श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गा बेटी गा… भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

गा बेटी गा     क्रमश:३

(मागील भागात आपण पाहिलं –  मधूलाही दहावीचं वर्ष कधी पार पडतंय असं झालं होतं… आणि आज अचानक निरंजन घर सोडून गेला होता प्रज्ञाबरोबर… आता इथून पुढे)

प्रज्ञा तिशीच्या आसपासची. गेली पाच-सहा वर्ष त्याच्याकडे येतेय. ती पी.एच.डी. करत होती. ‘लोकसंगीताचा शास्त्रीय संगीताशी असलेला अनुबंध’ या विषयावर भारतभर फिरून अनेक मोठमोठ्या गायकांबरोबर चर्चा केली होती. या संदर्भात निरंजनशी चर्चा करायला ती एकदा घरी आली आणि नंतर येतच राहिली. प्रबंध पूर्ण झाला. तिला पीएच.डी. मिळाली. पण निरंजनच्या गाण्याने प्रभावित होऊन ती त्याच्याकडे गाणं शिकायला येऊ लागली. आता तर बहुतेक मैफलींच्यावेळी त्याच्यामागे तंबोऱ्याच्या साथीला ती असते.

निरंजनने लिहिलं होतं, ‘प्रज्ञा माझी प्रेरणा आहे. चेतना आहे. माझी प्रतिभा आहे. स्वरदा आहे. माझे संगीतीय प्रयोग हे खरे तर आमचे संयुक्त प्रयोग आहेत. तिचा अभ्यास आणि चिंतनच मी माझ्या गाण्यातून लोकांपुढे मांडतो. नाही. ती नसली तर माझं गाणं संपून जाईल. ती असताना माझं गाणं रंगतं. फुलतं. मला नवीन नवीन काही तरी सुचत रहातं. तिच्याशिवाय, गायक म्हणून मला अस्तित्व उरणार नाही. मी चुकत असेन. तरी, अनिवार्य आहे हे सारं…’

साधना सुन्न बधीरशी झाली. प्रज्ञा गेली पाच-सहा वर्षं घरी येतेय. गोड गळ्याची, सुरेल आवाजाची, काहीशी अबोल, शांत, प्रतिभावंत तरूणी साधनाला आवडायची. कळत नकळत आपलं तारूण्यरूप साधना तिच्यात शोधायची. धाकट्या बहिणीसारखं तिचं कौतुक करायची. निरंजनाबद्दल तिच्या मनात भक्ती होती. साधना जाणून होती ते! तिची भक्ती प्रितीत कधी रूपांतरीत झाली? बहिणीची सवत होण्यापर्यंतची वाटचाल कधी झाली? आपल्याला काहीच कसं कळलं नाही?

एक काळ असा होता, साधना निरंजनची प्रेरणा होती. त्याची प्रतिभा जागृत करणारी चेतना होती. त्यावेळी त्याचं नाव झालेलं नवतं. एक उदयोन्मुख कलाकाल म्हणून त्याच्याकडे खूप अपेक्षेने पाहिलं जात होतं. तेव्हा त्याचा रियाझ साधना समोर असल्याशिवाय होत नसे. कोणत्याही मैफलीच्या वेळी साधनाच तंबोऱ्याची साथ करत असे. संसार वाढला तसतशी ही साथ सुटत गेली.

निरंजनला गाण्यासाठी पूर्णवेळ मिळावा म्हणून साधनाने नोकरी पत्करली. मुलं झाली. घराचा व्याप वाढला. कामात, मुलांत, त्यांच्या आणि निरंजनच्या वेळी सांभाळण्यात साधना इतकी गुंतत गेली की गाण्याचा पदर तिच्या हातून कधी सुटला, ते तिचे तिलाच कळले नाही. गाण्यामुळे त्यांची ओळख झाली होती. ते परस्परांच्या जवळ आले होते. एकरूप झाले होते. परस्परांपासून दूर न जाण्याच्या शपथेने बांधले होते.

‘कामाच्या रेट्यात प्रथम गाण्यापासून दुरावलो आणि आता निरंजनपासून…’ साधनाला वाटत राहिलं.

पुढे पुढे निरंजनच्या रियाझाच्यावेळी आपल्याला तिथे थांबायला वेळ होईना. सुरुवातीला आपण तिथे थांबत होतो. त्याच्या नेमक्या जागा. सुरेख मींड, दमदार तान यांना दाद देत होतो. मन किती उत्सुक आणि टवटवीत होतं तेव्हा… काही काही वेळा तर आपण त्याला सूचनाही देत होतो. पुढं मुलं झाली. त्यांचं रडणं. आई हवी, हा हट्ट. त्याच्या रियाझात व्यत्यय नको म्हणून मुलांनाच दूर नेणं, मुलं मोठी झाल्यावर त्यांचे गृहपाठ, त्यांचे कार्यक्रम, शिवाय नोकरी, घरकाम या साऱ्याचा आपल्यावर उतरलेला शीण… पहिल्यासारखं आता निरंजनच्या आगेमागे करता येत नव्हतं. त्याचा आणि आपला ही संसार सावरता सावरता त्याच्या गाण्यापासून आपण दुरावत चाललो. आपलं स्वत:चं गाणं तर त्याहीपूर्वी केव्हाच सरलं होतं.

सुरवातीला वाटायचं, आपण हळूहळू बधीर, बोथट होत चाललोय. नंतर नंतर हे वाटणंही बोथटून गेलं. रियाझाचं राहू द्या. प्रत्येक मैफलीला जाणंही अशक्य झालं. निरंजन नावलौकिक मिळवत गेला. पण, त्याची प्रेरणा, प्रतिभा म्हणून असलेलं आपलं स्थान हरवत गेलं आणि आता तर धक्काच… आपल्यापेक्षा १७-१८ वर्षांनी लहान असलेल्या आपल्या शिष्येबरोबर तो रहाणार. खरंय. त्याच्या नावाला वलय आहे. त्याहीपेक्षा जीव ओवाळून टाकावं असं त्याचं गाण आहे. खरं आहे. प्रज्ञाही अति संवेदनाक्षम, तरल मनाची आहे. अभ्यासू आहे. त्याच्या सांगितीय प्रयोगात तिचा मोठा वाटा आहे. हे सारं पटतंय आपल्याला.

पण, त्यासाठी खरंच दोघांनी एकत्र रहाणं अपरिहार्य आहे का? शिष्या मुलीसारखी असते ना?

सरत्या संध्याकाळी शिकवणीहून मधू परत आली. कोप-यात चपला आणि सोफ्यावर दप्तर भिरकावत तिने विचारलं,

‘आई, बाबा आले? सकाळीच येणार होते ना?’ साधनाच्या चेहऱ्याकडे बघता बघताच तिच्या लक्षात आलं. बाबा आले नाहीत.

क्रमश:…  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments