श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं  – उज्ज्वला–मी अनुवादात घुसले. आणि चक्रव्यूहासारखी त्यातच अडकले. मग माझं स्वतंत्र कथालेखन थांबल्यासारखच झालं. आता इथून पुढे) 

मी – तुला कादंबरी लिहावीशी नाही वाटली?

उज्ज्वला – नाही. तेवढा स्टॅमिना मला नाही, असं वाटलं. तसंच मी नाटकाही लिहिलं नाही.

मी – पण संवाद माध्यम तू हाताळलं आहेस.

उज्ज्वला – हो. आकाशवाणीवरील कार्यक्रमात मी संवाद लिहिले आहेत. सांगली आकाशवाणीवर ‘प्रतिबिंब’ ही कौटुंबिक श्रुतिका सुरू झाली. पूर्वी मुंबईहून ‘प्रपंच’ मालिका सादर व्हायची. त्या स्वरूपाची. हे सादर १० वर्षे चालू होते. यात मी एकूण १०० तरी श्रुतिकांचं लेखन केलय. श्रोत्यांची पत्रे आणि त्यांनी प्रत्यक्ष भेटल्यावर दिलेल्या प्रतिक्रिया यातून लोकांना ते लेखन आवडल्याचं लक्षात आलं. अनेक जणी मला विचारायच्या, ‘आमच्या घरातले संवाद तुला कसे कळतात? ‘

मी – आणि तुझी नभोनाट्ये?

उज्ज्वला – माझी ५ नभोनाट्ये आकाशवाणीवरून प्रसारित झाली. त्यापैकी पहिले नभोनाट्य ‘इथे साहित्याचे साचे मिळतील’, हे मी स्वत: नेऊन दिले होते. इतर सर्व नाटके मी सबंधित विभागांच्या प्रमुखांनी सांगितली म्हणून मी लिहिली.

मी – म्हणजे?

उज्ज्वला – त्यावेळी शशी पटवर्धन नाट्यविभागाचे प्रमुख होते. एकदा त्यांनी मला बोलावलं . म्हणाले,’जागतिक आरोग्यदिन’ आहे. या निमित्ताने ‘फास्ट फूड’ या विषयावर नाटक लिहा.’ मी विचार करू लागले. ‘फास्ट फूड’वरून जुनी पिढी- नवी पिढी यातील वाद हा ठरीव विषय मनाला काही भिडेना. विचार करता करता मला ‘फास्ट फूड’च्या अनेक परी सुचल्या, जसे इंटलेक्चुअल ‘फास्ट फूड’ ( १० दिवसात १०वी मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे…),  संस्कृतिक ‘फास्ट फूड’ (झट मंगनी, पट ब्याह, फट विभाजन ). तरी क्लायामॅक्स पॉइंट मिळेना. मग सुचलं, ‘जेनेटिक फास्ट फूड ‘. ९ महीने बाळंतपणासाठी लागतात. त्यामुळे स्त्रियांची कार्यशक्ती फुकट जाते. तेव्हा  त्या ९ आठवड्यात आणि पुढल्या काही वर्षात ,९ दिवसात बाळंतीण झाल्या तर… महिला कल्याण विभागाच्या अध्यक्षा संशोधनाला उत्तेजन देतायत. त्यांचा प्रयोग पूर्णत्वाला येऊ पहातोय . सर्व डाटा पी.सी. वर सुरक्षित आहे आणि त्याच वेळी विष्णु त्यात व्हायरस सोडून तो सगळा प्रयोगाचा तपशील डी लिट. करून टाकतो. फॅंटसीवर आधारलेलं हे नभोनाट्य छान जमून गेलं. आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ते प्रसारित झालं. ही नाटिका मला लिहायला सांगितली नसती, तर लेखनाचा विषय म्हणून मला हे सुचलं नसतं. त्यामुळे माझ्या लेखनात योगायोगाचासुद्धा भाग आहे.

मी – पुढे यावर तू कथासुद्धा लिहिलीस. 

उज्ज्वला – हो. त्यानंतर थोड्याच दिवसात सावंतवाडीचा साहित्य संमेलनात, किस्त्रीमचे संपादक ह. मो. मराठे भेटले. ‘नवीन काय लिहिलय’ वगैरे बोलणं झालं. नुकतच ‘फास्ट फूड’ लिहिलेलं असल्यामुळे मी त्याबद्दल बोलले. ते म्हणाले, ‘ताबडतोब याचं कथा रूपांतरण कर आणि ‘स्त्री’कडे पाठव.’ नंतर ती कथा स्त्री’च्या महिला विनोद विशेषांकात आली. पुढे मी जेव्हा विनोदी कथांचं पुस्तक काढलं, तेव्हा त्याचं नाव ‘फास्ट फूड’च दिलं.

मी – तुझ्या आणि नभोनाट्यांचं काय?

उज्ज्वला – तिसरं नभोनाट्य मी एड्स्वर लिहिलं. ‘सुनीलची डायरी’ म्हणून. तेही त्यांच्याच सांगण्यावरून. हेही आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारित झालं होतं. यासाठी मला आर्यापाइकी अभ्यास कारावा लागला होता. त्यानंतर ‘पठ्ठे बापूराव’ यांच्यावर ‘नाही तर रंग पुन्हा सुना सुना..’ हे नभोनाट्य झालं. शेवटचं नभोनाट्य ‘सावित्री’ ( सावित्रीबाई फुले) मी संजय पाटील यांच्या सांगण्यावरून लिहिलं.त्यानंतर आकाशवाणीकडून मला पुन्हा काही बोलावणं आलं नाही आणि माझं नभोनाट्य लेखन थांबलं.

मी – तू अनुवादाकडे कशी वळलीस?

क्रमश: ….

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments