?विविधा ?

🍃 मी करवली उमेची..! 🍃 सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

`गुढीपाडव्याची म्हणजे नववर्षाच्या प्रथम दिनाची तयारी करत असतांनाच नेहमीच माझ्या मनात वाजंत्री वाजू लागतात. कशाची म्हणाल तर, माझ्या बहिणीच्यालग्नाची.. . उमेची.. . श्रीपार्वतीदेवीच्या लग्नाची.. ! कारण पण मी करवली आहे तिची.

साताऱ्या जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळ गांव. शिव पार्वती हे माझ्या माहेरचे कुलदैवत. उंच डोंगरावर, भक्कम, दगडांच, हेमाडपंथी, सुरेख गोपुरे,उंच शिखर, कळस,असं शिल्पाकृतींनी नटलेलं महादेवाचं मंदिर हे वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना आहे. गाभा-यात शिवपार्वतीच्या दोन शाळुंका (पिंडी)आहेत. सभामंडपातील खांब व मूर्ती सुरेख आहेत. डोंगरउतारावरअमृतेश्वर,मंदिरआहे. ,आजूबाजूला उतारावरच गाव वसलं आहे.

माझं माहेरचं आडनाव जिराईतखाने. पार्वती कडून मानकरी. तेथील बडवे पुजारी हे शंकराकडून मानकरी जंगम म्हणजे शैव.. हेही  देवस्थानच्या मानकऱ्यांपैकी एक. चैत्र शुद्ध पंचमीला शिवपार्वती ला लग्नाच्या हळदी लागतात याच रात्री वाड्यावर ताशा वाजंत्री शिंग फुंकत देवस्थानचे सेवेकरी भालदार चोपदार गावातील प्रतिष्ठित हळदीच मानाच बोलावं पण करण्यासाठी आमच्या वाड्यावर येत. मग पुरुष मंडळी सर्वांसह देवळाकडे निघत. हे सर्व अनुभवताना आनंद भक्तिनं मनं भरून येतात.  लहानपणी मी आमच्या दादांना (वडिलांना) सोवळं नेसून असं मानानं जाताना, त्यांच्या चेहऱ्यावर भक्ती मिश्रित तेज पाहिलं आहे. हळद लावण्याचा पहिला मान आमचा नंतर मानाप्रमाणे सर्वजण व भक्तगण हळद लावतात. सगळीकडे `हर हर महादेव ʼचा गजर होत असतो. ही वेळ रात्री बाराची. भक्तगण नुसते पळत ही वेळ गाठतात यानंतर रोज  धार्मिक विधी असतात. मुख्य मंदिर ते अमृतेश्वर मंदिर यांच्या कळसाला हात मागाचा कापडी शेला दोन टोकांनी दोन बाजूंनी बांधतात. त्याला ध्वज असे म्हणतात. ध्वज विणणारा एक मानकरी आहे  रात्रीच्या वेळी ध्वज खाली न टेकवता भक्तीभावाने कुशलतेने करतात. चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री बारा वाजता शिवपार्वती चे लग्न लागतं. मुलीचे बाजू असूनही आमच्या घराण्याला मान आहे. सारीपाटात हरल्यावर शंकर रुसून या डोंगरावर आले तेव्हा भिल्लिणीच्या रुपात आलेल्या पार्वतीवर, शंकरांनी मोहित होऊन त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली पार्वतीने बरेच आढेवेढे घेतले अशी आख्ययिका आहे. यामुळे कदाचित तिची बाजू मानाची असावी. आम्हाला तो मान मिळाला नाहीतर वधू पक्षाला एवढा कुठला हो मान?

नवमीला भंडारा असतो त्यावेळी पंक्तीत उदक सोडण्याचा मान असतो. दशमीला कवडी घराण्याचा पुरुष घोड्यावरुन तळ्यापासून सर्व दगडी ,पायर्‍यांना कमानी ना पार करून देवदर्शनाला जातो त्यालाही भालदार चोपदारांचा मानअसतो. एकादशीला सासवडहूनʼ तेल्या भुत्याʼ आडनावाच्या भक्तांची,कावड येते. प्रचंड मोठी जडशीळ कावड आणि त्याला मोठी भगवी निशाण आणि पाण्यानं भरलेलं तांब्यांचे मोठे रांजण भक्तीभावाने चिंब होऊन वाटेत कुठेही न टेकवता अखंड चालत हे भक्त मुंगी घाटातून वर मंदिरात येतात खडकाळ डोंगराचा उंच,  खडा कडाच,भक्तीची परीक्षा घेतो असं वाटतं. वाटेत, सावलीला झाड नाही. भर उन्हाचा चटका, अशा स्थितीत खांद्यावर कावड घेऊन येणं केवळ अवघडच. तोंडानं अखंडʼ हर हर महादेव `ही गर्जना ,धावाही अन् असह्य झालं कि,चक्क`  महाद्या`अशा आपुलकिच्या-हक्काच्या आरोळ्याही. !भक्तांची सगळी जत्रा दिवसभर उन्हातान्हात त्या डोंगर माथ्यावर जमलेली असते सायंकाळी महादेवावर कावडीतल्या,पाण्याचा अभिषेक होतो.

लाखांच्या संख्येनं भक्त दर्शनासाठी धावतात शिवपार्वतीच्या लग्नाच्या वेळी पिंडीवर चांदीचे सुरेख मुखवटे चढवून मुंडावळ्या बांधतात. बाहेरच्या पटांगणात बाजूला होम हवन होतं. पालखी फिरवतात सगळीकडे आनंदाचा ,भक्तीचा जल्लोष आणि `हर हर महादेव ʼची देवाला हाक. ! हा आनंद सोहळा मी लग्नानंतर एकदाच अनुभवला. त्याला आता साठ वर्ष पूर्ण झाली. इतर जत्रा आणि प्रमाणे इथंही दुकान ,सिनेमा इत्यादींची रेलचेल असते. पण आम्हाला पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या विवाह सोहळ्याचं अप्रूप! माझे आजोबा व नंतर आमचे वडील दादा त्यावेळी आवर्जून जात असत. पण सेवानिवृत्तीनंतर व वयोमानाने त्यांना नंतर जमत नसे आता तेथील नातेवाईक यात सहभागी होतात. कधी भाऊही जातात. शिंगणापूर प्रमाणेच माहेर घरी,घाणा भरणे,हळद दळणे,फराळाचे लाडू,इ. पदार्थ, रुखवताचे, डाळं,-शेंगादाणे-चुरमु-याचे लाडू,देवाला हळद लावणे,लग्न असा सोहळा होत असे. भाऊही करतात. म्हणूनच म्हटलं.. “मी करवली आहे, उमेची.. !

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments