श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 3 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

महिनाअखेरचे  पान

काळाच्या ‘लाॅन्गमार्च’ मध्ये काळाचे तिसरे पाऊल पडते तो महिना म्हणजे मार्च महिना !भारतीय कालगणनेनुसार माघाचा शेवट होत,फाल्गुन महिना मुक्कामाला येतो आणि जाताना एक भारतीय वर्ष आपल्याबरोबर घेऊन जातो. फाल्गुन अमावस्या संपते आणि नवे भारतीय वर्ष चैत्र पाडव्याच्या मुहूर्ताने सुरू होते.

मार्च महिना खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे असे म्हणावे लागेल. वंदनीय व्यक्तिंच्या जयंती,पुण्यतिथी,अनेक प्रकारचे जागतिक दिन आणि आर्थिक वर्षाची अखेर असा भरगच्च कार्यक्रम या महिन्यात असतो.

देवांचा देव महादेव अशा शिवाची महाशिवरात्र याच माघ महिन्यात येते. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनि पौर्णिमा. होलिकोत्सव किंवा होळीपौर्णिमा. कुविचारांची होळी करून सद्विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचा दिवस. त्याच्या दुसरे दिवशी धुलीवंदन किंवा धुळवड. नंतर फाल्गुन पंचमीला असते रंगपंचमी. भेदभाव विसरून ,विविध विचारांच्या रंगाना एक करून,एकाच रंगात न्हाऊन जाण्याचा दिवस. आयुष्यात रंग भरण्याचा दिवस. काही ठिकाणी धुलीवंदनाला तर काही ठिकाणी रंगपंचमीला रंगांची उधळण होत असते.

याच महिन्यात असते रामकृष्ण परमहंस यांची जयंती. तिथीनुसार याच महिन्यात शिवजयंती येते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती असते बारा मार्चला. महाराष्ट्रात हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो .

ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथि असते दहा मार्चला तर फाल्गुन शुद्ध नवमी हा  धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान दिन.  फाल्गुन कृ. द्वितीया ही तुकाराम बीज म्हणजे तुकाराम महाराजांचा विठूमाऊली चरणी एकरूप होण्याचा दिवस. फाल्गुन कृ. षष्ठी हा संत एकनाथ महाराज यांचा जलसमाधी दिन.   छ. राजाराम महाराज पुण्यतिथीही याच महिन्यात असते.

या निमित्ताने इतिहास आणि संस्कृती,परंपरा यांचे पालन होते,थोरांच्या विचारांची उजळणी होते आणि तो वारसा पुढे जपण्याचे भानही आपल्याला येते.

राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील अनेक महत्वपूर्ण  दिवसही या महिन्यात येतात.

चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे.  04मार्च 1972 ला नॅशनल सेफ्टी काउन्सिल ची स्थापना झाली. सामान्य लोकांमध्ये सुरक्षेसंबंधी जागरूकता यावी म्हणून हा दिवस साजरा होतो.

08 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. 1921 पासून जगभर आणि 1975 पासून भारतात हा दिवस साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण करून त्यांना सन्मान देणे व स्त्री पुरूष भेद नष्ट करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

15 मार्च जागतिक ग्राहक दिन आहे. 15मार्च 1962 रोजी अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जाॅन केनेडी यांनी प्रथम ग्राहकांच्या हक्काविषयी भाष्य केले. म्हणून ग्राहक चळवळीतर्फे 1983 पासून ग्राहक दिन साजरा होतो.

20मार्च हा दिवस आहे जागतिक विषुव दिन आणि चिमणी दिन. जगभरात सर्वत्र बारा बारा दिवसांचे दिवस रात्र 21मार्चला होत असल्याने 20 मार्च हा विषुव दिन आहे. तर सर्वत्र चिवचिवाट करणा-या चिमणांची होणारी  लक्षणीय घट लक्षात घेऊन त्याकडे लक्ष वेधण्यासाठी चिमणी दिन साजरा केला जातो.

21 मार्च हा जागतिक कविता दिनही आहे आणि जागतिक वन दिनही आहे. युनेस्कोच्या पॅरिस परिषदेने 21/03/1999पासून कविता दिनाला मान्यता दिली. ‘कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते’ असा कवितेचा गौरव युनेस्कोच्या त्यावेळच्या महासचिवांनी केला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व शेती संघटनेतील देशांनी जागतिक वन दिनास सुरूवात केली. सर्वांना जंगलाचे फायदे समजावेत,जंगलातोड होऊ नये,वृक्ष लागवड वाढावी असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा दिवस साजरा  होतो.

22मार्च हा जागतिक जल दिन आहे. वापरण्यास योग्य अशा पाण्याचे महत्व पटवून देणे,जलस्त्रोतांचे जतन व संवर्धन करणे,पाणी काटकसरीने वापरण्यासाठी जागृती करणे हे यामागचे उद्देश आहेत. युनोच्या ठरावानुसार 1993 पासून जलदिन साजरा होतो.

23 मार्च हा जागतिक हवामान दिन. हवामानात होणारे बदल व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याची दखल घेतली जावी यासाठीचा हा दिवस.

23 मार्च हा भारतीयांच्या साठी एक काळा दिवस. याच दिवशी सरदार भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात आले. शहिदांच्या बलिदानाचे स्मरण रहावे म्हणून हा दिवस शहिद दिन या नावाने पाळला जातो.

24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन आहे. जागतिक शास्त्रज्ञ परिषदेत 1882 साली डाॅ. राॅबर्ट काॅक यांनी क्षयरोग जीवाणूंच्या शोधासंबंधीचा प्रबंध सादर केला व त्याला मान्यता मिळाली. क्षयरोग निर्मुलनासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

असा हा विविध दिवसांनी सजलेला मार्च महिना. याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे आपले आर्थिक वर्ष याच महिनाअखेरला संपते. संपलेल्या आर्थिक वर्षाचा हिशेब मांडताना येणा-या नव्या आर्थिक वर्षाचे वैयक्तिक नियोजन प्रत्येकाने करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण वैयक्तिक नियोजन व त्याचे काटेकोर पालनच संपूर्ण समाजाला आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवू शकते. सशक्त समाजच समर्थ राष्ट्र बनवू शकतो. आर्थिक नियोजनाचा  संकल्प करूनच इथे थांबूया आणि नववर्षाच्या संकल्पांची गुढी उभारायच्या तयारीला लागूया.

नूतन वर्षाभिनंदन !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments