सौ. सुचित्रा पवार

? जीवनरंग ❤️

☆ परवड… भाग – 3 ☆ सौ. सुचित्रा पवार

कडूस पडलं होतं अजून देवाला गेलेल्यांचा पत्ता नव्हता.तिनं कुलूप काढलं, जळणाचा भारा चुलीपुढं टाकला अन म्हसरं दावणीला बांधली.तेव्हा लाईटची सोय नव्हती, तिनं चिमणी पेटवली अन गोठ्यात ठेवली.रांजापशी हातपाय -तोंड धुतलं अन पदरानं तोंड पुसत देवाजवळ गेली.दिवा लावून चुलीजवळ एक चिमणी लावून टेम्भ्यावर ठेवली.राख केर भरून चुलीवर पाणी ठेवलं गावाला गेलेल्या माणसांच्या पायावर ओतायला ! आता चांगलं च अंधारून आलेलं,  गोठ्यात म्हशी धडपडत होत्या, गोदून मोठी कासांडी घेऊन धार काढायला सुरुवात केली इतक्यात बैलगाडी थांबल्याचा आवाज आला.

“गोदे s भाकरीचा तुकडा आण गं…”चंपाबाईने आवाज दिला ;तशी दुधाची कासांडी घेऊन गोदा लगबगीने गोठयातून धावली.अंधारात नीटसे काही दिसत नव्हतं म्हणून तिनं चिमणी वर धरली…अंधुक चित्र स्पष्ट झालं नवऱ्याच्या कपाळाला बाशिंग बघून गोदा हादरली. तिच्या हातापायातल अवसान गळाल.

“पण नवरी कोण ?”

डोईपासून पायापर्यंत लपेटलेल्या परकाळ्यातून तिला स्पष्ट काही दिसेना.गोदूच्या सर्वांगातून सरसरून भीतीची लहर शहारली, तिचं पाय लटलट कापू लागलं, डोळ्यापुढं गच्च अंधार दाटला, अंगातून जणू जीव कुणी काढून घेतेय असं झालं.जड पावलांनी तिने आत जाऊन भाकरीचा तुकडा आणला अन नवरा नवरीवरून उतरून टाकला. पायावर पाणी घातलं. उंबऱ्यातून आत आल्यावर पर काळ्यातील चेहरा नीट दिसला अन ती चरकली, “ही तर धुरपा ! चंपा आत्यानं डाव साधला तर!” गोदाला काही सुचेना अनपेक्षीत धक्क्याने गोदाच्या अंगातील त्राण नाहीसे झाले तिला हुंदका अनावर झाला पण पदराने तोंड दाबून धरून अंधारल्या कोपऱ्यात तिनं आसवाना वाट करून दिली. तिची एकुलती एक आशा दुर्दैवाच्या अंधारात विलीन झाली.

चंपाबाईने घरातून बक्कळ दूध, शेवया, तूप गूळ आणून नवरा नवरीला खायला घातल्या.देवाच्या आणि थोरल्या माणसांच्या पाया पडून गोदाच्या सवतीचा संसार सुरु झाला. गोदा कोपऱ्यात बसून सगळं टिपत होती.आज तिच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं किंवा तितकी गरजही नव्हती.गोदूच्या परवडी ला इथूनच सुरुवात झाली. तीच्या आसवाना थोपवायला अंधाराशिवाय कुणी नव्हतं, तिला एकदम परकं परकं वाटू लागलं.’कधीतरी आपली कूस उजवल ही भाबडी आशा मेली.दिवसभराचा कामाचा शीण आणि डोळ्यापुढला अंधार.. गोदू अस्वस्थ झाली, तिथंच पटकारावर ती आडवी झाली पण तिची झोप उडली होती, आडात जाऊ की विहिरीत उडी टाकू ?तिला काही कळेना.भल्या पहाटे दाराची  हलकेच कडी काढून गोदूने माहेरचा रस्ता धरला.

एव्हाना गावभर बुवाच्या दुसऱ्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.जेमतेम शे- दोनशे  लोकवस्तीच गाव, वरच्या आळीला पाणी सांडलं तर वगुळ ईशीपर्यंत जायचा ! गोदीच्या भावाच्या कानावर ही गोष्ट गेलीच पण जगराहाटीत तो एकटा थोडाच वेगळा होता ?बुवाच्या जागी तो असता तर त्यानं पण तेच केलं असतं ! गोदूची मनःस्थिती ओळखून तो शांत राहिला, आठ दिवस गोदुला ठेऊन घेऊन  चार समजुतीच्या गोष्टी सांगून गोदुला घेऊन भाऊ सासरी आला अन गोदुला परत सासरघरी सोडून परत फिरला.

“गोदे, तू बी आपलीच हैस, दुघी बी गुण्या गोविंदानं भनी भनी हून नांदा, डोसक्यात काय राख घालू नकू, धुरपी तुजी धाकली भण म्हणून पदराखाली घे.” चम्पाबाईन समजूत घातली. ” असं करा, धुरपी घर सांभाळल अन तू दार -मंजी गुरढोर जळण -काटूक, सांडलं -लवंडल..”

आत्याबाईंनी दुजोरा दिला.गोदुला कुणाबर बोलायची इच्छा नव्हती.सगळ्यांनी तिचा घात केला होता, तिच्या संसारात इस्तु पुरला होता.तिनं टोपल्यातली भाकरी फडक्यात गुंडाळली अन गुरांना सोडून ती रानात निघाली.आता फक्त पोटावारी राबणारी ती एक राकुळी होती वांझोटपणाचा शिक्का बसलेली..भाकड जनावरासारखी !

वर्षात धुरपीचा पाळणा हलला अन आधीच घरादाराची लाडकी धुरपी अजूनच कौतुकाची झाली कारण बुवाच्या वंशाला दिवा मिळाला होता.गोदी अजूनच आपलेपणा पासून दूर फेकली.गोदीनं एक दिवस पाळण्यातलं बाळ उचलून कडेवर घेतलं त्याचं पटापट मुकं घेतलं,  गोदुला मायेचा पान्हा फुटला, प्रेमाचा पाझर हृदयात ओसंडून गेला  इतक्यात धुरपी ओरडली…”अग अगं ठेव त्याला खाली..तुझ्या वांझोटीची नजर हुईल तेला..” गोदिला असंख्य नांग्या दंश करून गेल्या, तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं; पण तिनं स्वतःची समजूत घातली, परिस्थितीशी जुळवून घेतलं होतं. धुरपीला लहान बहीण म्हणून धरलं होतं गपचूप बाळाला पाळण्यात ठेऊन ती बाहेर गेली.

धुरपी  पक्की होती. आणि चंपात्तीचा बळकट आधार होता. तीनं नवरा, सासू सासरे घर दार सगळंच कब्जात ठेवलं होतं अन गोदुला मोलकरीण म्हणून! गोदुन आपलं बाजलं गोठ्यातच एका कोपऱ्यात ठेऊन दिलं होतं.गुरं चारून येऊन गोठ्यात बांधायची, दिलं तेव्हढं खायचं न गप बाजल्यावर येऊन पडायचं.

दिवस जात होते त्यांच्या गतीनं, धुरपीन अजून दोन मुलांना जन्म दिला, घरदार धुरपीवर खुश होतं.यशोदाबाई अन मालक काशीला गेलं अन तिकडंच पटकीच्या साथीत सापडून संपलं.धुरपी आता सगळ्यांची मालकीण झाली.चम्पा आत्ती पाठिंब्याला भक्कम होती.घरात धुसफूस वाढली, धुरपी गोदुला नीट खायला प्यायला दीना की धडूतं !मरमर काम करून पोट भरंना की गोदी बोलायची.गोदीच तोंड दिसायचं पण धुरपीचा आतला खेळ कुणाला समजत नव्हता.घरातली भांडण एके दिवशी इशीत गेली आणि बुवानं गोदिला चाबकाने फोडलं ;धुरपीला तेच हवं होतं.उपाशी अनुशी गोदी कळवळत गोठ्यात जाऊन झोपली.

त्यादिवशीपासून धुरपीला जास्तच चेव चढला अन मुद्दामच गोदीला ती पाण्यात पाहू लागली.मरमर दिवसभर गुरांचं केलं तरी तिला वाटीभर दूध खायला मिळत नव्हतं का पोटभर अन्न मिळत नव्हतं.धडुत म्हणलं तर वर्षातून एक माहेरचं कोरं लुगडं मिळायचं ते फाटलं की धुरपीच जुनं चिंधकाला चिंधुक जोडून गोदी चालवायची.दिवस कुठलेच घर बांधून रहात नाहीत त्यांच्या गतीने ते कधी चालतात कधी पळतात.धुरपीची पोरं मोठी झाली पण त्यांना कष्टाची सवय लागली नाही.हळूहळू जमिनी कुळांच्या घशात जाऊ लागल्या.पोटभर चांगलं चुंगल खाणे, परीट घडीची कपडे घालून गावकी अन राजकारण यातच पोरांचे दिवस जात होते.दुष्काळ पडला अन्न अन्न होऊ लागले अन होती नव्हती तेवढी जमीन सावकाराकडे गहाण पडली.राहतं घर तेवढंच सुरक्षित राहिलं.कुणी म्हणायचे, ‘गोदी ची हाय लागली, ‘ कुणी म्हणायचं, ‘ चंम्पिची शिकवण भारी पडली.’गुरासारख्या कष्टानं गोदीची हाड कातडं एक झालं.

दुष्काळ सम्पला, पोरांची लग्न लागली.धुरपीच्या सुना कष्टाळू होत्या कुणी रोजगार करी, कुणी जनावरे हिंडवी आणि परपंच पुढं चालवत ;पण मुलं बाळं झाल्यावर कमतरता भासू लागली, धुसफूस वाढली, प्रत्येकानं मग आपली चूल वेगळी केली.बुवा न दोन बायका एकीकडं अन बाकी पोरं दुसरीकडं अश्या माणसांच्या पण वाटण्या झाल्या.

क्रमशः…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments