? विविधा ?

☆होली है…! …अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

होली है.

आज सकाळीच दारावर टक टक  झाली. बघतो तर काय ? देव, आपले थाळी भर रंग घेऊ उभा. अजिंक्य देव,रमेश देव नव्हे,साक्षात देव, देवळातला.

तो म्हणाला चल बाहेर ये, रंग लावायला आलोय. आणि तो “होळीसाठी खास”  जुना  टी  शर्ट घालून येऊ नको. साक्षात देव आलाय. चांगल्या कपड्यात ये. मी छान झब्बा  घालून आलो. तो ओरडला होली  है .एक एक रंग माझ्या तोंडाला फासत तो त्या रंगाचं महत्व सांगत होता.

पहिलाच रंग त्याने फासला निळा. तो म्हणाला हा रंग आकाशाचा. आकाशा सारखं सर्वावर मायेचं पांघरूण घाल पण त्याचवेळी त्याच्यासारखा तटस्थ रहा. कधीतरी धुकं बनून त्यांच्यात आलास तरी धुक्यासारखा   पटकन विरून जा. होली है.

दुसरा रंग निसर्गाचा. वेडा निसर्ग. नुसता देतच सुटलाय. घेण्याचं नाव नाही. माणसाने त्याच्या लाकडाची कुर्हाड करून त्याच्यावरच चालवली तरीही देतो आहे. माणूस हाताने  फुलं चुरगाळतोय तरीही ती सुगंध देतायत. माणूस आग लावून मधाचं पोळं काढतोय तरी मध माशा गोळा  करतायत. तसाच देत राहा देत राहा. देत राहा

होली  है.

तिसरा रंग लाल तेजाचा. ज्ञानाचा. ज्ञानॆवं तू कैवल्यम. ज्ञान म्हणजेच मी. अथांग पसरलेला. द्याल तितका अनेक पटीने वाढणारा. ज्ञान म्हणजे ज्योत, आयुष्य म्हणजे तेल,माणूस म्हणजे पणती. तेल संपेपर्यंत ज्योत पेटती राहू दे. होली है.

हा रंग केसरीया,त्यागाचा. गीतेच्या अठराव्या अध्यायाचा. देशासाठी, समाजासाठी, निसर्गासाठी,आई, वडील, बायको, मुले, विद्यार्थी, यांच्यासाठी  त्याग करणाऱ्या सर्वांचा. कुठलाही त्याग मोठा नाही कुठला लहान नाही, सर्व एक सारखे, श्वासा सारखे – होली है.

हा गुलाबी रंग, निष्पाप मुलांच्या गालाचा, त्यांच्या हसण्याचा. सुख दुःखात हा रंग कायम चेहर्यावर राहू दे.ते सर्वात मोठं पेन  किलर आहे. जेव्हा दैव, नशीब  सोबत  नसत तेव्हा हसू असतं. ते तुमच्या बाजूने त्यांच्याशी लढतं….

 होली  है.

आणि हा रंग चंदेरी. मी ओरडलो, ए देवा, हा नाही लावायचा, हा ऑइल पेंट असतो, बरेच दिवस जात नाही, मागच्या वर्षी मी खोबरेल तेल लावून काढला.

तो म्हणाला अरे वेड्या हाच तर पक्का रंग आहे, आशेचा. मी म्हटलं चंदेरी ? आशा ? काय बोलतोयस ?

तो म्हणाला, आशेचा रंग आयुष्यात सर्वात जास्त टिकतो. किंवा  तो आहे म्हणून आयुष्य आहे. आशा संपली कि तुम्ही संपलात, आयुष्य संपलं.

 तुम्हीच म्हणता ना ?एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्वर लायनिंग !!

त्याने शेवटी तोच रंग माझ्या तोंडाला जास्त फासला आणि ओरडत निघून गेला…..  होली है!

– अनामिक

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments