणी पुणे केंद्रावर असताना ते बालविभाग प्रमुख होते. तेव्हा त्यांनी बाल श्रोत्यांसाठी ‘बालोद्यान’  हा  कार्यक्रम सुरू केला होता. तो अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्यातील नाना हे प्रमुख पात्र ते स्वतः सादर करत असत.

1906 साली आपटे यांनी सुरू केलेल्या ‘आनंद’ या मासिकाचे ते 35 वर्षे संपादक होते.

त्यांची काही पुस्तके याप्रमाणे:

आकाशमंदिर, छायाप्रकाश नंदिता, अनुराग, आनंदभुवन, अशियाचे धर्मदीप, दुर्वांकुर, मराठी शब्द रत्नाकर, वसंतसेवा, शांतिनिकेतन, लिंबोणीच्या झाडाखाली (बालसाहित्य), ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व (रसग्रहणात्मक पुस्तक), सहस्त्रधारा(आत्मचरित्र).इ.

गोपीनाथ उर्फ नाना यांचे वयाच्या 73व्या वर्षी 2000 साली निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना नम्र अभिवादन ! 🙏

☆☆☆☆☆

डाॅ.सखाराम गंगाधर मालशे

संपादक, समीक्षक व संशोधनपर लेखन करणारे डाॅ.स.गं.मालशे यांनी,फादर स्टिफन्स यांच्या ‘ख्रिस्तपुराण’ वर विद्यावाचस्पति(डाॅक्टरेट) प्राप्त केली होती. ते काही काळ एस्.एन्.डी.टी. महाविद्यालय व कीर्ती महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख होते. महाराष्ट्र साहित्य परिषदचे मुखपत्र साहित्य पत्रिका चे संपादकही होते. तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व मुंबई साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते.साहित्यातील संशोधनपर लेखनामुळे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते.

सुरुवातीला त्यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा व हसा आणि लठ्ठ व्हा या दोन पुस्तकांचे संपादन केले. लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सहकार्याने समग्र महात्मा फुले साहित्य संपादित केले. नीरक्षीर हा नाट्यविषयक लेखसंग्रह मार्गदर्शक ठरला आहे.

केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित,सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता, लोकहितवादीकृत जातीभेद, स्त्री पुरुष तुलना या संहितात्मक पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या. धनंजय कीर यांच्या सहकार्याने म.फुले कृत शेतक-यांचा आसूड, म. फुले समग्र वाड्मय  व अत्रे यांच्या झेंडूची फुले यांचे पुनःप्रकाशन  केले.ऑस्टीन वाॅरेन आणि रेने वेलेक यांच्या ‘थिअरी ऑफ लिटरेचर’ या ग्रंथाचे ‘साहित्य सिद्धांत’ या नावाने रूपांतरही  केले.

त्यांचे अन्य साहित्य:

ललित- आगळावेगळा,आवडनिवड,

बालसाहित्य- चतुराईच्या गोष्टी,जादुचे स्वप्न,विलक्षण तंटे

व्यक्तिचित्रे – ऋणानुबंधाच्या गाठी

कादंबरी – लाडवा

चरित्र – सयाजीराव गायकवाड

नाटक – सुख पाहता

भाषाशास्त्र – भाषा विज्ञान परिचय,भाषाविज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक.

डाॅ.मालशे यांचा आज स्मृतीदिन आहे.(1992).त्यांच्या चतुरस्त्र लेखणीला सलाम ! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, बहुविध.काॅम.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments