सुश्री अरूणा मुल्हेरकर

? जीवनरंग ❤️

☆ ऋणानुबंध…भाग 1 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

नंदिनीच्या आयुष्यात मावशी आल्या आणि तिच्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले. आई गेल्यावर ती अगदी एकाकी झाली. पती निधनानंतर दहा वर्ष्ये आईने तिला सावलीसारखी साथ दिली होती. पण आई का जन्मभर पुरणार? दोन्ही मुले अमेरिकेत. . . !एकटेपणा काय असतो ह्याची जाणीव खर्‍या अर्थाने आईच्या स्वर्गवासाने तिला झाली. तशी अवतीभवती बरीच माणसे होती, बहीणी होत्या, दीर~नणंदा होत्या, पण त्यांची साथ कायम कशी काय शक्य? प्रत्येकाला त्यांचे त्यांचे संसार, जबाबदार्‍या होत्याच ना?

नंदिनी तशी अतिशय खंबीर मनाची. पतीच्या अकस्मात निधनानंतरही तिने स्वतःला पूर्णपणे सावरले, स्वतःचे व्यक्तिमत्व जपले.  आज एकटी आहे म्हणून रडत बसणे हा तिचा स्वभावच नव्हता.

तिच्या शेजारच्या घरात एक चोवीस तासांची बाई होती. शेजारीण फार चांगली. ती म्हणाली, “आँटी, तुम्ही एकट्या आहात म्हणून मी माझ्या बाईला रात्री तुमच्यासोबत झोपण्यासाठी पाठवत जाईन. ” तिला बरे वाटले नाही, परंतु शेजारणीने इतके आस्थेने सांगितल्यावर नाही म्हणणेही प्रशस्त वाटले नाही.

शेजारची बाई तिच्याकडे येऊ लागली. तिच्या मनात आले की आपणही अशीच एखादी चांगली बाई ठेवली तर?मग तिने चौकशीला सुरवात केली.  शेजारची बाई एका नोकरवर्ग पुरविणार्‍या एजन्सीतून आली असल्याचे रात्री झोपताना केलेल्या गप्पा~गोष्टींवरून नंदिनीला समजले. “ताई , तुम्ही आमच्या मॅडमना विचारा. त्यांच्याकडे एजन्सीचा नंबर असेल. त्या देतील तुम्हाला. “अशा रीतीने भंडारीबाईंकडून तिला नंबर मिळाला. एजन्सीमार्फत एक दोन बायका तिच्याकडे आल्याही परंतु त्यांच्या सोबत सतत रहाणे नंदिनीला रास्त वाटले नाही. दहा बारा दिवस असेच गेले. शेजारच्यांच्या बाईला असे किती दिवस बोलवायचे? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा का?नंदिनी फार अस्वस्थ होती. एजन्सीला रोज फोन लावून चांगली बाई मिळण्याची शक्यता आहे की नाही याचा अंदाज घेत होती. “ताई तुम्ही निश्चिंत रहा. लवकरच आम्ही तुम्हाला तुमच्या मनासारखी चांगली बाई मिळवून देतोच” असे तिला आश्वासन मिळत होते.

एक दिवस संध्याकाळी दारावरची बेल वाजली, एजन्सीचा माणूस बाईला घेऊन आला होता.

साधारण पन्नाशीतली बाई. गळ्यात ठसठशीत सोन्याची बोरमाळ आणि कानात सोन्याचे झुमके, कानावर सोन्याच्या पट्या लावून

ठाकठीक बसवलेले. प्रथमदर्शनी कोणाचीही नजर खेचून घेणारे. सावळा वर्ण पण नाकी डोळी नीटस. पदर पिनप करून सिंथेटिक साडी व्यवस्थित परिधान केलेली. केस काळेच, मधूनच एखादी रूपेरी छटा. कपाळावर लाल मध्यम आकाराची टिकली. केसांना तेल लावून आंबाडा घातलेला. नीट नेटकी, स्वच्छ. चाल एकदम ताठ. . . !प्रथमदर्शनीच त्यांच्याशी जमण्यास काही अडचण येऊ नये असे नंदिनीला वाटले.

एजन्सीच्या माणसाने त्या बाईशी ओळख करून दिली आणि त्यांच्या काही कागदपत्रांवर सह्या घेऊन “बघा तुम्हाला  ह्या बाई पटतात का, नाहीतर आम्हाला कळवा. आम्ही दुसरी बाई देऊ. “असे सांगून तो निघून गेला.

  क्रमशः…

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments