सौ राधिका भांडारकर

??

? झपूर्झा ? सौ राधिका भांडारकर ☆

शब्द गोठले. शब्दच तुटले. शब्दातीत आहे सारे. शब्दाविना, शब्दां पलीकडले..

अथांग समुद्राच्या शांत किनाऱ्यावर मुलायम वाळूत, एका झपुर्झा अवस्थेतच मी बसले होते. आणि पलीकडे क्षितिजावर, मावळतीला सूर्याची घागर हळूहळू कुठेतरी अज्ञातात बुडत होती.  अथांग आभाळात संध्या रंग उजळले होते. वार्‍याच्या झोताने मुठीतले  वाळूचे कण घरंगळत होते आणि बगळ्यांची माळ आकाशात मुक्तपणे विहरत होती.  खरोखरच हे सारं मनावर झिरपत असतानाची ही अवस्था शब्दातीत होती. अव्यक्त होती. शब्दां पलीकडची ती केवळ एक अनुभूती होती.

मातेला मुलाचे  मन न सांगताच कळते. त्याची भूक, त्याचा आनंद, त्याचं भावविश्व, त्याचा राग, त्याची व्यथा, त्याचा ताण, तिला न सांगताच कसे कळते? कारण हे वात्सल्याचं नातं शब्दांपलीकडचं असतं.तिथे संवादाची  गरजच नसते.

भक्ताचा ईश्वराशी घडणारा संवाद— हा सुद्धा शब्दाविना असतो.तो निर्गुण असतो.अंतराचा अंतराशी झालेला, शब्दांपलीकडे घडलेला एक भावानुभव असतो.

व्यक्त होत नाही ते अव्यक्त. आणि जे अव्यक्त असतं ते शब्दांशिवायच बोलत असतं.

एखादी नजर, एखादा स्पर्श, एखादीच स्मितरेषा, किंवा अर्धोन्मीलित अधर, भावनेचा कितीतरी मोठा आशय, शब्दाविनाच भिडवतो.  या शब्दांच्या पलीकडलं हे मौन असाधारण असतं. ती फक्त एक अनुभूती असते. ती अनेक रंगी ही असते. रागाची, लोभाची, प्रेमाची, क्रोधाची, भयाचीही. शब्दांत वर्णन करता येत नसली तरी  तिचं अंत: प्रवाहाशी नातं असतं. उमटलेले नुसते तरंग असले, तरी खूप खोलवर परिणाम करणारे असतात.

पन्नास वर्षानंतर, मला माझा बालमित्र अचानक भेटला.  सगळा ताठरपणा संपलेला, संथ, वाकलेला, दाट काळ्याभोर केसांच्या जागी काही चंदेरी कलाबूतच फक्त ऊरलेली. मी ही त्याला तशीच दिसले असेल ना? पण धाडकन् , समोरा समोर आल्यावर,  डोळ्यातल्या नजरेनं आणि ओठातल्या हास्याने तो पन्नास वर्षाचा काळ आक्रसून गेला. न बोलताच पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींचा एक मूकपट सहजपणे क्षणात उलगडून गेला.

“कशी आहेस?”

“बरी आहे.”

या पलीकडे शब्द जणू संपूनच गेले.पण त्या भेटीतला आनंद हा केवळ शब्दांच्या पलीकडचा होता.

आमचं नातं आता शब्दांपलीकडे गेलंय असं म्हणताना, त्यांना त्यातला घट्टपणा, अतूट बंध, विश्वासच जाणवतो. शब्दांपलीकडे याचा अर्थ अबोला नव्हे.मौनही. नव्हे तर एक अबोल, मूक समंजसपणा. जाणीव. खोलवर वसलेल्या प्रेमाची ओळख.

तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला निसर्गातले निश:ब्द संवादही ऐकू येतील. पक्ष्यांचं झाडांशी नातं, चंद्राचं रोहिणीशी नातं, धरणीचं पर्जन्याशी नातं, नदीचं सागराशी नातं, सागराचं किनार्‍याशी नातं, फुलाचं भ्रमराशी  नातं, चकोराचं चांदण्याशी नातं, कमळाचं चिखलाशी नातं. शब्द कुठे आहेत? पण नातं आहे ना? हेच ते शब्दांच्या पलीकडचं नातं!

दूर गावी गेलेल्या आपल्या धन्याला, त्याची निरक्षर कारभारीण, एक पत्र लिहिते. आणि जेव्हां तो,  ते पत्र उघडून पाहतो, तेव्हा त्यात फक्त एक कोरा कागद असतो. या कोर्‍या कागदाला सुकलेल्या बकूळ फुलांचा वास असतो. धन्याच्या पापण्या चटकन ओलावतात आणि तो त्या कोऱ्या कागदाचे चुंबन घेतो.

शब्द खोटे असतात. शब्द बेगडी असतात. शब्द पोकळ असतात. शब्द वरवर चे असतात. पण जे शब्दांच्या पलीकडे असतं, ते नितळ पाण्यासारखं, स्वच्छ स्फटिका समान  हिरव्या पाना सारखं, ताजं टवटवीत आणि खरं असतं.

म्हणूनच ….  शब्दांवाचूनी कळते सारे शब्दांच्या पलीकडले..

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments