डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

सप्रेम नमस्कार !

शक्यतोवर मला मिळालेले पुरस्कार, मान-सन्मान या विषयी काहीही लिहिण्याचे  मी टाळतो….

स्वतःचं कौतुक स्वतःच काय करायचं?  कोणी दुसऱ्याने कौतुकाने ते इतरांना सांगितलं तर भाग वेगळा !

आज मात्र आवर्जून एका पुरस्काराविषयी लिहिणार आहे… कारण त्या निमित्ताने भेटलेल्या

अनेक व्यक्तींचा परिचय मला करून देता येईल, घडलेल्या अनेक बाबी सांगता येतील…..

या महत्त्वाच्या बाबी सांगण्याअगोदर मला मिळालेल्या पुरस्काराचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे !

१४ मे, धर्मवीर संभाजीराजे महाराज यांची जयंती… !

आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर…. एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व !

“व्यसनमुक्त युवक संघ” या नावाची संस्था स्थापन करून हे गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून नव्हे, “झिजून” नव्या पिढीमधून एक उत्तम भारतीय नागरिक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गुरुजींनी संपूर्ण जावळी तालुका व्यसनमुक्त केला आहे…

आयुष्यात केवळ पाच माणसांना मी व्यसनमुक्त करु शकलो तरी जीवनाचे सार्थक झाले असे मला वाटेल ….तिथे या ऋषितुल्य माणसाने पूर्ण एक तालुका व्यसनमुक्त केला आहे, यावरून त्यांच्या कार्याची स्पष्ट कल्पना येते…. !

—-अत्यंत करारी स्वभाव…. नजरेत जरब …. संवादाची धार तलवारीहून तीक्ष्ण…. कोणाचीही भीडभाड न ठेवणारा हा “खरा माणूस”…. अन्याय झाला तर कोणालाही पायाखाली चिरडण्याची ताकद… पण समाजात कोणी काही चांगलं केलं तर त्याच्यासमोर कमरेत वाकून मुजरा करण्याएवढी नम्रता या माणसात आहे…. !

अशा या सच्च्या माणसाने स्थापन केलेल्या संस्थेकडून… त्यांच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा यावर्षीचा  “धर्मवीर श्री संभाजी महाराज पुरस्कार”  मला देण्यात आला.

याच सोबत ” श्रीमती राणी लक्ष्मीबाई पुरस्कार “ सौ निता भावेश भाटिया” यांना देण्यात आला.

श्री विवेक राऊत, श्री नवनाथ मालुसरे यांचे आम्ही ऋणी आहोत.

भावेश भाटिया यांना जगात….हो जगात, त्यांना कोणी ओळखत नाही असा माणूस नसेल….

अजूनही जर कोणाला त्यांची ओळख नसेल, तर माझ्या या जगप्रसिद्ध जिवलग मित्राबद्दल थोडक्यात सांगतो….

—-महाबळेश्वर इथं लहानपणी दृष्टी नसलेला भावेश फुटपाथवर बसून मेणबत्त्या तयार करायचा आणि त्या तो विकायचा…. खूपदा भीक मागावी अशी परिस्थिती त्याच्या आयुष्यात निर्माण झाली, परंतू  तो परिस्थितीला शरण गेला नाही. आठ आठ दिवस उपाशी राहिला परंतू या स्वाभिमानी माणसाने भीक मागितली नाही…. !

भारतातील एक अब्जाधीश… उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन महाबळेश्वरला येऊन एक बंगला भाड्याने घेऊन महिना-महिना तिथे मुक्काम करत असत….

अब्जाधीशाच्या या फॅमिलीमधल्या एका चिमुरडीला या लहान भावेशने केलेल्या मेणबत्त्या आवडल्या…. त्याचा तो एकूण गरीब अवतार पाहून…. त्याची अंध अवस्था पाहून, मेणबत्ती खरेदी केल्यानंतर तिने त्याला टीप दिली…

तो तेव्हा  म्हणाला होता… “Honoured madam… मी ऋणी आहे आपला ….परंततू मला माझ्या कामाचे पैसे हवेत…  भीक नको…. माझ्या डोळ्यात ज्योत नसेल पण हृदयात नक्की आहे….”

ही चिमुरडी भारावली….

मग दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरला आल्यावर “ती” भावेशला भेटायची….

अनेक वर्ष त्या दोघांमध्ये संवाद झाला आणि सूर जुळले….

अब्जाधीशाच्या त्या मुलीने रस्त्यावरच्या अंध भावेशशी घरच्यांना न जुमानता लग्न केलं….

—-हो हीच ती निता…. !

अब्जाधीशाच्या मुलीने एका भिकारड्या (?) मेणबत्ती विकणाऱ्या पोराशी लग्न केलं….. याचं घरातल्या लोकांना वाईट वाटलं….

या दोघांनीही त्या घरातून काहीही घेतलं नाही….हे दोघं पाच बाय पाच च्या पत्र्याच्या खोलीत राहू लागले….

“दूरदृष्टी” असलेल्या नीताने भावेशला सांगितले, “ तू एकटा किती मेणबत्त्या करशील आणि किती विकशील ?  त्यापेक्षा आपण इतर अंध बांधवांना एकत्र करू, तू त्यांनाही मेणबत्त्या करायला शिकव,  आपण हा व्यवसाय वाढवू…. आपल्यासोबत त्यांनासुद्धा पैशाची मदत होईल….! “

—ध्येयवेड्या भावेशने सर्व अंधांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीला पाच अंध बांधवांकडून मेणबत्त्या करवून घेतल्या…. !

आता भावेशचं घर चांगलं चालू लागलं आणि त्यासोबत इतर पाच अंध बांधवांचं सुद्धा…

त्याने आणखी अंध बांधव एकत्र केले…. गोतावळा वाढत गेला….

—-एक अंध माणूस इतर अंध बांधवांचे पुनर्वसन करत आहे….

बघता बघता ही गोष्ट महाबळेश्वरमध्ये पसरली ….महाबळेश्वरमधून ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली ….. त्यानंतर ती भारतात पसरली…. आणि त्याहीनंतर ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली….

क्रमशः …

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments