सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात  — पपांनी अनेक दिग्गज गायकांच्या ध्वनिमुद्रिकांचा संग्रह गोळा केला..आता पुढे..)

एक दिवस राग बिहागमधील गंगुबाई हंगल यांची एक बंदीश ऐकताना पपा सहज म्हणाले,

“पाह्यलंस, यांचाही आवाज जाडच आहे पण कंठातल्या सूरात किती माधुर्य आहे! स्फूर्ती ,साधना आणि श्रद्धा असली की कला फुलते.”

एखाद्या चित्रातही काही रंग तरल असतात तर काही गडद असतात.पण तेही कागदांवरच्या आकृतीला सजीवता चैतन्य देतात.

पपा एका तोतर्‍या माणसाची गोष्ट सांगायचे .तोतरेपणामुळे तो कसा हळुहळु लोकांना टाळू लागला  ..पण एक दिवस त्याला मार्ग सापडला.

तोंडात पुट्ठ्याचा तुकडा पकडून तो समुद्रावर पळायचा.हवेची कंपने अनुभवायचा.काही काळाच्या सरावाने त्याला जाणवले की त्याचे तोतरेपण कमी होतेय् . एक दिवस तर या व्यंगातून तो पूर्णपणे मुक्त झाला.आणि नंतरच्या आयुष्यात त्याने एक उत्तम वक्ता म्हणून ख्याती मिळवली.

ताई नुसतंच हूं म्हणायची.

दिवस  सरत गेले .काळ वहात गेला.आयुष्यात खूप बदल झाले.आयुष्याने कळत नकळत हात धरुन वेगवेगळ्या वाटेवरुन घुमवले.

शिक्षण संपलं. ताई प्रेमातही पडली. लग्न झालं. मुले झाली. संसार बहरला.जबाबदार्‍या वाढल्या.

एकेक टोक जुळवतानाआतलं काहीतरी विझत गेलं.

संसाराच्या पटावरली प्यादी सरकवण्यात दमछाक झाली.कधी तिरक्या चालीचा उंट तर अडीच घरात फिरत  राहणारा अश्व.राजाला वाचवण्यातच हेलपाटलं सारं. खरं म्हणजे सर्वसाधारणपणे जे आसपास घडतं तसंच. निराळं काहीच नाही. तीच मळलेली वाट.

गाणं गुणगुणण्यापुरतच राहिलं .  मशागत करण्यासाठी ना वेळ ना कुठला झरोका उरला. विसरच पडत चालला सगळ्याचा.

मधून मधून पपांशी चर्चा होत असे. कधी फोनवर.

कधी प्रत्यक्ष भेटीत.

“परवीन सुलतानाचं बारम्मा …गाणं काय रंगलं म्हणून सांगू बाबी. भैरवी झाली तरी लोक मैफल सोडून जायला तयारच नाहीत.”

कधीतरी ताई सिम्फनी मधे फेरफटका मारूनही यायची.नव्या कॅसेट्स घेउनही यायची.

कालांतराने पपाही गेले. एक बूस्टरच हरवला त्यांच्या जाण्याने.

आजकाल तिला एक जाणवू लागलं होतं. हर्षलला संगीत आवडतं. तो इंग्लीश गाणी  तर छानच गायचा. पण पारंपारिक शास्त्रीय, भारतीय संगीताकडेही  त्याची ओढ होती. सूर पटकन् पकडायचा.एकदा कोपर्‍यातधूळ खात पडलेली आजोबांची पेटी त्याने बाहेर काढली. काही सूरांच्या पट्य्या दाबल्या होत्या. त्या उचकवून बसवल्याही. मग ताईनेच त्याला काही बेसीक सुरावटी शिकवल्या.

हर्षलची बोटं पेटीवर सराईतपणे फिरायची.नकळत ताईच्या ह्रदयातएक आनंदाची तार छेडली गेली.

एक दिवस हर्षल ताईला म्हणाला, “आई तू या क्षेत्रात करीअर करायला हवी होतीस.तुला केव्हढं तरी येतं. कुठच्या कुठे गेली असतीस!”

तेव्हांही ताई हेच म्हणाली, ” नाही रे!तो फार लांबचा पल्ला आहे. मूळातच माझ्याकडे आवाजाचं भांडवल नाही.माझा आवाज घोगरा.बसका.”

विषय तिथेच संपला.एव्हाना तर आयुष्य साठीपर्यंत पोहचलंही होतं.

क्रमश:..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments