? जीवनरंग ❤️

☆ करारनामा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

विक्रमने मला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये बोलावले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. आता हा कसले रजिस्ट्रेशन करतोय …??? त्याला विटनेस म्हणून नेहमी मीच हवा असतो. मनाशी अंदाज बांधतच मी तिथे पोचलो.

मला बघताच नेहमीप्रमाणे त्याने चिडून किती उशीर ..? असा चेहरा केला आणि हात धरूनच त्या साहेबांच्या पुढ्यात घेऊन गेला. मुख्य म्हणजे त्याची दोन्ही मुलेही तिथे हजर होती.

त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे छान चौकोनी कुटुंब आहे. दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत होती. त्यांनी सांगितलेल्या पेपरवर मी काही न बोलता सह्या केल्या. मुलांनीही सह्या केल्या. सगळे सोपस्कार पूर्ण होताच मुले मला बाय करून निघून गेली, आणि आम्ही नेहमीप्रमाणे हॉटेल मध्ये घुसलो.

मनपसंद पदार्थांची ऑर्डर करून झाली, आणि मी विक्रमला विचारले “कसल्या सह्या घेतल्यास बाबा ….?”

“तूला का काळजी …..? तुझ्याकडचे काही घेत नाही मी …… नाहीतरी आहे काय तुझ्याकडे …?”असे बोलून मोठ्याने हसला.

“तरीही मला विचारायचा हक्क आहे …” मी मोठ्याने ओरडलो, तसा तोही हसला आणि हात पुढे करून म्हणाला “दे टाळी ….!! ह्या हक्कासाठीच वीटनेस म्हणून तुझ्या सह्या घेतल्या. माझ्या दोन्ही अपत्यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यानंतर आम्हाला दरमहा ठराविक रक्कम द्यावी अशी कागदपत्रे बनवली मी” विक्रम शांतपणे म्हणाला.

“काय ….!! मी भान न राहवून ओरडलो. आजूबाजूची माणसे आमच्याकडे पाहू लागली “अरे वेड लागले का तुला….? असे कोण पेपर्स बनवते का…. ? मुले आहेत ती….. आयला संभाळणारच आणि त्याना मनासारखे शिक्षण देणे आपले कर्तव्य आहे….” मी त्याला समजावले.

“मान्य…. पण आपली ऐपत नसताना त्यांना शिकवणे, आणि नंतर त्याचा परतावा मागणे यात गैर काय …?” तो शांत होता.

“ते कसे….? मीही चिडूनच विचारले.

“हे बघ भाऊ …. मी आणि वनिता दोघेही जॉब करतो. वर्षाला दोघांची मिळून पंधरा लाखाची कमाई आहे. महिन्याला साधारण लाख रुपये घरात येतात. त्यात नवीन घराचे कर्ज, लाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, केबलचा खर्च वेगळा. घरात किराणा माल, गाडीचे मेंटेनन्स, पेट्रोल…. हाही खर्च. उरलेल्या पैशात दोन्ही मुलांचे शिक्षण, विविध गुंतवणुकीचे हप्ते आणि मेडिकल या सर्व गोष्टीत पैसे संपून जातात. हातात काहीच शिल्लक राहत नाही. येईल तितका पैसा कमीच पडतो. शिवाय दर चार महिन्यांनी काहीतरी खरेदी असतेच. त्यात कपडे, शूज असतातच. अरे इथून पैसा येतो आणि तिथून जातो. आमच्यासाठी काहीच शिल्लक नाही.

वयात आलो, शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीला लागून घरची जबाबदारी घेतली. त्यानंतर लग्न केले आणि ताबडतोब वर्षात मुलगी झाली दोन वर्षांनी मुलगा झाला. मग त्यांच्या जबाबदारीत गुरफटलो. ते आता पर्यंत…..

मुलांना जास्तीत जास्त उत्तम शिक्षण मिळावे हा अट्टाहास. मग चाळीतून या मोठ्या घरात आलो. गावी घर दुरुस्त केले. साला… आता लक्षात येतेय, आपण आपल्यासाठी काहीच केले नाही…… दुसऱ्यांचा आनंद आपला मानत राहिलो. आई बाबा नेहमी कौतुक करतात. चार लोकांत अभिमानाने सांगतात माझ्याबद्दल. पण वनिताचे काय ? तीही माझ्याबरोबर वाहवत गेली. तिची स्वप्ने काय ते विचारलेच नाही मी. ते कोणत्यातरी चित्रपटातील वाक्य आहे ना…. अरे आयुष्याच्या उत्तरार्धात कळले की, आमचे एकमेकांवर प्रेम करणे राहून गेले”. असे बोलून तो हसू लागला.

मी गंभीर झालो “नाही विकी… हे कारण नाही आहे. तू तसा विचार करणारा नाहीस….. खरे बोल ..” मी थोडे हळुवारपणे विचारले.

तसा तो केविलवाणा हसला ”साला …खरा मित्र आहेस. बरोबर ओळखलेस तू. ऐक… मोठी मुलगी उच्च शिक्षणासाठी तीन वर्षे परदेशी जाण्याचे ठरविते आहे. तीन वर्षांचा साधारण पंचवीस लाख खर्च आहे. त्यानंतर छोटे चिरंजीव आहेतच तयार. त्याच्यासाठीही पंचवीस लाख धर. पुढील आठ वर्षात 50 लाख अधिक शिक्षणावर खर्च होणार. तोवर मी निवृत्तीजवळ येणार… मग त्यानंतर आमचे काय ? आमच्याकडे म्हातारपणासाठी काय राहील?

“अरे …. मुले काय तुम्हाला वाऱ्यावर सोडून देणार का …? उलट चांगले सुखात ठेवतील तुम्हाला ….? मी सहज म्हटले.

“गॅरंटी देतोस का भाऊ… ? त्याने तीक्ष्णपणे विचारले. मी काही न सुचून शांत बसलो. “सरळ हिशोब आहे भाऊ. निवृत्तीनंतर हातात इतकी रक्कम येणार नाही की, त्याच्या व्याजावर आम्ही दोघे जगू. मुलगी काय उद्या लग्न होऊन सासरी जाईल. मुलगा परदेशात गेला, तर परत येईल की नाही ही शंका आणि कितीही झाले, तरी त्या दोघांच्या जीवावर उर्वरित आयुष्य काढणे आम्हाला पसंत नाही. म्हणून त्यावर उपाय एकच. उच्च शिक्षणासाठी आम्ही तुमच्यावर केलेला खर्च आम्हाला परत करा. नोकरी लागताच दर महिन्याला ठराविक रक्कम आमच्या खात्यात जमा व्हायला हवी. तसेच दरवर्षी त्यात किमान दहा टक्के वाढ हवी. आम्ही त्यातून आमचा खर्च करू. आमचे आयुष्य जगू..”

मग त्यासाठी हे पेपर्स बनवायची काय गरज ? दोन्ही मुले समजूतदार आहेत. न बोलता तुला पैसे देतील.. “मी आत्मविश्वासाने सांगितले..

“भाऊ इथे भावनिक होऊ नकोस. आपण खूप अनुभव घेतले आहेत. पुढे कोण कसे वागेल, हे आता सांगू शकत नाही. त्यामुळे हे पेपर्स केलेले बरे. उद्या मुलाकडे भीक मागण्यापेक्षा हक्काचे पैसे मागणे केव्हाही चांगले. माझा सिंघनिया होऊ नये हीच माझी इच्छा. मी माझ्यापुरता विचार केलाय तू तुझा विचार कर “. असे बोलून समोरचा थंड झालेला चहा एका घोटात संपवून उठला.

द्वारा  – किरण कृष्णा बोरकर

जून 18, 2018 

– प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments